Maharashtra Police esakal
संस्कृती

Navratri 2023 : 'ती' उभीये सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय! सर्व बंधनं झुगारत पुरुषाच्या बरोबरीनं दाखवतेय महाराष्ट्राला आपलं सामर्थ्य

आताशा कुठे ‘ती’ला कायद्याने हक्क मिळू लागलेत. त्या आधारे ती आपली प्रगती करीत आहे.

सकाळ डिजिटल टीम

आता महिला सर्व बंधने झुगारत प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने आपलं सामर्थ्य दाखवत आहे.

Navratri Festival 2023 : आताशा कुठे ‘ती’ला कायद्याने हक्क मिळू लागलेत. त्या आधारे ती आपली प्रगती करीत आहे. बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमतेच्या बाबतीत आपण पुरुषांपेक्षा कमी नाही, हे ती आज सिद्ध करीत आहे. स्त्री म्हणजे आदिती... शक्तीचे स्वरूपच... कुटुंबव्यवस्थेला पेलणारी तिची अमर्यादशक्ती... म्हणूनच स्त्रियांचा सन्मान करणारी आपली संस्कृती आहे.

पूर्वी रुढीच्या शृंखलेत अडकलेली, आता सर्व बंधने झुगारत प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने आपलं सामर्थ्य दाखवत आहे. आम्ही नवरात्रोत्सवात नऊ दिवस जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान स्त्रीशक्तीचे दर्शन ‘नव्या युगाच्या नवदुर्गा’ या मालिकेद्वारे येथे प्रातिनिधिक स्वरुपात घडविणार आहोत...

अभियंता बनली पोलिस उपाधीक्षक

आयटी इंजिनिअरिंगनंतर जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर त्यांनी आज पोलिस उपाधीक्षक पदाला गवसणी घातली आहे. मनीषा कदम त्यांचे नाव. त्या मूळच्या नांदेड जिल्ह्यातील नायगावच्या. कोलंबी येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर जळगावच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांतून त्यांनी पदवी घेतली. इथवर न थांबता शासकीय अधिकारी व्हायचंच, हे मनात पक्के होते. पदवीनंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरवात केली. दोन परीक्षांमध्ये त्यांना यश मिळाले. मात्र, मुलाखतीत अपयश आले. त्यात खचून गेल्या नाहीत. प्रयत्नात सातत्य ठेवले आणि त्यांना २०१८ मध्ये यश मिळाले. कक्ष अधिकारी म्हणून त्या मंत्रालयात रुजू झाल्या.

२०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पुन्हा त्यांनी बाजी मारली. त्यांच्या स्वप्नातील पोलिस उपाधीक्षक पदाला गवसणी घातली. नाशिकच्या पोलिस अकॅडमीत एक वर्ष प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सासर असणारा सांगली जिल्हा प्रशिक्षणार्थी म्हणून मिळाला. पहिल्यांदा आष्टा पोलिस ठाण्यात निरीक्षक म्हणून काम केले. आता त्या शहर उपाधीक्षक कार्यालयात काम करताहेत. मनीषा कदम म्हणतात...‘‘मी महिला आहे. महिलांच्या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी मी प्राधान्याने हे क्षेत्र निवडले आहे. त्यात कुटुंबीयांची मला नेहमी साथ आहे.’’

सराव, तयारीतून यशाला गवसणी

शेटफळे (ता. आटपाडी) गावच्या कन्या राजश्री संभाजी पाटील. त्या सध्या सीआयडी विभागात पुणे येथे अप्पर अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्या प्रा. संभाजी पाटील यांच्या कन्या. गावातच जिल्हा परिषदेच्या मुलींच्या मराठी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण आटपाडीतील वत्सलादेवी देसाई गुरुकुलमध्ये पूर्ण केले. सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला. बारावीतही तालुक्यातून पहिला क्रमांक मिळवला. स्पर्धा परीक्षेतून वर्ग एक अधिकारी होण्याचे स्वप्न वडिलांनी लहान वयातच दाखवले.

त्यामुळे पहिल्यापासून सराव आणि तयारी केली. जिद्द, चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवत पोलिस उपाधीक्षक पदाला गवसणी घातली. पहिली नियुक्ती मंगळवेढा येथे झाली. तेथे अडीच वर्षे अत्यंत प्रभावीपणे काम करून दाखवले. याशिवाय जबरी चोऱ्या आणि खून प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळवले. कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने दोन पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची सीआयडी विभागाकडे अप्पर अधीक्षक म्हणून पदभार दिला आहे.

कर्तव्याशी बांधिलकी महत्त्वाची

पोलिस खात्याची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुकच्या कुटुंबातील मायादेवी काळगावे २०११ मध्ये महाराष्ट्र पोलिस दलात देवनार येथे मुंबई पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या. तेथेच सहायक पोलिस निरीक्षक म्हणून राज्य गुप्त वार्ता विभागात पदोन्नती मिळाली. सांगली जिल्ह्यात २०१६ पासून त्या काम करत असून इस्लामपूर, मिरज शहर, कुंडल आणि सध्या तासगाव येथे वाहतूक शाखेची जबाबदारी पेलत आहेत. प्रत्येक ठिकाणी नवी जबाबदारी आणि नवी आव्हाने यांना स्त्री पोलिस अधिकारी असूनही तितक्याच समर्थपणे तोंड दिले आहे. संसार आणि नोकरी अशी तारेवरची कसरत असली, तरी कायद्याच्या चौकटीत सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेत ‘ड्यूटी’ करताना आनंद वाटतो, असे त्या सांगतात.

Maharashtra Police

आईचे संस्कार, कष्टामुळेच वाढली जिद्द

लहानपणीच पितृछत्र हरपले. त्यामुळे आई आम्हा तिघी मुलींसह तासगाव हे मूळ गाव सोडून कडेगावला मामाच्या गावी आली. तेव्हा आईने आम्हाला मजुरी करून शिकवले. आईचे संस्कार, अपार कष्टामुळेच पोलिस उपनिरीक्षक होण्याची प्रेरणा मिळाल्याचे स्नेहल नंदकुमार तांबडे-शेटे यांनी सांगितले. सध्या त्या आर्थिक गुन्हे शाखा मीरा-भाईंदर, वसई, विरार आयुक्तालय, मुंबई येथे कार्यरत आहेत. आम्हा तिघींच्या शिक्षणासाठी व उदरनिर्वाह चालविताना आईची खूप ओढताण व्हायची. तेव्हा आईची धडपड, कष्ट पाहून कधी-कधी मन भरून यायचे.

तेव्हा शालेय जीवनात मनाशी अशी खूणगाठ बांधली होती की, आपण काहीतरी वेगळे करून दाखवायचे. त्यासाठी पोलिस खात्यामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले. या स्वप्नाचा पाठलाग केला. कडेगाव येथील भारती विद्यपीठाच्या बयाबाई कदम कन्या महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर येथील सह्याद्री अकॅडमीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. २०२० मध्ये मुंबई येथे मीरा रोड पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाल्या आहेत.

ध्येयनिश्‍चितीने पहिल्या प्रयत्नात पोलिस सेवेत

महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या लोणारवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील मनीषा बजबळे यांनी पोलिसांत जायचे, असे स्वप्न मनात बाळगत तशी तयारी केली. आई-वडिलांच्या प्रेरणेतून त्या पहिल्याच प्रयत्नात २००३ मध्ये पोलिस दलात भरती झाल्या. मनात ध्येय ठेवले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, याप्रमाणे त्यांनी स्वप्न साकार केले. दोन्ही राज्यांच्या हद्दीवरील लोणारवाडीमधील असलेल्या मनीषा हैबती बजबळे २००३ मध्ये पोलिस दलात भरती झाल्या. त्यानंतर त्यांनी २००६ मध्ये कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हे अन्वेषण विभाग आणि त्यानंतर त्यांनी जत पोलिस उपाधीक्षक कार्यालय गुन्हे अन्वेषण विभागाचे कामकाज पाहिले. सध्या त्या कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात प्रतिबंधक कारवाई विभागाचे कामकाज पाहत आहेत. आजही त्या तितक्याच प्रभावीपणे आपले कामकाज पोलिस दलात करत आहेत.

समाजसेवेसाठी शासकीय सेवेत

संसार, पती, दोन मुलांची जबाबदारी व शिक्षणाची आवड, तसेच पतीच्या खांद्याला खांदा लावून समाजसेवेचा वसा जपण्याचे काम जत ठाण्याकडील उपनिरीक्षक राजश्री वैभव गायकवाड करत आहेत. आजअखेर जतमधील ३५ ते ४० गुन्ह्यांचा तपास लावून गुन्हे उघडकीस आणले. सांगोला तालुक्यातील मेडशिंगी या छोट्याशा खेड्यातून सरकारी नोकरी मिळवून, कुटुंबाचा आधार बनवा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून पुढील प्रवास निवडला. सुरवातीला डिप्लोमा इन एज्युकेशन (डी. एड.) शिक्षण घेतले. यामध्येच कुटुंबाने लग्नाचा घाट घातला.

यानंतर ही त्यांनी शिक्षणाचा उपयोग चूल आणि मुलं यापुरता मर्यादित न ठेवता घरातूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. यामध्ये त्या यशस्वी झाल्या. शिवाय, इथून लोकसेवेच्या नव्या पर्वाला सुरवात झाली. मुंबईसारख्या अतिसंवेदनशील भागात सहा वर्षे तत्पर सेवा बजावली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी जत शहरसह तालुक्यातील खून, पोक्सो, अपहरण यांसह अनेक गुन्हे जिद्द, कौशल्याच्या जोरावर उघडकीस आणले.

कुटुंबाला हातभार अन्‌ कर्तव्य

पोलिस अधीक्षक, उपाधीक्षक, निरीक्षकासह चालक ते बीट अंमलदार अशी सगळी महत्त्वाची जबाबदारी महिला पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. त्यात सांगलीतील गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असणाऱ्या शुभांगी मुळीक उल्लेखनीय कर्तव्य बाजावत आहेत. गुन्ह्यांचा छडा लावण्यापासून ते न्यायालयात दाखल होण्यापर्यंतची सर्व जबाबदारी त्या पार पाडतात. वाळवा तालुक्यातील भाटवाडी येथे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. आर्थिक परिस्थितीवर मात करत त्यांनी पोलिस सेवेत दाखल व्हायचे निश्‍चित केले होते.

जिद्दीच्या जोरावर त्या २००७ मध्ये पोलिस सेवेत दाखल झाल्या. आव्हानात्मक वाटणाऱ्या कामांमध्ये वेगळा उत्साह आणि तेवढीच सतर्कता दाखवल्याने त्यांना एलसीबी पथकात संधी मिळाली. नुकताच त्यांनी चोरी करणाऱ्या महिलांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कामाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली. महिला असल्यामुळे महिलांच्या समस्या अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकतात, असे शुभांगी मुळीक नेहमी सांगतात.

जिद्द, चिकाटीच्या जोरावर सुरक्षारक्षक ते पोलिस दल

मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील ज्योती मोहन फाटक. जिल्ह्यातील पहिल्या महिला पोलिस चालक या पदावर काम करण्याचा मान त्यांनी मिळवला. २०२२ झालेल्या पोलिस भरतीत १० हजार मुलींमध्ये जिल्ह्यातून तीनच महिला चालक म्हणून भरती झाल्या, त्यापैकी एक ज्योती. त्यांचे वडील मोहन व भाऊ ऋषिकेश हे दोघेही स्थानिक शाळेत वाहनचालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती बेताची असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ज्योती यांनी कोल्हापूर येथे महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये चार वर्षे नोकरी करत भरतीची तयारी केली.

हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून त्या काम करत होत्या. दिवसभर भरतीची तयारी करत होत्या. दहावीत असताना त्यांनी पोलिस होण्याचे स्वप्न पाहिले. जिल्हा परिषद शाळा, मसुचीवाडी येथे प्राथमिक व माध्यमिक व त्यानंतरचे शिक्षण इस्लामपूर येथील कुसुमताई कन्या महाविद्यालयात घेतले. चालक म्हणून पोलिस दलात भरती होण्याच्या प्रवासात त्यांना वडील, भाऊ, तसेच मुंबई पोलिसात असलेली मैत्रीण काजल बगाडे, उमेश भिलवडे हिचे मार्गदर्शन मिळाले.

महिलांच्या सन्मानार्थ स्वीकारली पोलिस सेवा

विटा येथील वाहतूक शाखेची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक जयश्री वाघमोडे पार पाडत आहेत. इचलकरंजी येथे सामान्य कुटुंबात जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत काहीतरी करून दाखवण्याच्या ध्येयाने शिक्षण घेतले. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलात नेमणुकीने स्वप्न पूर्ण होण्यास मदत झाली. मुंबई येथे आठ वर्षे, मिरज येथे दोन वर्षे आणि विटा शहरात दोन वर्षांपासून वाहतूक नियंत्रण शाखेत सहायक पोलिस निरीक्षक म्हणून जयश्री वाघमोडे कार्यरत आहेत. रस्त्यावर पांढरे पट्टे मारणे, रिफ्लेक्टर बसवणे अशा वाहतूक नियमांसाठी त्या आग्रही असतात. वाहतुकीला शिस्त लावण्याचा वेळोवेळी प्रयत्न करत आहेत. शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा निर्धारच त्यांनी केला आहे, तशा कृतीसही त्यांनी सुरवात केली आहे. एक आव्हानात्मक व इतरांना उपयोगी पडण्याची संधी देणारे काम, अशी कर्तव्यभावना त्या ठेवतात. महिला व मुलींवर अन्याय होऊ नये, यासाठी प्रयत्नशील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT