अभिनेता आदिनाथ कोठारेने मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. आता त्याचा चंद्रमुखी हा मराठी चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. निर्माते अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर प्रसाद ओक दिग्दर्शक आहे. आदिनाथ या चित्रपटात राजकारणी दौलत देशमानेची भूमिका साकारीत आहे. याबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत.
जाॅनरपेक्षा कथेला महत्त्व
* चंद्रमुखी या चित्रपटातील भूमिकेबद्दल तुम्ही काय सांगाल?
- खासदार दौलत देशमाने असे माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. तो एक आघाडीचा तडफदार, भारदस्त, देहवेडा व्यक्तिमत्त्वाचा नेता आहे. तो कलेचा खूप मोठा प्रेमी असतो. त्याच्या आयुष्यात घडणार्या सगळ्या गोष्टी तो उत्कटतेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. वैयक्तिक काम असो किंवा राजकीय तो स्वतःला त्या कामात झोकून देत असतो. या कालावधीत तो एका तमाशा कलावंतीणला भेटतो. तिचं नाव चंद्रमुखी असतं, ती कलेची जोपासक असते. तिच्या अंगी सुंदर नृत्य सादर करायची कला असते आणि एका प्रसंगी तो तिच्या अखंड प्रेमात बुडालेला असतो. त्या दोघांमध्ये खूप काही गोष्टीचं साम्य असतं. ती देखील उत्कटतेने काम करणारी असते. कला प्रेमी असते. स्वतःला झोकून ती आपल्या कलेची जोपासना करते. त्यांच्यामध्ये हळुवार प्रेम खुलत जातं. मग त्यानंतर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या राजकीय आणि खाजगी वादळाला ते कसे सामोरे जातात ते प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
दिग्दर्शक प्रसाद ओकने जेव्हा मला हा चित्रपट ऑफर केला होता तेव्हा पहिला लाॅकडाऊन उघडणार होता. तेव्हा त्याने मला विचारलं की कोणत्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेस का? मी म्हटलं दोन मराठी सिनेमाची बोलणी सुरू आहेत. तसेच सिटी ऑफ ड्रीम्स 2 या सिरीजचे थोडे शूटिंग बाकी आहे. त्यानंतर मी प्रसादला जाऊन भेटलो तेव्हा त्याने चंद्रमुखीची कथा सांगितली. माझे पात्र दौलत देशमानेबाबत सांगितले. ती गोष्ट ऐकून माझे डोळे दहा पटीने मोठे झाले होते. कारण एक अभिनेता म्हणून अशा भूमिकेची मी खूप वर्षांपासून वाट पाहत होतो. आणि ती भूमिका मला साकारण्याची संधी मिळते हिच खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा सगळे प्रोजेक्ट मी बाजूला ठेवले आणि या चित्रपटासाठी होकार दिला.
* या चित्रपटासाठी तुम्ही विशेष अशी काय तयारी केली ?
- प्रसाद ओकने जेव्हा मला या चित्रपटाची ऑफर दिली तेव्ह, त्याने मला सांगितले की या चित्रपटातील पात्रासाठी शरीरयष्टी वाढवावी लागेल. तेव्हा लॉकडाऊन लागल्यामुळे जिम बंद होते. तेव्हा माझा मित्र फिटनेस गुरू शैलेश परुळेकर याची साथ मला मिळाली. त्यावेळेला मी त्याला लगेचच संपर्क साधला. त्याला मी या पात्राची कल्पना दिली. त्याच्या घरीच जिमची साधनं उपलब्ध होती आणि तिथे पोहोचण्यासाठी मी लपूनछपून त्याच्या घरी जात होतो. दोन महिने मी खूप वर्कआऊट केले. आणि ही नक्कीच एक गमतीदार आणि आव्हानात्मक गोष्ट माझ्यासोबत घडली. याव्यतिरिक्त मी अनेक नेत्यांची आत्मचरित्रे वाचली. या चित्रपटात ऐंशीचा काळ दाखवण्यात आला आहे आणि त्याच काळातील नेत्यांचा मी आढावा घेतला. तेव्हा मी यशवंतराव चव्हाण यांची कृष्णकाठ हे पुस्तक वाचले. विशेष म्हणजे प्रसाद ओक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ते एक उत्तम दिग्दर्शक तर आहेतच, सोबतच एक उत्तम नट देखील आहेत. आणि एक नटच दुसऱ्या नटाला समजून घेऊ शकतो असं मला वाटतं. त्यांनी पूर्णपणे आम्हाला साथ दिली. व्यक्तिरेखा साकारायची कशी आणि त्यात वैविध्यता कशी आणता येईल या सगळ्या गोष्टी बारकाईने शिकवत होते.
*ही भूमिका साकारताना तुम्हाला कोणत्या आव्हानाला सामोरे जावे लागले ?
- माझ्यासमोर खूप सारे आव्हानं होती. परंतु सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे लॉकडाऊनचे. या लॉकडाऊनमध्ये अनेक अडचणी येत होत्या. परंतु आमच्या टीमने न डगमगता सिनेमा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वात मोठे आव्हान आमच्या निर्मात्यांसमोर उभे होते. ते म्हणजे सिनेमा लॉकडाऊननंतर प्रदर्शित करणे. कारण कोणालाच माहीत नव्हतं की, लॉकडाऊन कधी उठेल. कारण लॉकडाऊनच्या काळात चित्रपटाचे शूट जसे निर्बंध उठायचे तसे आम्ही करत होतो. मात्र, हा चित्रपट पूर्ण निर्बंध उठल्यानंतरच प्रदर्शित होणार या मतावर या चित्रपटाचे निर्माते ठाम होते. आता प्लॅनेट मराठीचे संस्थापक व या चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी जेव्हा 100 टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत चित्रपटगृहे खुली झाली तेव्हाच त्यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचे ठरवले. या चित्रपटासाठीआम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे.
* या चित्रपटातील सहकलाकार अभिनेत्री अमृता खानविलकरबरोबर काम करतानाचा अनुभव सांगा.
-अभिनेत्री अमृता खानविलकर ही बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील उत्तम कलाकार आहे. त्याहून उत्तम ती एक व्यक्ती आहे. ती नेहमीच मदत करते. ती सेटवर नेहमीच आपल्या सहकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना नेहमी मदत करत असते. तिचा फ्रेंडली स्वभाव आहे. खूप सपोर्ट करते. या चित्रपटाच्या वर्कशॉपच्या पहिल्या दिवसापासून आमची चांगली गट्टी जमली. आमची मैत्री आणि उत्तम केमिस्ट्री या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात शंका नाही.
* तुम्ही आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तुम्हाला आतापर्यंत कोणता जॉनर सर्वात जवळचा वाटला ?
-आतापर्यंत मी साकारलेल्या सगळ्याच भूमिका मला आवडलेल्या आहेत. जॉनरपेक्षा मी चित्रपटातील कथेला महत्व देतो. सध्या मी ज्या भूमिकेची वाट बघत होतो ती भूमिका मला साकारायला मिळाली हेच मोठं आहे माझ्यासाठी. चंद्रमुखी हा चित्रपट प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित आहे. आणि ही कादंबरी खूप गाजलेली आहे. या चित्रपटाची कथा खूप छान आहे. चंद्रमुखी या कादंबरीवर प्रेरित होऊन प्रसाद ओक आणि चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटाचे कथानक मांडले. ही कथा लोकांचे मनोरंजन करेल यात शंका नाही. या चित्रपटात निखळ प्रेमकथा मांडण्यात आली आहे. माझ्यासाठी हा सिनेमा खूप जवळचा आहे.
* तुमच्या आगामी प्रोजेक्टबद्दल काय सांगाल?
-सध्या मी एका खूप मोठ्या वेबसिरीजचं काम हाती घेतलेलं आहे. ही वेबसिरीज हॉटस्टारसाठी केलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.