श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी आहे. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. यादिवशी प्रत्येक स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे परिधान करुन नागदेवताची पूजा करतात.
नागपंचमी पूजा विधी (Nag panchami pooja)
ग्रामीण भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो. उपवासाच्या दिवशी फराळ केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीला उपवास सोडला जातो. असं म्हणतात की, नागपंचमीचा उपवास हा भावांसाठी केला जातो. गरूड पुराणानुसार, नागपंचमीच्या दिवशी नागाच्या प्रतीमेची पूजा केली जाते.
म्हणजे पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा झाल्यानंतर त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयासंबंधात एक प्रचलित कथा आहे.
नागपंचमीच्या गं दिवशी मी गं नेसले हिरवी साडी
नाग भाऊराया मला पाठवितो गं गाडी
नागपंचमीच्या दिवशी मी गं भरीला चुडा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य ताजा पेढा
तूच रे रक्षण करी माझा आईच्या गोताचा
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य कढीचा
नागा रे भाऊराया तुला वहिल्या मी लाह्या
तुझ्या दर्शनाला आल्या शेजारच्या आया बाया
नागा रे भाऊराया तुला नैवेद्य गुळाचा
आता रक्षण करी माझ्या बंधूच्या कुळाचा
या लोकगिताप्रमाणे नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. असं सांगतात की, सत्येश्वरी नावाची एक कनिष्ट देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वरीचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.