Cow Cuddling Sakal
संस्कृती

गो पर्यटन नवीन संधी...

गोपालन करताना ते फक्त दूध उत्पादनासाठी न करता ती एक आपली परंपरा, संस्कृती आणि कर्तव्य आहे, असे समजून देशातील अनेक पशुपालक भारतीय गोवंश संगोपन करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. सोमनाथ माने

कृषी पर्यटन संकल्पना राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात रुजली आहे. त्याच्या पुढील टप्पा म्हणजे गो पर्यटन. शेती आणि देशी गोवंश संगोपनाला गोपर्यटनाची जोड दिल्यास निश्‍चितपणे आर्थिक उत्पन्नवाढीला चालना मिळणार आहे.

गोपालन करताना ते फक्त दूध उत्पादनासाठी न करता ती एक आपली परंपरा, संस्कृती आणि कर्तव्य आहे, असे समजून देशातील अनेक पशुपालक भारतीय गोवंश संगोपन करीत आहेत. देशातील प्रत्येक सण हा गोपूजनापासून सुरू करण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात गाई हा मानसिकदृष्ट्या सुखावणारा अविभाज्य घटक आहे. आजही अनेक शेतकरी भारतीय गाय कमी दूध देत असली तरी त्यांचे संगोपन, संवर्धन अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे करतात. त्यापासून मिळणारा फायदा किंवा तोटा याचे मूल्यमापन करीत नाहीत. याचेच उदाहरण म्हणजे पश्‍चिम महाराष्ट्राची संस्कृती म्हणून संगोपनात असणारी खिलार गाय. त्यामुळे गोपालन करताना फक्त दूध उत्पादन यापेक्षा आपली संस्कृती, भावना, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या सर्व गोष्टींचा विचार केला जातो.

‘गो’ आधारित शेती

देशामध्ये देशी गोसंवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे करत असताना एक शाश्‍वत मार्ग शोधणे ही पुढील काळाची गरज आहे. ‘गो’ आधारित शेती हा शाश्‍वत शेतीच्या दृष्टीने व्यावहारिक मार्ग आहे. देशातील अनेक भागांमध्ये देशी गोपालन आधारित शेती केली जाते. त्यामध्ये प्रामुख्याने दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थ, शेण, गोमूत्राचा वापर जमीन आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.

याचबरोबरीने कृषी पर्यटनाच्या बरोबरीने गो पर्यटन ही संकल्पना शेतकऱ्यांनी पुढे आणणे गरजेचे आहे. आजही बहुतांश शहरी भागातील लोकांना शेतकऱ्यांचे सहजीवन, संस्कृती माहिती नाही. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी विविध भागांत आपली जुनी शेती अवजारे आणि त्या काळातील शेतीशी निगडित वस्तूंचे संग्रहालय असण्याची गरज व्यक्त केली आहे. याच अनुषंगाने शहरी व ग्रामीण समतोल राखण्यासाठी गो पर्यटन ही एक संधी शेतकऱ्यांच्या समोर आली आहे.

जमिनीचे आरोग्य, निसर्गाचे संवर्धन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी देशी गोपालन हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. बायोगॅसचा वापर करून कुटुंबाच्या स्वयंपाकासाठी इंधनाची उपलब्धता होते. बायोगॅस स्लरीमध्ये उपयुक्त जिवाणू संवर्धकाचे मिश्रण करून दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती शक्य आहे. यातूनही उत्पन्न वाढीला मदत होते.

देशी गोपालनातून व्यवसाय वृद्धी

१) देशी गाईपासून दुधाव्यतिरिक्त शेण, गोमूत्राची उपलब्धता होते. याचा सेंद्रिय खतनिर्मितीसाठी उपयोग होतो. त्याचबरोबरीने अलीकडे कुंडी, धूपकांडी, साबण, गोमय गणपती, फिनेल आणि गोमूत्रापासून विविध प्रकारचे अर्क बनवले जातात. अनेक शेतकरी पंचगव्यापासून जिवामृत तयार करतात. त्याचा सेंद्रिय शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

२) देशी गाईच्या दुधापासून शेतकरी दुग्धजन्य पदार्थ तयार करत आहेत. तूप तसेच पंचगव्य आधारित आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाते. याचीही स्वतंत्र बाजारपेठ विकसित झालेली आहे.

३) जागतिक तापमानवाढीच्या संकटामध्ये देशी गोवंश आधारित शेतीला प्राधान्य द्यावे लागणार आहे. याचे कारण म्हणजे देशी गोवंशाची विविध वातावरणांमध्ये तग धरून ठेवण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती. यामुळे जातिवंत पैदासदेखील येत्या काळात उत्पन्नाचे साधन ठरेल.

४) विविध देशांमध्ये अनेक वर्षांपासून भारतीय गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन सुरू आहे. याचे उदाहरण म्हणजे ब्राझीलमधील गीर आणि ऑस्ट्रेलिया, केनिया देशातील साहिवाल गोवंशाचे संवर्धन आणि संशोधन.

देशी गोवंश संवर्धन केंद्र

पुणे कृषी महाविद्यालयात देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र कार्यरत आहे. यामध्ये देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल, गीर, राठी, थारपारकर, लाल सिंधी तसेच महाराष्ट्रातील प्रसिद्ध खिलार, लाल कंधारी, देवणी, डांगी, गवळाऊ आणि कोकण कपिला गाई पाहावयास मिळणार आहेत.

त्याचप्रमाणे गो आधारित शेती, बैलचलित अवजारे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, शेण-गोमूत्र आधारित विविध वस्तू, खते, कीडनाशके, बायोगॅस, सौरऊर्जा प्रकल्प, चारा आणि औषधी वनस्पती उद्यानाची उभारणी करण्यात येत आहे. यातून गो पर्यटन प्रकल्प आकारास येत आहे.

‘गो’ आधारित पर्यटन

परदेशातील पशुपालकांनी ‘काऊ कडलिंग’ ही संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात राबविली आहे. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी गाईच्या सहवास महत्त्वाचा ठरतो, असे समजले जाते. त्यादृष्टीने दररोजची दगदग, ताणतणाव विसरून मन शांतीसाठी देशी गाईंचा सहवास ही संकल्पना महत्त्वाची आहे. यामध्ये देशी गोपालकांना चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शालान्त अभ्यासक्रमांमध्ये कृषी विषयाचा समावेश केला आहे. त्यामुळे लहान मुलांना शालेय जीवनापासून कृषी व कृषी संलग्न विविध विषयाची माहिती उपलब्ध होणार आहे. शहरातील शाळांना शेतीतील जैवविविधता दाखवण्यासाठी ‘गो टुरिझम’ महत्त्वाची भूमिका बजावू शकते. निसर्गातील ‘इको-सिस्टिम’चा अभ्यास करण्यासाठी गो टुरिझम व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे.

(डॉ. सोमनाथ माने, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे - ९८८१७ २१०२२)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT