महालक्ष्मी या देवतेचा तेजस्वी सोनेरी वर्ण आणि देवतेकडून झालेली सृष्टयोत्पत्ति यांचा संबंध हिरण्यगर्भ या आदिम वैदिक संकल्पनेशी सहज जुळताना दिसतो.
Navratri Festival 2023 : महालक्ष्मी (Mahalakshmi) या देवतेचा तेजस्वी सोनेरी वर्ण आणि देवतेकडून झालेली सृष्ट्योत्पत्ति यांचा संबंध हिरण्यगर्भ या आदिम वैदिक संकल्पनेशी सहज जुळताना दिसतो. किंबहुना तो तसाच घडवून आणलेला दिसतो.
महालक्ष्मी ही देवता देविमाहात्म्य-अंतर्गत प्राधानिक रहस्याची मुळदेवता आहे. पण आपण तिला एका रहस्याची देवता इतक्या संकुचित पद्धतीने पाहायला नको. वास्तवात महालक्ष्मी ही देवता प्राधानिक रहस्याची देवता बनते. याचाच अर्थ बघता-बघता ही देवता देविमाहात्म्य या ग्रंथाचीच मुख्य देवता बनून गेलेली आहे, हे समजून येते.
कारण प्राधानिक रहस्य हे देवतांची प्रधानता आणि प्राधान्यक्रम विशद करते आणि ज्या अर्थी प्राधानिक रहस्यांमध्ये महालक्ष्मीची महती गाईली आहे, त्या अर्थी ही देवता अत्यंत लोकप्रिय बनून गेलेली होती हे समीकरण इथे स्पष्ट होऊन जातं. महालक्ष्मीचा वर्ण तापलेल्या सोन्याप्रमाणे (तप्तकांचनवर्णाभा) सांगितला आहे. असं तेजस्वी स्वरूप धारण करून या देवतेने सृष्टीची निर्मिती केली, असं प्राधानिक रहस्य सांगते.
सृष्टीची निर्मिती करण्यासाठी तीन गुणांचा आधार घेऊन महाकाली आणि महासरस्वती निर्माण केल्या आणि तिन्ही देवतांनी मिळून ब्रह्मा, विष्णू, महेश तसेच सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी निर्माण केल्या आणि यांच्या जोड्या लाऊन यांना सृष्टीची वारंवार निर्मिती, संस्थापन आणि लय ही कार्ये नेमून दिली. महालक्ष्मी या देवतेचा तेजस्वी सोनेरी वर्ण आणि देवतेकडून झालेली सृष्टयोत्पत्ति यांचा संबंध हिरण्यगर्भ या आदिम वैदिक संकल्पनेशी सहज जुळताना दिसतो. किंबहुना तो तसाच घडवून आणलेला दिसतो.
ऋग्वेदाच्या दशम मंडलामध्ये हिरण्यगर्भ सूक्त येते. यामध्ये सृष्टीची निर्मिती एका हिरण्यवर्ण गोळ्यामधून झाली, अशी संकल्पना मांडलेली आहे. याच हिरण्यगर्भाविषयी चर्चा ईशावास्योपानिषद, बृहदारण्यकोपनिषद यांमध्ये आढळते (एकोऽहं बहुस्याम्). मत्स्य पुराणामध्ये अशी माहिती येते की, महाप्रलय झाल्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती करण्यासाठी हिरण्यगर्भ प्रकट झाला.
सांख्यमतानुसार हाच हिरण्यगर्भ प्रकृति आणि पुरुष असा द्विविध होऊन प्रकृतिच्याद्वारे सृष्ट्योत्पत्ती करतो. हीच अवधारणा पुढे शैव, वैष्णव आपापली तत्त्वज्ञाने प्रस्थापित करताना केंद्रवर्ती घेताना दिसतात. हिरण्यगर्भ आणि सूर्याचा संबंधदेखील अशाच पद्धतीने लावलेला दिसतो (हिरण्यगर्भाय नमः). याच हिरण्यगर्भावर महालक्ष्मी ही संकल्पना अध्यारोपित झालेली दिसते. वर उल्लेख केल्याप्रमाणे सांख्यमतानुसार प्रकृतीच्या माध्यमातून निर्मिती होते.
