kojagiri purnima sakal
संस्कृती

कोजागरी - ‘अमृत’प्राप्तीचा दिवस

भारतीय सण-उत्सव आणि पौर्णिमा यांची सहसा सांगड घातलेली दिसते. भारतीय कालगणनेनुसार संपूर्ण वर्षात १२, तर कधी १३ पौर्णिमा येतात.

सकाळ वृत्तसेवा

कोजागरीच्या आजच्या दिवशी चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून अमृतप्राप्ती करून घ्यावी. मनाच्या पलीकडे आतमध्ये असलेल्या जिवाला स्पर्श करून, व्यक्तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे.

भारतीय सण-उत्सव आणि पौर्णिमा यांची सहसा सांगड घातलेली दिसते. भारतीय कालगणनेनुसार संपूर्ण वर्षात १२, तर कधी १३ पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमेला कोणत्या तरी विशेष सणाची, उपक्रमाची योजना केलेली आढळते. या पौर्णिमेमधली एक महत्त्वाची पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा किंवा आश्र्विन पौर्णिमा, जिला ‘चंद्रकिरणांचा उत्सव’ असेही म्हणता येईल. शरदातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्रातून सर्वांत अधिक अमृतस्राव होतो. भारतात बहुतेक सगळीकडे शरद पौर्णिमेच्या रात्री हा उत्सव साजरा केला जातो.

पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्याच्या मधला ऋतू म्हणजे शरद ऋतू. साहजिकच या ऋतूमध्ये एखाद्या-दुसऱ्या सरीचा अपवाद सोडला, तर पाऊस जवळजवळ थांबलेला असतो. पावसाळ्यातील काळे ढग जाऊन त्यांची जागा पांढऱ्या ढगांनी घेतलेली असते. दिवसा सूर्याच्या तीव्र किरणांमुळे वातावरण चांगलेच तापते, तर रात्री हवेत गारवा जाणवतो. झेंडू, शेवंती वगैरे लाल फुले फुलतात. निसर्गात आणि वातावरणात हे बदल व्हायला लागले की शरद ऋतू सुरू झाला असे समजता येते.

निसर्गातील प्रत्येक बदलाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. पावसाळ्यात वातदोषाचा प्रकोप होतो, त्याचबरोबर पाण्यात वाढलेल्या आम्लतेने पित्तदोष साठायला सुरुवात झालेली असते. पावसाळ्यातील थंड वातावरण बदलून त्या ऐवजी तीव्र सूर्यकिरणे तळपू लागली व हवेतील उष्णता वाढली की त्याचा परिणाम म्हणून अगोदर साठलेले पित्त अजूनच वाढते व पित्ताचा प्रकोप होतो.

पित्ताचा प्रकोप झाला की पित्ताचे अनेक त्रास होऊ शकतात. म्हणून शरद ऋतूची सुरुवात झाली की लगेच पित्त संतुलनासाठी प्रयत्न करणे श्रेयस्कर असते. कोजागरीचा सण अमृतासाठी प्रसिद्ध आहे. आश्र्विनातील पौर्णिमेला रात्रीच्या चंद्रप्रकाशाचाही विशेष परिणाम होत असतो. या दिवशी चंद्राचा शक्ती पांढऱ्या वस्तूंमध्ये किंवा दुधामध्ये शोषली जात असावी व त्यामुळे दुधाचा अमृताचा गुण वाढत असावा.

शरद ऋतूत वाढलेल्या पित्ताला शांत करण्यासाठी या अमृताचा उपयोग नक्कीच होतो. कोजागरीच्या दिवशी रात्री बारा वाजता वेळी सृष्टीवर अमृताचा वर्षाव होतो. त्यामुळे यावेळी जो कोणी जागा असतो त्याला अमृत मिळते, असा समज रूढ आहे. आजच्या रात्री शरदाच्या चांदण्यात ठेवलेले दूध पिण्याची प्रथा आहे.

कोजागरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात बसून चंद्राचे ध्यान करून चंद्रप्रकाशात ठेवलेले, पर्यायाने ज्यात चंद्राची शक्ती उतरलेली आहे, असे दूध प्राशन केले जाते. यामुळे या ऋतूत वाढलेल्या पित्ताचे शमन होते. दूध पित्तशामक असतेच. त्यात साखर, केशर वगैरे टाकून चंद्रप्रकाशात ठेवले जाते.

श्रीमद्भगवद्गीतेत म्हटलेले आहे ‘सोमो भूत्वा रसात्मकः’ सोमरस म्हणजे प्रत्येक वनस्पतीत, प्रत्येक खाण्याच्या वस्तूत सोमरस म्हणजे अमृत मीच पाठवतोस, असे भगवंतांनी म्हटलेले आहे. चंद्र आपल्यावर अमृताचा वर्षाव करतो. वनस्पतींमध्ये असणारे सॅप चंद्रप्रभावामुळेच असते. तसे पाहिले सृष्टीतील सर्व जलतत्त्वावर चंद्राचा प्रभाव असतो. चंद्रावरच समुद्राची भरती-ओहोटीसुद्धा अवलंबून असते.

या दिवशी वेगवेगळ्या मार्गाने चंद्राची पूजा सांगितलेली आहे. सूर्य हा भौतिकाचा तर चंद्र हा मनाचा अधिपती आहे. परमपुरुष परमात्म्याला स्पर्श करून सूर्यालासुद्धा स्पर्श करणारा असा हा चंद्र. चाळणीतून चंद्राकडे पाहणे, चतुर्थीचा चंद्र उगवल्यावर उपवास सोडणे (कारण विशिष्ट वेळी मेंदूत विशिष्ट तरंग असतात) वगैरे व्रते सांगितलेली आहेत. शहरात गर्दी असल्यामुळे चंद्रप्रकाशात बसणे अवघड होत आहे.

निसर्गाचे प्रेम अनुभवण्याच्या निमित्ताने, चंद्रप्रकाशाचा अनुभव घेता यावा व शुद्ध हवा मिळविण्याच्या उद्देशाने लोक कोजागरीच्या दिवशी बाहेर बागांमध्ये जातात, डोंगरावर वगैरे जातात. कुठेतरी बाहेर बागेत जाऊन, डोंगरावर जाऊन सर्वांनी एकत्र बसून आनंद घ्यायचा व दूध प्यायचे इथपर्यंत ठीक होते. परंतु या निमित्ताने धुडगूस घालणे, मोठमोठ्याने गाणी लागणे, बीभत्स नाचणे व बाटलीतील दूध पिणे याला कोजागरी उत्सव साजरा केला, असे म्हणता येत नाही.

अन्नावर मनाचा संस्कार

भारतीय अध्यात्मशास्त्रात ‘सोम’ ही व देवता ‘सोम’रस सर्वांत महत्त्वाचा समजला आहे. सोमरस हे नाव मेंदूजलाला दिलेले आहे. मेंदू व आपला संपूर्ण मेरुदंड सोमरसात बुडालेले असतात. सोमरस हाच कर्ता-धर्ता व जीवन चालविणारा महत्त्वाचा घटक असतो. या सोमरसाला कोजागरीच्या दिवशी वृद्धी मिळते. जसे झाडात असलेल्या रसावर पौर्णिमेचा म्हणजेच चंद्राचा परिणाम होतो तसे या दिवशी शरीरातील सोमरसाचीही वृद्धी होते.

त्यामुळे या दिवशी खीर वा दूध घेण्याने वर्षा ऋतूनंतर येणाऱ्या शरदात उत्पन्न झालेली शरीराची आग थंड व्हायला मदत होते. ही शारीरिक स्तरावरची उत्तम व्यवस्था सांगितलेली आहेत. मन आनंदित नसताना दूध घेतल्यास अशी शांती होऊ शकत नाही. याचे कारण प्रत्येक अन्नावर व वस्तूवर मनाचा संस्कार होत असतो.

आज रात्री चंद्रग्रहण आहे. भारतीय परंपरेत ग्रहणकालात अमुक करावे, तमुक करू नये असे नियम सांगितलेले आहेत. हे नियम पाळण्याची गरज आहे का, हे नियम पाळण्याचा उद्देश काय आहे, ग्रहण पाहावे की पाहू नये या विषयांवर मतमतांतरे आहेत. सूर्याचा प्रकाश चंद्राला मिळतो व चंद्राचा प्रकाश पृथ्वीला म्हणजे आपल्याला मिळतो हे आपणा सर्वांना माहीत आहेत.

सूर्यप्रकाशामुळे वातावरण शुद्ध राहते हे सर्वांनाच मान्य आहे. ग्रहणकाळात मिळणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण एरवी त्या दिवशी मिळू शकणाऱ्या प्रकाशापेक्षा कमी झालेले असते. त्यामुळे ग्रहणकाळात पृथ्वीवरील वातावरणात बॅक्टेरिया-व्हायरस वाढण्याची शक्यता वाढलेली असते. म्हणून ग्रहणकाळात अन्नग्रहण करू नये, पाणी पिऊ नये वगैरे नियम सांगितलेले असावेत.

अर्थात बरोबरीने ऊर्जा वाढावी यासाठी जप, जाप्य वगैरेही सांगितलेले आहे. ग्रहणकाळात निसर्गात होणारे बदल, लोहचुंबकीय क्षेत्रात होणारे बदल ध्यानासाठी, उपासनेसाठी साहायक ठरतात. अथर्वशीर्षातही ‘सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंन्निधौ वा जप्त्वा ...’ असा उल्लेख आहे.

सूर्यग्रहे म्हणजे सूर्यग्रहण असा अर्थ घ्यावा का, याचा स्पष्ट उलगडा होत नाही. ज्याला सूर्यग्रहाची उपमा दिलेली आहे, ते मेंदूतील केंद्र असाही अर्थ आहे. या दिवशी सर्वांनी आनंदात एकत्र बसून दूध पिणे हा एक सर्वमान्य प्रथा झाली; पण आजच्या कोजागरीच्या दिवशी चंद्रप्रकाशात ध्यानाला बसून सोमाच्या माध्यमातून अमृतप्राप्ती करून घ्यावी.

मनाच्या पलीकडे आतमध्ये असलेल्या जिवाला स्पर्श करून, व्यक्तिगत आत्म्याला स्पर्श करून त्यापलीकडे असलेल्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची ही संधी आहे. या ठिकाणी आपल्याला आपण सर्व एक आहोत, हा विश्र्वबंधुत्वभाव अनुभवता येतो. हेही या दिवसाचे महत्त्व आहे

(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे लिखित, संतुलन आयुर्वेद द्वारा संकलित)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT