Nag Panchami  esakal
संस्कृती

Nag Panchami : नागपंचमीला पूजल्या जाणाऱ्या जिवती प्रतिमेचा अर्थ आणि महत्व माहितीये? जाणून घ्या

नागपंचमीला घरोघरी जीवतीचे चित्र लावून त्याची पूजा केली जाते.

धनश्री भावसार-बगाडे

Importance Of Jeevti Pooja On Nag Panchami :

श्रावण महिना आला की, सणवार आणि व्रतवैकल्यांचा महिना सुरु झाला असं म्हटलं जातं. कारण या महिन्यात शिवशक्तीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्व असते. श्रावणात सगळीकडे हिरवळ झालेली असते. त्यामुळे वातावरणात एक नवा ताजेपणा भरलेला असतो. अशात सणवारांचा उत्साह वेगळाच असतो. यातला पहिला सण हा नागपंचमी असतो.

नागपंचमीला जिवती पूजन करण्याची पद्धत असते. जी हल्लीच्या शहरी वातावरणात हरवत चाललेली दिसते. पण या पूजनेच्या वेळी जे विशिष्ट चित्र लावले जाते त्याचा अर्थ आणि महत्व काय, जाणून घेऊया.

Nag Panchami

जिवती पूजेचे महत्व

कोणी दिप अमावस्येपासून संपूर्ण श्रावण महिना तर कोणी नागपंचमीपासून या जिवतीच्या प्रतिमेचे पूजन करतात. जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केले जाते. आपल्या मुलाबाळांच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे? जाणून घेऊया.

Nag Panchami

प्रतिमा

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना करणे म्हणजेच जिवती पुजन. याच क्रमात त्यांना पुजले जाते त्याची कारण बघुया.

प्रथम भगवान नरसिंहचं का?

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह अवतार आहे. नरसिंह हे आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जाते.

म्हणजेच, नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी

Nag Panchami

कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत आहेत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच, कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, प्राण्यांपासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्हीदेव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

Nag Panchami

जरा व जिवंतिका

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र/ पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतीत असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो.

कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्राकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन देतो.

त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी ही जरा देवी. जरेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात.

Nag Panchami

शेवटी येतात बुध व बृहस्पती

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती - हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ - हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता. नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता. आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ?

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT