ashadi wari kartiki wari pandharpur culture sant tukaram maharaj sakal
संस्कृती

Wari Of Pandharpur : कार्तिकी वारीचा बोनस

काटेकोर वारकरी आचारात प्रत्येक वर्षाच्या महिन्याची वारी म्हणजे शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणे अपेक्षित

डॉ. सदानंद मोरे

पंढरीच्या वारीसंबंधी तुकोबांच्या अभंगाच्या एका कडव्याकडे लक्ष वेधू इच्छितो. ते म्हणतात, ‘‘सुखे करावा संसार। न संडावे दोन्ही वार। दया क्षमा घर चोजवित येतील।।’’ या कडव्यातील ‘न संडावे दोन्ही वार’ या शब्दसमूहाने निर्दिष्ट केलेले दोन वार म्हणजे पंढरीच्या दोन वाऱ्या. आषाढी आणि कार्तिकी.

काटेकोर वारकरी आचारात प्रत्येक वर्षाच्या महिन्याची वारी म्हणजे शुद्ध एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणे अपेक्षित आहे. हा आचारधर्म पाळणारे अनेक वारकरी आहे; पण व्यावहारिक दृष्ट्या ते प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही.

मग येथे वारकरी संप्रदायाची लवचिकता लक्षात येते. वारकरी संप्रदायात आषाढ आणि कार्तिक या दोन महिन्यांच्या एकादशींना विशेष महत्त्व आहे. त्याचा संबंध कदाचित आषाढी म्हणजे देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि कार्तिकी म्हणजे प्रबोधिनी एकादशीला देव जागे होतात.

या पारंपारिक समजुतीशी असणे शक्य आहे. हा चार महिन्यांचा काळ पारंपरिक धर्मविचारात चातुर्मास म्हणून ओळखला जातो. हा वर्षाऋतूचा अर्थात पावसाळ्याचा काळ असल्याने बौद्ध व जैन धर्मांतही साधकांनी भ्रमण थांबवून एकाच ठिकाणी वास्तव्य करणे विहित आहे.

ते काहीही असो. या दोन एकादशींना महत्त्व आहे. बाराही महिन्यांची वारी शक्य नसेल तर किमान आषाढी व कार्तिक अशा दोन वाऱ्या कराव्यात हा एक पर्याय.

हा पर्याय पत्करणाऱ्यांसाठी तुकोबा सांगतात- ‘‘आषाढी निकट। आला कार्तिकीच्या हाट।। पुरे दोन्हीच बाजार। न लगे आणिक व्यापार।।’’ आषाढी वारीनंतर अल्पावधीतच म्हणजे चारच महिन्यांनी कार्तिकीची वारी असते. या दोन वाऱ्यांना तुकोबा बाजाराची उपमा देतात. या दोन वाऱ्या म्हणजे जणू दोन हाट, दोन बाजार.

गावात अजूनही आठवड्याचा बाजार विशिष्ट दिवशी भरत असतो. गावातले लोक या दिवशी बाजारात जाऊन आठवड्याला पुरतील अशा आवश्यक वस्तू विकत घेऊन घरी येतात व या बेगमीबर आठवडा घालवतात.

तुकोबा सांगतात की आषाढ आणि कार्तिक या दोन महिन्यांत पंढरपूरला भरणाऱ्या बाजारात तुम्ही जा आणि तुम्हाला आवश्यक असणाऱ्या वस्तू घेऊन या. या दोन बाजारांमधील खरेदी तुम्हाला वर्षभर पुरेल. असो, आता मुद्दा ज्यांना अशा प्रकारे या दोन वाऱ्या करणे जमणार नाही, त्यांच्यासाठी निवडीचा पर्याय उपलब्ध आहे. त्यांनी दोनपैकी कोणतीही एक वारी करावी.

वारकरी संप्रदायात प्रविष्ट होण्याचा म्हणजे वारकरी दीक्षा घेण्याचा विधी सोपा आणि सुटसुटीत असतो. कोणताही वारकरी, वारकरी व्हायला तयार असलेल्या व्यक्तीला अशी दीक्षा देऊ शकतो.

ज्ञानेश्वरी किंवा गाथेवर तुळशीची माळ ठेवली जाते व ती माळ प्रवेशेच्छूच्या गळ्यात ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर करीत घातली जाते. त्याला रामकृष्णहरी मंत्राचा जप करायला, गाथा ज्ञानेश्वरी वाचायला सांगितले जाते आणि कोणती वारी करणार हे विचारले जाते. तो आपली निवड आपल्या सोयीने सांगतो आणि त्यानंतर आयुष्यभर ती पाळतो.

मुख्य मुद्दा वेगळाच आहे. वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासून शेतकऱ्यांच्या आणि शेतीशी संबंधित व्यावसायिकांचा राहिला आहे. त्यामुळे त्यांची सोय महत्त्वाची.

मोसमी पावसाचे वेळापत्रक तो ‘नियमेचि येता’ असे गृहित धरले तर शेतकरी वारीस निघतात तेव्हा सहसा पाऊस पडून गेलेला असतो व पेरणीसाठी आवश्यक असा अनुकूल वाफसा झालेला असतो. तेव्हा हे शेतकरी पेरणी करूनच वारीला निघतात. वारी करून ते परत येतात त्या दरम्यान पीक पहिल्या खुरपणीला आलेले असते.

कोकणातील पीकपाण्याची परिस्थिती थोडी वेगळी असते त्यामुळे त्यांना आषाढीपेक्षा कार्तिकी वारी सोयीची वाटते. त्यामुळे कोकणातील वारकरी सहसा कार्तिकी वारीचा पर्याय निवडायचे. त्याचा एक फायदा म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशी पंढरीत व्यतीत करून आळंदीची वद्य वारी करता येते. हा बोनसच की!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT