gudi padwa festival sakal
संस्कृती

Gudi Padwa : गुढीपाडवा - एक उत्क्रांतीचा दिवस

आज गुढीपाडवा. आजच्या दिवशी चंद्र, सूर्य व रास पूर्व क्षितिजावर शून्य अंशावर असतात. त्यामुळे आपण हा दिवस संवत्सराची सुरुवात आहे, असे मानतो.

सकाळ वृत्तसेवा

आज गुढीपाडवा. आजच्या दिवशी चंद्र, सूर्य व रास पूर्व क्षितिजावर शून्य अंशावर असतात. त्यामुळे आपण हा दिवस संवत्सराची सुरुवात आहे, असे मानतो. प्रभू रामचंद्रांनी रावणाला आपल्या उपदेशाने बोध करून दिला की अहंकाराने काम होत नाही, प्रेमानेच होते. परस्त्री, परधन यांच्यावर डोळा ठेवून असतो त्याला मोक्षप्राप्ती नव्हेच, पण सुखही मिळत नाही.

हे ज्या दिवशी रावणाला कळले. त्या दिवशी त्याच्या अहंकाराची निवृत्ती झाली व नंतर त्याला सद्गती मिळाली. नंतर श्रीरामांनी बिभिषणाकडे लंकेचे राज्य सोपवले व सर्वजण अयोध्येला परत आले, तो आजचा गुढीपाडव्याचा दिवस.

वसंत ऋतूचे स्वागत करण्याच्या हेतूनेही गुढीचा सण साजरा करण्यात येतो. वसंत ऋतूत मोठी शक्ती आहे. ‘वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इध्मः शरद्धविः’ असे पुरुषसूक्तात म्हटलेले आहे. तुपामध्ये सृजनाची-वीर्याची शक्ती आहे. तूप वीर्यवर्धक आहे. तुपाने अग्नी आवाहन केले जाते, तुपामुळे अग्नी प्रदीप्त होतो. लाकूड ओले असले, तरी त्यावर तूप टाकल्यावर ते पेटते.

कोरडे लाकूड पेटवले असता लगेच जळून जाते, पण त्यावर तूप टाकले असता ते सावकाश जळत राहते. असे तूप वसंत ऋतूच्या समान आहे. वसंत ऋतू निसर्गात तुपासारखे काम करतो. यावरून किती अनादी काळापासून नैसर्गिक सृजनाची सगळी माहिती होती याची आपल्याला कल्पना येते. ‘ऋतूनां कुसुमाकरः’ म्हणजे मी सर्व ऋतूंमध्ये वसंत ऋतू आहे, असे भगवंतांनी गीतेत म्हटलेले आहे. यावरुन वसंत ऋतूचे महत्त्व लक्षात येते.

वसंतात झाडांनाच पालवी येते असे नाही, तर मनुष्य बरा-वाईट कसाही असला तरी त्याच्या मनात वसंतात नवे विचार येतात, त्याला माणुसकीचा एखादा कोंब फुटतो. अशा या वसंत ऋतूच्या स्वागताला गुढी उभी केली जाते. वसंताचे स्वागत करण्याच्या हेतूने घराघरांवर आंब्याच्या पानांची तोरणे लावली जातात.

गुढी म्हणजे झेंडाच आहे. निसर्गात झाडाला जसे वरच्या दिशेकडे जाणारे कोंब व पालवी फुटते, तसे मनुष्याला उत्क्रांतीच्या प्रेरणेचे कोंब व मानवतेची पालवी फुटल्याचे प्रतीक म्हणून ही गुढी. गुढी आपल्या मस्तकाचे व खाली असलेल्या मेरुदंडाचे प्रतीक आहे.

श्रीमद्‌भगवद्गीतेच्या १५व्या अध्यायात म्हटले आहे,

ऊर्ध्वमूलमधःशाखम्‌

अश्र्वत्थं प्राहुरव्ययम् ।

छन्दांसि यस्य पर्णानि

यस्तं वेद स वेदवित्‌ ॥१५-१॥

डोके वर आहे व तेथून सर्व निघालेले संदेश खालपर्यंत पसरतात. मेंदूचे (ब्राह्मणाचे) संरक्षण करणे आवश्‍यक असते. मेंदूत कुठल्याही प्रकारचा व्हायरस, वाईट विचार किंवा रोग येऊ नये, म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचा कुविचार येऊ नये. मेंदूत असावेत सद्विचार. ‘सर्वेऽत्र सुखिन सन्तु’ हे विचार ज्या मेंदूमध्ये असतील त्याला रोजचा दिवस हा गुढीपाडवाच आहे.

ब्रह्मध्वज - सृजनाचे प्रतीक

या उत्क्रांतीच्या रुपकास ‘ब्रह्मध्वज’ हा शब्द वापरण्यात आला आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्यपणे वापरला जाणारा शब्द आहे ‘गुढी’. गुढी उभी करणे म्हणजेच ब्रह्मध्वज उभा करणे. ब्रह्मध्वज हे माणसाच्या एकूण शरीरात घडणाऱ्या सृजनाचे प्रतीक आहे. गर्भधारणा झाल्यावर त्यातून मनुष्याचे शरीर तयार होताना प्रथम एक बारीकसा ठिपका असतो व त्याला एक बारीक शेपूट असल्यासारखे दिसते.

पुढे ठिपक्याचे मेंदूत व शेपटीचे मेरुदंडात रूपांतर होते. यानंतर आजूबाजूला हात व पाय फुटतात व संपूर्ण मनुष्य तयार होतो. सर्व प्राणीसुद्धा अशाच तऱ्हेने तयार होतात. मात्र मूलाधारात असलेल्या सुप्त शक्ती उत्क्रांत करत ती हलके हलके हृदयात आल्यावर त्या ठिकाणी तयार झालेल्या प्रेमाच्या शक्तीचे काय मोजमाप करणार?

ही शक्ती वरच्या चक्रात आल्यावर, म्हणजे मस्तकाच्या ब्रह्मरंध्रात आल्यावर तेथील ब्रह्मरसाचे प्राशन केल्यानंतर मनाला व शरीराला संपूर्ण तृप्ती लाभते. या ठिकाणी ब्रह्मदंडाची पताका फडफडायला लागली, की स्वतःचा अनुभव स्वतःला घेता येतो.

ब्रह्मदंडावर मस्तकाचे निदर्शन करणारा कलश उपडा ठेवला जातो. कलश हे ब्रह्माचे (मेंदूचे) स्थान व खालील बांबू हे ब्रह्मदंड असे मिळून गुढी तयार होते. ब्रह्मध्वज उभा केल्यावर कलशाच्या खाली ब्रह्मध्वजाच्या भोवती चारीही बाजूंना रेशमी वस्त्र गुंडाळले जाते, हे वस्त्र जणू कलशरूपी स्वर्गातून येणारी ऊर्जा सर्व शरीराला पुरवण्याचे व शरीरातून संवेदना मेंदूला पोचविण्याचे निदर्शक आहे.

ब्रह्मध्वजाला कडुनिंब व आंबा यांच्या मंगल पानांची डहाळी बांधण्याची पद्धत असते. याला साखरेची माळ घातली जाते. शरीराला शक्ती हवी असल्यास ती साखरेतूनच मिळू शकते. नंतर ब्रह्मध्वजाची पंचोपचार पूजा केली जाते. दोन पळ्या पाणी वाहून नंतर हळद, कुंकू, गंध, अक्षत वाहून, विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवून नंतर बत्ताशांचा नैवेद्य दाखवला जातो.

घरोघरी अशा गुढ्या उभारल्या जातात. या दिवशी घरासमोर रांगोळ्या काढाव्या, घरात चांगले संगीत लावावे. आजच्या दिवशी घरी ठरविलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. सर्वांनी हसत-खेळत राहावे, कटू प्रसंग टाळावेत, एकमेकाला आनंद देत गोड-धोड खावे, नवीन वस्त्र परिधान करावे, घरात नव्या वस्तू विकत घ्याव्यात, व्यापार-उदीमाची सुरुवात करावी. नवीन वर्षाची सुरुवात सुंदर सकारात्मक विचाराने करावी. सर्व समाजाचा उत्कर्ष व्हावा, सर्व मानवतेची उत्क्रांती व्हावी, माणुसकी वाढावी अशी प्रार्थना करून गुढीपाडव्याचा सण साजरा करावा.

एकूणच, सर्वांच्या मनात सकारात्मक ऊर्जा व सकारात्मक विचार असल्यामुळे हा दिवस मंगल मुहूर्त म्हणून मानला जातो. ब्रह्मध्वजाच्या पूजनामुळे तयार होणाऱ्या मंगल वातावरणाचा परिणाम म्हणून घरात काही दिवस आनंद नांदतो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो.

आजच्या दिवशी श्रीखंड वगैरे छान पक्वान्न खावे. श्रीखंड आयुर्वेदात सांगितलेल्या कृतीनुसार केलेले असल्यास त्याचा त्रास होत नाही. समतोल जेवावे, हे आपल्याला माहिती आहे. ‘समदोषः समाग्निश्र्च’ असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. कडुनिंब अत्यंत कडू असला, तरी तो अमृतासमान आहे. म्हणतात की, पृथ्वीवर ज्या ठिकाणी अमृताचा बिंदू पडला त्या ठिकाणी हा वृक्ष उगवला.

हा वृक्ष अमृतासमान आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी याच्या कोवळ्या पानांची चटणी केली जाते. खरे तर, ही चटणी वर्षभर खावी. साथीचा आजारांना प्रतिबंध म्हणून, तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ही चटणी उत्तम आहे. या चटणीत अनेक इतर द्रव्ये टाकलेली असतात. कडुनिंबाची वाळलेली पाने जाळल्स डासांपासून रक्षण होते.

अशा रीतीने गुढीपाडवा हा मनुष्यमात्रासाठी आरोग्याचा एक उपचार आहे, मानसिक आरोग्याचा उपचार आहे, आत्मिक आरोग्याचा उपचार आहे. सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. नवीन वर्ष सर्वांना आरोग्य, ऐश्र्वर्य, आत्मसमाधान व तेजःपूर्ण जावो हीच प्रार्थना.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT