Dr Balaji Tambe Sakal
संस्कृती

स्मरण संस्कृतीचे... : आध्यात्मिक गुरुवर्य

शिष्य आणि सद्‌गुरू यांच्यातील एकत्वाची, अद्वैताची ग्वाही देणारा हा श्र्लोक. कोणत्याही परिस्थितीत, कुठल्याही संकटात आपल्याबरोबर असतात, मनातील भीती नष्ट करून श्रद्धेची स्थापना करतात.

श्रीगुरू बालाजी तांबे

‘मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी,

तेथे तुझे सद्‌गुरु पाय दोन्ही’

शिष्य आणि सद्‌गुरू यांच्यातील एकत्वाची, अद्वैताची ग्वाही देणारा हा श्र्लोक. कोणत्याही परिस्थितीत, कुठल्याही संकटात आपल्याबरोबर असतात, मनातील भीती नष्ट करून श्रद्धेची स्थापना करतात, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवितात ते सद्‌गुरू! आत्मसंतुलनमधील संतुलन परिवाराचे तसेच देश-विदेशांतील असंख्य शिष्यांचे श्रीगुरू बालाजी तांबे खऱ्या अर्थाने ‘सद्‌गुरू’ आहेत.

त्यांच्या वडिलांनी खरंतर संन्यास घ्यायचं ठरविलं होतं, गुरुगृही त्यांची साधना सुरू होती. वयाच्या ३६व्या वर्षी त्यांना गुर्वाज्ञा झाली, ‘संन्यास न घेता गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि ज्येष्ठ पुत्राला माझ्या पदरी घालावे, त्याच्या हातून मोठे कार्य व्हायचे आहे, तशी परमेश्र्वरी योजना आहे.’ गुर्वाज्ञेला शिरोधार्य समजून तांबेशास्त्रींनी विवाह केला आणि श्रीगुरूजींचा जन्म झाला. श्रीगुरूजींचे वडील सांगत, ‘जन्मतः श्रीगुरूजींच्या कपाळावर केशरी टिळा होता, जो हळूहळू अस्पष्ट होत गेला.’

श्रीगुरूजींचे असामान्यत्व लहानपणापासून दिसू लागले. बोलता यायला लागल्यावर छोटे श्रीगुरूजी कोणीही न शिकविलेले वेदमंत्र म्हणत असत, तेही अस्खलितपणे. अगदी बालवयात श्रीगुरूजींनी श्रीहनुमानमूर्तीची पूजा करण्यास सुरुवात केली, चार विटांचे छोटे मंदिर बांधले. श्रीगुरूजींचे वडील सांगत, ‘इतर मुले दंगामस्ती करतात, त्या वयात बाळाजी हनुमंतांच्या पूजेत रमत असे.’

लहानपणापासून श्रीगुरूजी वडिलांसह गरुडेश्र्वर येथील दत्तस्थानी जात. तेथील दत्तमंदिरात तसेच परमपूज्य श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांच्या समाधीमंदिरात तास न् तास ध्यानस्थ बसत. अध्यात्माला वयाचं बंधन नसतं, असं श्रीगुरूजी नेहमी सांगत. उलट, जेवढ्या लहान वयात अध्यात्माचे संस्कार होतील तेवढं जगणं सोपं होतं. भगवे कपडे, रुद्राक्षांच्या माळा या अध्यात्मकल्पनेच्या पलीकडे जाऊन त्यांनी अध्यात्मातही विज्ञान पाहिलं. ‘मुळात विज्ञानाची आवड आणि त्यात मी अध्यात्माचा अभ्यासक, त्यामुळे अध्यात्माचेही काही विज्ञान आहे का, शतकानुशतके टिकलेल्या अध्यात्माचं आणि माणसाचं असं कोणतं वैज्ञानिक नाते आहे?’ या प्रश्र्नांवर त्यांचे चिंतन सुरू असे.

अध्यात्मक्षेत्रात उपासनेला महत्त्व असते, मात्र त्यासाठी प्रत्येकाला संन्यास घेण्याची, कुठेतरी गुहेत जाऊन बसण्याची आवश्यकता नाही असंही ते सांगत. त्यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘सद्‌गुरूंच्या मार्गदर्शनानुसार उपासना करण्याबरोबरीने दैनंदिन जीवन नैसर्गिकपणे जगलं, उपासनेला ज्ञानाची जोड दिली, त्या ज्ञानाच्या मदतीने ईश्र्वरकार्याला हातभार लावला, आपापल्या कर्तव्यांचे पालन केलं तरच आपल्या लक्ष्यापर्यंत पोचू शकतो.’ स्वतः श्रीगुरुजींचं जीवन असंच होतं. भक्तियोग, ज्ञानयोग आणि कर्मयोग यांच्यातील संतुलन त्यांनी आयुष्यभर साधलं.

श्रीमद्‌भगवद्‌गीतेवर त्यांची असीम श्रद्धा होती. गीतेतील मार्गदर्शन सांप्रत काळातही कसं अनुकूल आहे, जीवनाच्या महाभारतात अर्जुनाच्या भूमिकेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला श्रीकृष्ण आजही समर्थ कसे बनवू शकतात, हे समजण्यासाठी गीतेवरील निरूपण सर्वांसाठी ‘संजीवन’स्वरूप ठरावे. श्रद्धा आणि विश्र्वास यातील फरक त्यांनी उत्तमरित्या सांगितलेला आहे. इंद्रियांनी समजू शकतं, त्यावर विश्र्वास ठेवता येतो. मात्र जे इंद्रियगम्य नसतं, तरीही अनुभवता येतं, त्यावरचा विश्र्वास म्हणजे श्रद्धा. एकवेळ विश्र्वास तुटू शकतो, श्रद्धा मात्र दृढ असते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेमध्ये ‘निरंतर’ शब्द अनेकदा वापरला आहे. ध्यान असो, उपासना असो, कर्तव्य असो, ते निरंतर करण्यानेच भगवद्प्राप्ती होते असं श्रीकृष्ण सांगतात. श्रद्धा सुद्धा निरंतर असली तर भवसागरातून तारून नेण्यास समर्थ असते.

आगगाडी धावण्यासाठी दोन समांतर रूळ लागतात. एकाच बाजूच्या रुळाची देखभाल केली, दुसऱ्याकडे दुर्लक्ष झाल्यास गाडी धावणार नाही, तसंच जीवनात भौतिकता आणि आध्यात्मिकता या दोहोंकडे समदृष्टीने पाहावे लागते. यासाठी श्रीगुरुजींनी ॐकार उपासना समजावली, जी ‘कामदं’ आणि ‘मोक्षदं’ असे दोन्ही लाभ देणारी असते. दैनंदिन व्यवहारात आवश्यक असणाऱ्या समृद्धीचा लाभ म्हणजे ‘कामदं’ परंतु त्यात न गुंतता मुक्त होण्यासाठी लागणारी प्रेरणा व बुद्धी होणे म्हणजे ‘मोक्षदं’.

श्रीगुरूजी सांगत, दुसऱ्याच्या मनाला ज्यामुळे वेदना होतात, दुःख होतं ते पाप, तर गरज असणाऱ्याला मदत करणं, आश्र्वस्त करणं हे खरं पुण्य. श्री नरसी मेहता यांचे ‘वैष्णव जन तो तेने कहिये जे पीड पराई जाणे रे’ हे श्रीगुरूजींचे आवडते भजन. दुसऱ्याचे दुःख जाणणे, ते दूर करण्यासाठी यथाशक्ती मदत करणे आणि केलेल्या मदतीचा मनात अभिमान न बाळगणे हे ज्यांना जमते, ते खरे संत, ही खरी आध्यात्मिकता. श्रीगुरूजी असंच जगले. रुग्ण असो की शिष्य, स्नेही असो की लाभार्थी, त्यांनी सर्वांनाच भरभरून दिलं. जनताजनार्दन हेच खरं देवाचे स्वरूप ही भावना त्यांच्या प्रत्येक कार्यातून साकारली.

श्रीगुरूजी सांगत, अध्यात्ममार्गावरील प्रेरणा म्हणजे ‘श्रद्धा’ तर अडथळा आणणारे दोन राक्षस म्हणजे ‘शंकासुर’ व ‘सबबेश्र्वर’. मनात शंका आल्यावर तेथे श्रद्धेला स्थान नाही. सबब द्यायची सवय लागल्यास तेथे अनुशासन तुटलेच, श्रीकृष्णांनी सांगितलेला ‘निरंतर’ हा भाव संपुष्टात आला. अध्यात्मशास्त्राचे लक्ष्य म्हणजे ‘निर्वाण’. ‘वाण’ म्हणजे काही तरी मिळणे. जेथे कशाचीही अपेक्षा नाही, सुख-दुःखाच्या, जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होण्याचीही जेथे इच्छा नाही, अशी अवस्था म्हणजे निर्वाण. सद्‌गुरुंच्या कृपेशिवाय या अवस्थेपर्यंत पोहोचणे शक्य नाही. सद्‌गुरु श्रीदत्तात्रेयांचा साक्षात्कार झालेल्या श्रीगुरूजींचे आशीर्वाद त्यांच्या शिष्यांना, अध्यात्ममार्गावरील सर्व साधकांना कायम मिळत राहो ही परमेश्र्वराच्या आणि श्रीगुरूजींच्या चरणी प्रार्थना!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT