Tulsi Vivah 2022 : दिवाळीचा सणाचा उत्सव आटोपल्यानंतर कार्तिक महिन्यातील द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह पुजन केले जाते. दिवाळीप्रमाणेच हा सण उत्साह अन् जल्लोषात साजरा केला जातो. एकदाचे हे तुळशी विवाह आटोपले कि सर्वत्र लग्नसराईचे वेध सुरु होतात. उपवर झालेल्या मुला- मुलींच्या घरी लग्नासाठी बघण्याचे कार्यक्रम सुरु होतात. लग्न (Wedding) ठरतात अन् जल्लोषात विवाह सोहळे देखील पार पडतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुळशी विवाह झाल्यानंतरच ही लग्नसराई का सुरु होते? तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न मुहूर्त का येत नाहीत? चला तर ज्योतिष तज्ज्ञ अनिल चांदवडकर यांच्याकडून आपण याबद्दल धार्मिक आणि शास्त्रीय कारण जाणून घेऊया.
ज्योतिष तज्ज्ञ अनिल चांदवडकर सांगतात, तुळशी विवाहानंतरच लग्न कार्ये अन् त्याची मुहूर्त येतात याचे प्रमुख कारण हे चातुर्मास आहे. चतुर्मास म्हणजे धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ. असे मानले जाते कि, कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. म्हणून कार्तिक शुद्ध एकादशीला 'प्रबोधिनी एकादशी' सुद्धा म्हणतात.
या चातुर्मासाच्या काळात अनेक व्रत-वैकल्ये, उपासना केल्या जातात. मात्र या काळात मुंज, विवाह, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी मंगलकार्ये केली जात नाहीत असे शास्त्रात सांगितले गेले आहे. भागवत पुराणानुसार हा काळ विष्णूंच्या निद्रेचा काळ आहे. श्रीविष्णूंच्या निद्रेया हरिशयन म्हटले जाते.
तुळशी विवाह म्हणजे तुळशीचा श्रीकृष्ण याच्याशी विवाह केला जातो. यात प्रामुख्याने विष्णू रुपी शालीग्राम पुजनाला विशेष महत्व आहे. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील या एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात. म्हणून याला देवउठनी एकादशी असेही म्हटले जाते. देवांची निद्रा पुर्ण झाल्यानंतर लक्ष्मी स्वरुप तुळशीशी त्यांचा विवाह मंगलमय वातावरणात पुर्ण केला जातो. व देवतांच्या या विवाह सोहळ्यात उपवर मुल- मुली, सौभाग्यवती स्त्रिया आपल्या इच्छित जोडीदाराची आयुष्यभर साथ लाभावी अशी कामना करतात.
ज्योतिर्विद श्री. चांदवडकर सांगतात, तुळशी विवाह साजरे करण्याचे प्रमुख शास्त्रीय कारण म्हणजे जो चातुर्मास आहे, तो ऋतूमानानुसार पावसाचा काळ आहे. आपला भारतदेश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे आपल्या देशात शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले जाते. हा चातुर्मासाचा काळ हा शेती कामे उरकण्यासाठी आहे. पुर्वीच्या काळी तंत्रज्ञान फार विकसीत नव्हते त्यामुळे शेतकऱ्याचे संपुर्ण कुटूंब याकामी मदत करत असत. या चातुर्मासाच्या काळात पेरणी, तोडणी, मळणी अशी शेतीकामे केली जातात. साधारण कार्तिक एकादशीपर्यंत शेतातील पीक तयार होते. एकदा शेतातील पीक तयार झाले कि ते विकून त्यातून उभा राहणारा पैसा आणि शेती कामातून मिळालेल्या विश्रांतीचा हा काळ. येथून पुढे मग गावागावतील लोक आपल्या घरातील उपवर मुला- मुलींचे विवाहासंबंधी हालचाली सुरु करत. कारण आता त्यांच्याकडे विवाह सोहळ्यासाठी पुरेसा पैसा अन् वेळही असे. म्हणून शास्त्रकारांनी चातुर्मासात मुंज, विवाह, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी मंगलकार्य न करण्याचा विचार मांडला.
यावर श्री चांदवडकर सांगतात, आपण धार्मिक लोक आहोत. आपल्या परंपरेनुसार कुठल्याही कार्याची सुरुवात ही आपण देवांच्या आशिर्वाद घेऊन सुरु करत असतो; अन् विवाह हे असे मंगल कार्य आहे ज्यात दोन व्यक्तींच्या आयुष्याची गाठ बांधली जाते. कुठल्याही नवीन लग्न झालेल्या जोडप्याला लक्ष्मी- नारायणासारखा जोडा असे आपसूक म्हटले जाते. याचप्रमाणे प्रत्येक घरात तुळस ही असतेच. तुळस ज्याप्रकारे आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त मानली जाते त्याच प्रमाणे धर्मशास्त्रात ती लक्ष्मीस्वरुप मानली जाते, तीचे पुजन केले जाते. आणि म्हणूनच विवाह कार्याची सुरुवात करण्यापुर्वी तुळशी विवाह केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.