।। जय श्रीराम ।।
अयोध्येतल्या राम मंदिरात रामललाची आज (ता. २२) प्रतिष्ठापना आहे. भारतीय परंपरेनुसार धार्मिक कार्यामध्ये 'हवन यज्ञ' केला जातो. यात हवन कुडामध्ये विविध प्रकारच्या 'समिधा' वापरतात. या समिधा आणि त्यांच्या गुणधर्माविषयी...
- डॉ. कांचनगंगा गंधे (पुणे), - श्री. अशोक कुमार सिंग, विशेष अधिकारी, गृह खाते (लखनौ)
भारतीय संस्कृतीमधील अनेक धार्मिक विधींमधून, रिवाजांमधून निसर्गतत्त्वांचं, सिद्धांतांचं दर्शन घडतं! ते अबाधित राखण्यासाठीच ऋषीमुनींनी अनेक परंपरांची निसर्गचक्रानुसार आखणी केली. त्यात अनेक सजीव (वनस्पती, प्राणी) आणि पंचमहाभूतांना देवत्व बहाल केलंय, त्यांना पूजनीय मानलंय! ज्यांचा मूलभूत आधार वैज्ञानिक/शास्त्रीय आहे.
यज्ञ पूजा ही अनेक परंपरांपैकी एक वैदिक परंपरा! ज्यात पंचमहाभूतांपैकी एक असलेल्या ‘अग्नी’ची पूजा पवित्र वनस्पतींच्या काष्ठांच्या आहुतीने ‘ज्वाला’ निर्माण करूनच केली जाते. ही काष्ठ म्हणजेच ‘समिधा.’
समिधांच्या आहुतींचा स्वीकार ‘अग्नी देवता’ करते आणि तो देवांपर्यंत पोहचवला जातो, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. आहुती ही एक ऊर्जा आहे. तिचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होऊन ती (अग्नी) म्हणजेच वैश्विक ऊर्जेत मिसळून जाते. समिधांचे उल्लेख वेदांपासून पुराण, प्राचीन वाङ्मय, रामायण, महाभारतासारख्या महाकाव्यात आहेत.
वाल्मीकी रामायणाच्या बालकांडात ‘समिधा’चा उल्लेख आहे.
वेगवेगळ्या धार्मिक विधी-रिवाजांसाठी विशिष्ट प्रकारच्या समिधांचा समावेश केला जातो. प्राचीन काळी ‘गुरुकुल’ पद्धतीमध्ये ‘समिधा’ कोणत्या व कशा गोळा करायच्या याचाही उपदेश ऋषीमुनी करत असत. वृक्षाच्या वाळलेल्या आणि खाली पडलेल्या, न कुजलेल्या, किड्यांनी, बुरशींनी न पोखरल्या गेलेल्या आणि कडक फांद्यांचे तुकडे ‘समिधा’ म्हणून वापरण्यात येत असत.
यातून अप्रत्यक्षपणे वृक्षाचे जतन केले जात होते, वाळलेल्या काष्टांचा उपयोग केला जात असे. शमी, पिंपळ, वड, औदुंबर, तगर, देवदार, बेल, आंबा, पळस, निरगुडी, गुळवेल, आवळा, चंदन अगर दर्भ, रुई, खैर, आघाडा अशा अनेक वृक्ष आणि लहान वनस्पतींची काष्ठ यज्ञात वापरली जातात.
कापूर, गायीच्या शेणाच्या गोवऱ्या शिवाय तूप, तीळ, मध, धान्य, काळी मोहरी, ऊस, कडधान्य अशी अनेक ‘हविद्रव्य’ यज्ञात आहुती देताना वापरतात. यज्ञ कुंड तयार करताना शेणीच्या लाकडाचा उपयोग करतात. कुंडात तळात वाळलेलं गवत आणि रुईचा कापूस पसरतात.
ते ‘अरणी मंथन काष्ठानी’ खूप घुसळतात. त्याला खालून हवा सोडली जाऊन ‘अग्नी’ प्रज्वलित करतात. ‘अरणी मंथन काष्ठ’ हे शमी (खेजडी) किंवा पिंपळ किंवा शमीच्या खोडात पिंपळ उगवल्यास त्या दोहांच्या काष्ठातून बनवलं जातं.
शमीला पुराणामध्ये ‘अग्नीचं स्वरूप’ मानतात. ‘शमी’ हा वृक्ष कमी पाण्याच्या भागातही चांगला टिकून राहतो. त्यामुळे त्याच्या काष्ठात कणखरपणा असतो, लाकडातल्या पेशींमध्ये पाण्याचं प्रमाण कमी असतं.
काष्ठ बनताना पेशींमधलं पाणी लवकर कमी होतं आणि काष्ठ लवकर वाळतं. त्यामुळे शमीची ‘समिधा’ लवकर प्रज्वलित होते. पिंपळाचं काष्ठ थोडं सच्छिद्र असतं, काष्ठात पाणी नसतं; पण हवा खेळती राहिल्यामुळे यज्ञातला अग्नी बराच काळ धगधगता राहतो.
