वाखरी : किती गं किती दूर, मुक्ता तुझं गाव, ज्ञानेश्वर माऊली तुझ्या भावाचं गं नाव, हे गाण्याचे शब्द आहेत, ९५ वर्षांच्या आजीचे. चपात्या लाटताना त्या गात होत्या. त्यांच्या मागे बाकी महिला गात होत्या. आजींना विचारलं, ‘किती वर्ष वारी केली?’,
त्यावर त्या म्हणाल्या, ‘मोप झाली पोरा’. ‘गाडीत बसून वारी करता का?’, यावर त्या म्हणाल्या, ‘‘आमच्यासाठी वारकरी हेच माऊली, त्यांना जेऊ घातले की झाली वारी आमची. वारीच्या वाटेवर प्रत्येकजण एक दुसऱ्याला माऊली समजतो. मग तो स्त्री असो वा पुरुष. इथं समानता असते.’’
पंढरीच्या वारीत दिड्यांच्या माध्यमातून लाखो भाविक चालतात. दिंड्यांमध्ये वारकऱ्यांच्या जेवणाची सोय असते.
दिंडीत दोनशे रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत भिशी घेतली जाते. त्यामध्ये सकाळी आंघोळीसाठी टॅंकरचे पाणी, राहायला तंबू आणि दुपारी व रात्रीचे जेवण दिले जाते, अशी यंत्रणा असते. या यंत्रणेसाठी स्वयंपाकाला महिला घेतल्या जातात.
त्या महिलांना काही विशिष्ट पैसे ठरवून दिले जातात. पण बहुतांश महिला या वारकरीच असतात. ज्यांना पायी वारी करता येत नाही. पण त्यांना या काळात वारीच्या मार्गावर राहायचे असते.
त्या महिला सकाळी पालखी निघाली की, स्वयंपाकाच्या वाहनात बसतात. मागे वारी बघत बघत, नामस्मरण ऐकत त्या वाटेवर वाटचाल करतात. दुपारच्या जेवणाच्या ठिकाणी पोचल्या की, मागून येणाऱ्या दिंड्यातील वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करतात.
स्वयंपाक करताना त्या पंढरीची गाणी, तसेच अभंग, हरिपाठ म्हणत म्हणत काम करतात. दिंडी आले की त्यांना गरम स्वयंपाक तयार असतो. दररोज भाज्या निवडणे, कांदा कापणे, चपात्या किंवा भाकरी करणे, तांदूळ निवडणे,
भांडी घासणे आणि भांडी गाडीत चढविणे, उतरवणे ही सर्व कामे महिला करतात. तसेच दुपारचे जेवण झाले की या महिला गाडीत बसून मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाकाला जातात.
भक्तीचे माध्यम वेगळे
आषाढी वारीत जो तो आपापल्या पद्धतीने परमार्थ करीत असतात. कोणी दिंडीत चालत नामस्मरण करीत पायी चालून वारी करतात. कोणी वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करून तर कोणी तंबू टाकून वारीच्या वाटेवर राहतात.
जो तो आपापल्या पद्धतीने वारीची संकल्पना जगतो. नामस्मरण करणारे कायिक, वाचिक, मानसिक साधना करतात. तसेच हे सेवेकरीही वारकऱ्यांची सेवा करण्यात आपली वारी झाल्याची भावना जगतात.
त्यामुळे ते करीत असलेले काम हे कायिक साधनेचा भाग ते मानतात, जे काम करतात, त्यामध्ये ते त्यांना जमेल त्या प्रमाणात नामस्मरण करतात. तर अखंड पंढरीचा ध्यास धरणे ही मानसिक साधना हे अन्य काम करणाऱ्या वारकऱ्यांची होते. त्यामुळेच या वारीच्या वाटेवर प्रत्येक जण वारकरीच असतो. भक्ती करण्याचे माध्यम वेगळे आहे.
वारीत निराळीच ताकद
कारभारी आजी म्हणाल्या, ‘‘महिलेला घरी असो वा बाहेर स्वयंपाकाचे काम करीतच असतात. पण दोन्ही कामात फरक आहे. घरी थोडे काम केले तरी ते कंटाळवाणे होते. पण वारीत घरच्यापेक्षा जास्त काम होते.
पण तरी आनंद वाटतो, ही माउलीची कृपा आहे. मी किती वर्ष वारीत येते, हे आठवत नाही. या वारीत वारकऱ्यांची सेवा हीच माउलींची सेवा मानून काम करतो, म्हणून त्यात त्रास वाटत नाही.
गाडीत बसल्यानंतर शेजारून चालणाऱ्या वारीतील भजन ऐकत जायचे आणि थांबल्यावर चालत चालणाऱ्या वारकरी माउलींसाठी गरमागरम जेऊ घालायचे. ते जेवण करताना अभंग, विठुरायाची गाणी म्हणत राहायची. वारीत निराळीच ताकद येते.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.