ashadi wari 2023 akluj ringan flowers shower from helicopter warkari wari culture sakal
संस्कृती

Ashadi Wari 2023 : 'प्रेम अमृताची धार' याची अनुभूती; अकलूजच्या रिंगणावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

नीरा स्नानानंतर अकलूजच्या रिंगणात वारकरी जलाभिषेक व भक्तीरसात न्हाऊन निघाले

राजेंद्रकृष्ण कापसे

अकलूज : रिंगणावर गुलाबाच्या पाकळ्यांची हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली. अश्वांची दौड पूर्ण केल्यावर उडीचा खेळ सुरू होता. 'तुकाराम- तुकाराम' असा सामुहिक नामघोष आसमंत भेदून टाकत होता. मनापासून दिलेली हाक कृपाळूवा पांडुरंगाने ऐकली. वरुणराजाने मनसोक्त जलाभिषेक केला. प्रेम अमृताची धार। वाहे देवा ही समोर।। या संत तुकाराम महाराजांच्याबअभंगाची अनुभूती घेत वैष्णव जलाभिषेक व भक्तीरसात न्हाऊन निघाले.

पुणे जिल्ह्यातील सराटीत शनिवारी सकाळी काकड आरती झाली. संस्थांनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे देहुकर यांनी पादुका डोक्यावर घेत निरास्नानासाठी नदीकडे आणल्या. नदी कोरडी असल्याने जिल्हा प्रशासनाने निरास्नानासाठी टँकरची व्यवस्था केली होती.

टँकरच्या पाण्यात पादुकांना स्नान घालण्यात आले. नदीचा पूल ओलांडून पालखी सोलापूर जिल्ह्यात पोचली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दर्शन घेत स्वागत केले. काही वेळ रथाचे सारथ्य केले. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते. मोहिते- पाटील परिवाराने स्वागत केले.

अकलूज नगरपरिषदेने तोफांच्या सलामीत स्वागत केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी भाजपचे पदाधिकारी विक्रांत पाटील, रमेश आडसकर, मुरलीधर मोहोळ यांनी दर्शन घेत स्वागत केले.

चौघडा साडेदहा वाजता माने विद्यालयात रिंगणासाठी पोचला. त्यानंतर, २७ दिंड्या, पालखी रथ आणि त्यामागील दिंड्या ३३० दिंड्या रिंगणात आल्या. अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज देहुकर, सोहळाप्रमुख संजय मोरे, अजित मोरे, विश्वस्त माणिक मोरे, विशाल मोरे, माजी अध्यक्ष व विश्वस्त यांच्या सूचनेनुसार चोपदार नामदेव गिराम, देशमुख चोपदार, कानसूरकर चोपदार यांनी रिंगण लावले. सोहळा प्रमुख भानुदास मोरे, सुनील मोरे यांनी सोहळ्याच्या सूचना ध्वनीक्षेपकावरून देत होते.

दरम्यान, रिंगण पाहण्यासाठीच्या व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी बसले होते.

पालखी रथातून काढून रिंगणाच्या मध्यभागी ठेवली. पादुकांचे पूजन संग्रामसिंह मोहिते- पाटील व ऋतुजादेवी मोहिते- पाटील यांच्या हस्ते झाले. अश्वांचे पूजन आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते- पाटील, धैर्यशील मोहिते- पाटील, डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील, उर्वशीराजे मोहिते- पाटील, धनश्री घुले यांच्या हस्ते केले.

'पुंडलिक वरदे' जयघोष व तुतारीच्या निनादात सकाळी ११ वाजता रिंगण सुरू झाले. त्यावेळी सोहळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी झाली. पताकाधारी, तुळस वृंदावनधारी व हांडेवाल्या महिला, वीणेकरी यांच्या रिंगणात तीन प्रदक्षिणा झाल्या.

मोहिते-पाटील यांच्या‘बलराज’ या स्वाराच्या अश्वाने व पेठ बाभुळगावकरांच्या ‘राजू’ या देवाच्या अश्वांने दौडीस सुरूवात केली. दोन्ही अश्वाने तीन फेर्‍या पूर्ण भाविक, वारकरी हात उंचावून जयघोष करीत होते. अश्वांची दौड पूर्ण झाल्यानंतर त्याच्या टापाखालची माती कपाळी लावण्यासाठी गर्दी झाली होती.

मालक पुंडलिक महाराज मोरे देहूकर, यांच्या सूचनेनुसार उडीचा खेळ सुरू होता. लयबद्ध आवाजात पखवाज व टाळकरी यांच्यात खेळ रंगला होता. 'भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ।। हा मानाचा अभंग सुरू पावसाचा शिडकावा सुरू झाला.

आरती झाली. 'तुकाराम- तुकाराम' असा सामुहिक नामघोष आसमंत भेदून टाकत होता. वरुणराजाने मनसोक्त जलाभिषेक केला. उडीच्या खेळानंतर दुपारी एक वाजता रिंगण संपले. पावसात पालखी शाळेच्या व्यासपीठावर आणली. तेथे समाज आरती झाल्यानंतर सोहळा दोन वाजता विसावला.

उभे रिंगण आज

उद्या रविवारी सकाळी सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ होईल. तेथे पाहिले उभे रिंगण होईल. उद्याचा मुक्काम बोरगांव येथे आहे.

नीरा स्नानानंतर, वरुणराजाचा जलाभिषेक

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापासून पाऊस झालेला नव्हता मागील १३ दिवसांची वाटचाल ही रणरणत्या उन्हात झाली. वारकरी पावसाची पडण्याची आळवणी करीत होते. आज नीरा स्नान आणि रिंगण सोहळा संपताच वरुणराजाचा जलाभिषेक झाल्याने वारकरी आनंदले.

त्यांनी केला 'तुकाराम' असा।जयघोष

अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे रिंगणाच्या ठिकाणी अगोदर पोचले होते. त्यांनी वारी आणि रिंगणाची माहिती हिंदीतून माहिती घेतली. त्यानंतर 'तुकाराम' तुकाराम असा जयघोष केला. त्यांनी रिंगणाचे मोबाईल मध्ये फोटो घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT