ganesh chaturthi 2023 description of ganesh in Dnyaneshwari ganapati atharvashirsha esakal
संस्कृती

Ganesh Chaturthi 2023 : देवा तूंचि गणेशु। सकलमति प्रकाशु।

सकाळ वृत्तसेवा

श्री गजानन हे दैवत आपल्या सगळ्यांचेच आराध्य आहे. गणपती अथर्वशीर्षात गणेशाचं वर्णन आणि स्तुती करताना ‘त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी’ असा उल्लेख आहे. सकल विश्वाचं मर्म जाणणारं ते ज्ञान आणि विश्वातील विविध घटनांमागचा कार्यकारणभाव आणि ते घडण्यामागचं चक्रं अभ्यासणारं ते विज्ञान.

डॉ. जयदेव पंचवाघ

श्री ज्ञानेश्वरीत ‘देवा तूची गणेशु, सकलमती प्रकाशु’ असा संत ज्ञानेश्वरांनी श्री गजाननाचा गौरव केलेला आपल्याला दिसतो. ‘ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञानभ्रांती छेदका, बोधरुपा,’ अशी समर्थ रामदासांनी स्तुती केलेली दिसते. ‘चौदा विद्यांचा गोसावी’ असेही श्री गणेशाचे वर्णन समर्थ करतात.

बुद्धी, ज्ञान, तर्क, भावना, कला इत्यादी मेंदूशी संबंधित क्षमतांचा अधिपती म्हणून गणेश स्वरूपाला ओळखलं जातं. या अर्थाने आपल्या मेंदूवर श्री गजाननाचे आधिपत्य आहे, असं म्हटलं तर अयोग्य ठरू नये. ज्ञान आणि विज्ञान या दोनही शास्त्रांचे हे दैवत म्हणजे अधिष्ठानच आहे.

तर्क (मेंदूच्या डाव्या बाजूचा परायटल लोब), संगीत आणि कला (उजव्या बाजूचा परायटल लोब), बुद्धी (मेंदूतील अनेक केंद्रांचं सुसूत्र व एकत्रित कार्य), आनंद (मेंदूच्या अंतर्भागात स्रवणारी संप्रेरके), विवेक आणि निर्णय क्षमता (मेंदूच्या फॉन्टल लोबचं कार्य) अशा अनेक रूपांनी श्री गजानन आपल्या मेंदूत स्थित आहे, यात शंका नाही.

न्यूरोसर्जन म्हणून विचार करताना मला स्वतःला श्री गणेशाच्या आशीर्वादाशिवाय मेंदू आणि मज्जारज्जूच्या कठीण व क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी होणं अशक्य आहे, असं वारंवार वाटतं. शरीरातील अत्यंत नाजूक आणि तेवढाच गुंतागुंतीचा अवयव म्हणजे मेंदू आणि मेंदूचाच विस्तारित भाग म्हणजे मज्जारज्जू.

मेंदूची कोणतीही शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी सर्वप्रथम मेंदूच्या विविध भागांचे कार्य नेमकं कुठे आणि कसं चालतं याचा सूक्ष्म बारकाव्यांसहित अभ्यास असणं महत्त्वाचं असतं. श्री गजानन ही विज्ञानाचीच देवता असल्याने हे अधिष्ठान असल्याशिवाय ते शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे मेंदूच्या अंतर्भागातल्या क्लिष्ट शस्त्रक्रिया करताना लागणारी बुद्धी आणि शल्यकौशल्य श्री गणेशाच्या वरदानाशिवाय सहज शक्य होणार नाही, हे निश्चित.

विवेक आणि सारासार विचार

शस्त्रक्रिया करताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शस्त्रक्रियेदरम्यान नेमका कुठला व किती भाग काढायचा आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे मेंदूचा इतर महत्त्वाचा भाग किंचितही इजा न करता कसा अबाधित ठेवायचा याचं भान. यासाठी विवेक आणि सारासार विचाराची गरज असते.

श्री गणेशाच्या हातातला अंकुश हे या विवेकाचा प्रतीक आहे. त्याचप्रमाणे चपळता आणि हस्तकार्य प्रवीणता या गोष्टी सुद्धा मेंदू व मज्जारज्जूच्या शस्त्रक्रियेत अतिशय महत्त्वाच्या आहेत. मज्जारज्जूच्या तळाला स्थित मूलाधार चक्राचा स्वामी असलेला गजानन या क्षमता प्रदान करत असतो, असं वाटल्याशिवाय रहात नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘विघ्नहर्ता आणि अविघ्न’ अशी नावं धारण केलेली ही शक्ती शस्त्रक्रियेदरम्यान येणारी आणि मानवी नियंत्रणाबाहेरची विघ्नं नष्ट करण्यास समर्थ असल्याने त्या शक्तीचा आपणावर वरदहस्त राहो, अशीही प्रार्थना आपण कायम करत असतो. अशा या विघ्ननाशक, ज्ञान आणि विज्ञानाचं प्रतीक असलेल्या ‘बुद्धीनाथा’च्या उत्सवाच्या सुरुवातीलाच आपण सर्वजण त्याला नमन करूया!

समर्थांनी यथार्थ वर्णन केले आहे-

येता कृपेची निज उडी। विघ्ने कापती बापुडी।

होऊनी जाती देशधडी। नाममात्रे।

सगुण रूपाची ठेव। महालावण्य लाघव।

नृत्य करता सकळ देव। तटस्थ होती।

(लेखक न्यूरोसर्जन आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : आमदार राजेद्र शिंगणे यांची अजित पवारांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

बिग बॉस फेम अरमान मलिकचा मोठा अपघात; थोडक्यात बचावला जीव, व्हिडिओ शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT