Ashadhi Ekadashi 2024  Sakal
संस्कृती

Ashadhi Ekadashi 2024 : जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंद केशवा भेटताची॥

सकाळ वृत्तसेवा

- संदीप जिवलग कोहळे

पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा। शेषां सहस्त्रमुखां न वर्णवेचि॥१॥

पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी। जन्मोजन्मीं वारी घडली तयां॥२॥

सावळ्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध साधुसंतांच्या पालख्या गळ्यात तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का आणि मुखाने विठुनामाचा गजर करणाऱ्या असंख्य वारकऱ्यांच्या सोबत आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपूर नगरीत दाखल झाल्या आहेत. ‘जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंद केशवा भेटताची॥’ अशी ऊर्मी सर्वांच्या अंतःकरणात निर्माण झाली आहे.

आला आषाढी पर्वकाळ। भक्तमिळाले सकळ ॥१॥

निवृत्तिनाथ ज्ञानदेव। मुक्ताबाई सोपानदेव॥२॥

चांगदेव विसोबा खेचर। सावता माळी गोरा कुंभार॥३॥

रोहिदास कबीर सूरदास। नरहरी आणि भानुदास॥४॥

नामदेव नाचे कीर्तनीं। एका शरण जनार्दनीं॥५॥

पंढरपूरला येणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्याची परंपरा संतश्री नामदेव महाराजांचे वंशज श्री नामदास महाराज व बांधवांनी सुरू केली. यंदाही आषाढ शुद्ध दशमीला नामदेव महाराजांची पालखी इसबावी येथे सर्व संतांच्या स्वागतासाठी गेली व सर्व संतांना मानपानासह पंढरपुरात घेऊन आली.

सर्वात पुढे स्वागतासाठी गेलेल्या नामदेवरायांची पालखी, त्यानंतर संत मुक्ताईंची, त्यामागे सोपानदेव, एकनाथ, निवृत्तीनाथ, तुकाराम व सर्वात शेवटी माऊलीची पालखी असा कित्येक वर्षांचा क्रम यंदाही पहायला मिळाला.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणजे सर्व संतांची माऊली. सगळ्या पालख्या पंढरीत दाखल झाल्यानंतर सर्वात शेवटी पंढरीत दाखल होणारी पालखी माऊलींची असते. याचाच अर्थ सर्व लेकरांना पुढे पाठवून आई मागाहून पंढरीत दाखल होते अशीसुद्धा वारकऱ्यांची भावना आहे. पंढरपुरात प्रवेश करताना पावलो पंढरी वैकुंठभुवन अथवा अशाच प्रकारचा पंढरपूर वर्णनाचा अभंग म्हणतात.

पावलों पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा॥

पावलों पंढरी आनंदगजरें। वाजतील तुरे शंख भेटी॥

पावलों पंढरी क्षेम आलिंगनी। संत या सज्जनीं निवविलें॥

पावलों पंढरी पार नाहीं सुखा। भेटला हा सखा मायबाप॥

पावलों पंढरी येरझार खुंटली। माऊली वोळली प्रेमपान्हा॥

पावलों पंढरी आपुलें माहेर। नाहीं संवसार तुका ह्मणे॥

पंढरपुरात आल्यानंतर सर्व पालखी सोहळे आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणी विसावले. आषाढी एकादशी मान्यतेनुसार आषाढी एकादशीला ‘शयनी’ एकादशी असेही नाव आहे. ‘शयन’ म्हणजे झोप. या एकादशीपासून भगवान विष्णू हे क्षीरसागरातील शेषावर चार महिने झोपतात.

आषाढी पर्वकाळ एकादशी दिन। हरि जागरण देवा प्रिय॥१॥

निराहारे व्रत जो करी आवडी। मोक्ष परवडी त्याचे घरी॥२॥

व्रत आचरती हरिकथा करिती। नाम घोष गाती आवडीने॥३॥

प्रदक्षणा तीर्थ आदरे सेविती। पूर्वज ते जाती वैकुंठासी॥४॥

पुंडलिकाचे दर्शन चंद्रभागे स्नान। विठ्ठल दरुशने धन्य होती॥५॥

एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम। तया सर्वोत्तम नुपेक्षी तो॥६॥

संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्व व्रतांत श्रेष्‍ठ शुभ एकादशी दिवशी उपवास करून विष्‍णूला प्रसन्न करण्‍यासाठी रात्रभर जागरण करावे. एकादशीच्‍या दिवशी उपवास केल्‍यास वैष्‍णवपद सहजपणे प्राप्‍त होते. एकादशीच्‍या नावाच्‍या श्रवणाने यमदूतही शंकित होतात.

सर्व व्रतांत श्रेष्‍ठ असणाऱ्या एकादशीचे जो व्रत शुद्ध अंतःकरणाने करतो, चंद्रभागेचे स्नान करून पुंडलिकाचे दर्शन घेऊन विठ्ठलाचे दर्शन घेतो, प्रदक्षिणा करून शुद्ध आचरण ठेवून तीर्थाचे सेवन करितो, हरिनामाचा जयघोष करितो, हरिकथा करितो, कीर्तन श्रवण करितो, ऐसा पुण्यात्माच्या वंशजास वैकुंठवास प्राप्त होतो.

पंढरीचा निवास आणि चंद्रभागेचे स्नान हे केवळ दैवयोगाने लाभणाऱ्या गोष्टी आहेत. या तीर्थक्षेत्राची प्रदक्षिणा विठ्ठलाच्या नामघोषात तल्लीन होऊन नाचण्यातला आनंद ज्या स्त्री-पुरुषांना मिळतो ते भाग्यवान समजले जातात. आषाढी-कार्तिकी एकादशीचा सोहळा म्हणजे वारकऱ्यांसाठी नित्य आनंदाची दिवाळी. त्यांच्या ध्यानीमनीं विठ्ठल मूर्तीशिवाय आणि वाणींत विठ्ठल नामाशिवाय अन्य काही नसते. हे सर्व वारकरी विठ्ठल चरणांशी अनन्यभक्तीने शरणागत होतात. दशमीपासून चतुर्दशीपर्यंत पाच दिवस पालख्यांचा मुक्काम पंढरपुरात असणार आहे. गोपाळकाल्यानंतर सर्व पालख्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT