उंडवडी : रस्ता रुंदीकरणामुळे सुखकर… पण उन्हामुळे घामाच्या धारांमध्ये चिंब झालेल्या वारकरी... दमछाक करणारी आजची वाटचाल ठरली. पखवाजातून निघणारा ‘तुकाराम तुकाराम’ असा बोल,... त्याला टाळ आणि मुखातून निघणारा जयघोषाची जोड होती. असा भक्तीत तल्लीन झालेला सोहळा रोटी घाट पार करून उंडवडीच्या माळरानावर संध्याकाळी मुक्कामी थांबला. दरम्यान, सोहळा उद्या रविवारी बारामतीत जाणार आहे.
देवस्थानच्या वतीने पादुकांना अभिषेक केला. त्यांनतर काकड आरतीचे अभंग म्हणत सोहळा पाटसला विसाव्याला पोचला. सोहळा आजपर्यंत पुण्याहून सोलापूर महामार्गाने सरळ निघालेला. पाटस येथून काटकोनात वळाला आणि बारामतीच्या दिशेने चालू लागला.
सोहळा साडे अकरा वाजता रोटीघाट चढू लागला. घाट रस्ता पूर्वी वळणावळणाचा होता. अरुंद होता. पालखी महामार्गामुळे यंदा रस्त्याची रुंदी सहापदरी झाली आहे. परिणामी आजची वाटचाल सुखकर होती. पण यावर्षी घाटात पाऊस झालाच नाही.
यामुळे वाटचाल संथ गतीने सुरू होती. ‘श्रीविठ्ठल, संत तुकाराम’ यांचा जयघोष दिंड्या दिंड्यामध्ये सुरू होता. घाट पार केल्यावर सोहळा गावाच्या वेशीवर पोचला. सोहळ्याचे चोपदार नामदेव गिराम यांनी देहूकर मालकांच्या सूचनेनुसार अभंग आणि आरतीसाठी सोहळा थांबविला. चोपदारांनी रथावरुन चोप उंचावला. तशी स्तब्ध शांतता पसरली. त्यांनी
तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा ।
आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥१॥
नवविधा काय बोलिली जे भक्ती ।
घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ||२||
तुका म्हणे तुमच्या पायांच्या आधारें।
उत्तरेन खरें भवनदी |॥ ३ ॥
हा मानाचा अभंग घेतला. अभंगानंतर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची आरती झाली. दीडच्या सुमारास सोहळा रोटी गावात दुपारच्या जेवणासाठी पोचला. रोटी गावाजवळ उड्डाणपूल झाल्याने काही दिंड्यांचे तळ थोडे मागे पुढे झाले आहेत. दुपारचा विसावा घेऊन सोहळा संध्याकाळी उंडवडीच्या माळरानावर विसावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.