‘समिधा’ म्हणजेच काष्ठ. त्यात जिवंत पेशी नसल्यामुळे पाण्याचं प्रमाण नसतंच; पण पेशींवरचं आवरण ‘सेल्युलोज’ या ‘बायोपॉलिमर’चे बनलेले असल्यामुळे ‘समिधा’ कडक राहतात. यज्ञ प्रज्वलित होतो, तेव्हा ‘सेल्युलोज’मधील ऊर्जेचं रूपांतरण उष्मीय ऊर्जा’ आणि प्रकाशऊर्जेत होतं! त्या वेळेस १,१२,००० कॅलरी इतकी उष्णता बाहेर पडते आणि तापमान ५०० डिग्री फॅरनहाइटपर्यंत वाढतं!
काष्ठातल्या काही घटकांचं रूपांतर ‘बायो ऑइल’मध्ये होऊन ते यज्ञासाठी पूरकच ठरतं! विविध प्रकारच्या समिधांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रासायनिक घटक (फायटोकेमिकल्स) असतात. अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर या घटकांची वाफ होऊन हवेत मिसळते. कार्बनडाय ऑक्साइड आणि काही प्रमाणात पाण्याची वाफही तयार होते.
फायटोकेमिकल्समुळे कार्बनडाय ऑक्साइडचं प्रमाण कमी होते, वातावरणातले जिवाणू, विषाणू, किडे मरतात. त्यामुळे हवा शुद्ध होते. त्यामुळेच ‘सकारात्मक ऊर्जा’ तयार होऊन मन प्रसन्न होतं! आंब्याच्या काष्ठांची आहुती दिल्यावर त्यातून ‘फॉरमिक अल्डीहाईड’ हे फायटोकेमिकल्स वायूरूपात बाहेर पडतात. त्यामुळे अनेक घातक जिवाणूंचा नाश होतो.
आघाड्यामुळे ‘स्ट्रेपटोकॉकस’सारखे घातक जिवाणू मरतात. कडूलिंबाच्या समिधांमुळे वातावरणातले अनेक किडे मरतात. वड, पिंपळाच्या समिधांमुळे क्युलेक्स, ॲनाफेलिस डास, त्यांच्या अळ्या मरतात.
देवदार, बिल्वमुळे हवेतल्या सूक्ष्म जिवाणूंचा, विषाणूंचा नाश होतो. रुईच्या काष्ठांतील पांढरा चिक (Latex) जरी वाळला तरी तो आहुतीमध्ये चांगला पेट घेतो, किड्यांचा नायनाट होतो. चंदन अगर या समिधांमधून ‘टर्पिन्स’सारख्या सुगंधी रासायनिक घटकांचं वायूत रूपांतर होऊन तो हवेत मिसळला जाऊन वातावरण सुगंधी होतं!
कापूर, लवंग यांच्या समिधांमधून तेल बाहेर पडतं, त्यांच्या वाफेमुळे घशाचे आणि श्वसनाचे विकार कमी होतात. याशिवाय केशर, जटामांसी, नारळ, तीळ, जायफळ, नागकेशर, नागरमोथा यांच्यातल्या विशिष्ट रासायनिक घटकांची वाफ होते. त्या वाफेत माणसाचं आरोग्य निरोगी राखण्यासाठीचे अनेक औषधी गुणधर्म आहेत.
यज्ञ प्रज्वलित ठेवण्यासाठी समिधांबरोबर काही ‘हविद्रव्ये’ही वापरतात. त्यात मुख्यत्वेकरून शुद्ध तुपाचा समावेश असतो. तुपाच्या वाफेत ‘हायड्रोकार्बन्स’चे प्रमाण जास्त असते. तुपाच्या या धुमाऱ्यातले हायड्रोकार्बन्स जळल्यानंतर काही प्रमाणात ‘फॉरमलडिहाईड’ या रासायनिक घटकात होऊन ते घातक जिवाणूंचा, विषाणूंचा नायनाट करतात. गायीच्या शेणाच्या गोवऱ्यांमध्ये मेन्थॉल, अमोनिया, फेनॉल-फॉरमॅलिनसारखे काही रासायनिक घटक असल्यामुळे हवेतले किडे, रोगजंतू मरतात.
यज्ञ प्रज्वलित झाल्यामुळे साहजिकच धुराचे आणि कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण जास्त असणार; परंतु समिधांमधल्या घटकद्रव्यांमुळे आणि त्यांचे वाफेत रूपांतर होऊन ती वाफ, वायू हवेत मिसळल्यामुळे कार्बनडाय ऑक्साइडची तीव्रता कमी होते.
यात सुगंधी द्रव्यांची वाफ, ॲन्टिसेप्टिक घटकांची वाफ मिसळली जाते. त्यामुळे दूषित हवा कमी होऊन हवा शुद्ध होते. यज्ञाची पूर्तता झाल्यावर यज्ञ कुंडात जे भस्म राहतं ते पाण्यात मिसळून झाडांना घातलं तर झाडांना अनेक अन्नघटक मिळतात शिवाय त्यांचे गुणधर्म वाढतात.
आपल्या प्राचीन संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी-ऋषीमुनींनी ‘यज्ञपूजा’ या वैदिक परंपरेतून निसर्गतत्त्व अबाधित ठेवून मानवाचं मन आणि आरोग्यही निकोप ठेवलं!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.