त्याच धर्तीवर प्राधानिक रहस्य महालक्ष्मी स्वतः प्रकृतिपुरुषात्मक होऊन (लिंग-योनि-मस्तके धृत्वा), सकल शून्य पाहून आपल्या हिरण्मयी तेजाने पहिली निर्मिती करते. या कारणाने तिला सर्वस्याद्या म्हटलं गेलं आहे. हे झालं तात्त्वज्ञानिक अंगाने समजून घेणं पण, काय समाजमानसात तिच्याविषयी हीच अवधारणा होती की आणखी काही हे जाणून घेण्यासाठी महालक्ष्मीच्या स्तुतीपर श्लोक असलेले पूर्वमध्ययुगीन तीन शिलालेख विचारात घेणार आहोत. तीनही शिलालेखांच्या कालखंडात फरक आहे; एक इ.स. १०४९, दुसरा इ.स. १०६३-६४ (दोन्ही कर्नाटकमधील), तर तिसरा इ.स. १२६६ चा (कोल्हापूरमधील).
यांपैकी इ. स. १०४९ आणि १०६३-६४ मधील शिलालेखांमध्ये महालक्ष्मीबद्दल ‘अनंततमंधकारविनिर्गतसमुद्भूतनिरामयोत्पत्ति’, ‘अष्टाविंशतियुगावतारा’ अशी दोन विशेषणे येतात. अनंततमंधकारविनिर्गतसमुद्भूतनिरामयोत्पत्ति म्हणजे ‘अनंत अशा घोर अंधःकारामधून आविर्भूत अशी जिची निरामय (शुद्ध, दोषरहित) उत्पत्ति झाली आहे’ आणि अष्टाविंशतियुगावतारा म्हणजे ‘जिचा अवतार अठ्ठावीस युगे आहे’ किंवा ‘जी अठ्ठावीस युगांच्या आधीपासून अस्तित्त्वात आहे’.
या विशेषणांवरून समजते की, इथे हिरण्यगर्भाची संकल्पना अध्यारोपित झालेली आहे. सृष्टीचा वारंवार प्रलय होत असतो, वारंवार सृष्टीची नवनिर्मिती होत असते. प्रत्येक प्रलयानंतर हिरण्यगर्भ त्या घोर अंधःकारामध्ये आपल्या तेजसह आविर्भूत होत असतो आणि पुन्हा स्वत:ला अनेकविध स्वरूपांमध्ये विभागून सृष्टीची निर्मिती करत असतो. हेच आपल्याला अनंततमंधकारविनिर्गतसमुद्भूतनिरामयोत्पत्ति या विशेषणाद्वारे समजते. आपल्याकडे पौराणिक कालगणना ही जटिल पद्धतीने मांडली असली तरी इथे आपण ढोबळमानाने ही कालगणना चार युगांमध्ये विभागली आहे, असं समजून घेऊ.
चार युगांचं एक महायुग असतं. या गणितानुसार आपण सध्या अठ्ठावीसाव्या महायुगामध्ये आहोत. तर अशी अठ्ठावीस युगे जिचा अवतार किंवा स्वरूप आहे अशी ती महालक्ष्मी सांगितली आहे. म्हणजेच पुन्हा इथे सृष्टीचक्राच्या निर्मितीच्या मुळाशी महालक्ष्मीला नेऊन ठेवलेले दिसते. याचाच अर्थ ती हिरण्यवर्णा (आणि हिरण्यगर्भा) महालक्ष्मी आविर्भूत होऊन सृष्टयोत्पत्ति करत असते, हे इथे स्पष्ट झाले. आता आपण इ.स. १२६६ च्या शिलालेखामधली महालक्ष्मीची स्तुति घेऊ. त्यामधील तिची ‘प्राक्तनि तनु:’, ‘सादिसुरत्रयी’ ही विशेषणे लक्षात घेण्यासारखी आहेत. प्राक्तनि तनु: म्हणजे ‘जिचे शरीर (इथे अवतार या अंगाने) अत्यंत पुरातन आहे’ आणि सादिसुरत्रयी म्हणजे ‘जी सुरत्रयी म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची आदि आहे’.
पुन्हा इथे प्राक्तनि तनुच्या माध्यमातून तिची आदिमता स्पष्ट होते. म्हणजे सृष्टीच्याही आधी महालक्ष्मीचा आविर्भाव झालेला आहे, हे मत इथे पुनर्मुद्रित होताना दिसते. सादिसुरत्रयीच्या द्वारेदेखील तिला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या निर्मितीचे श्रेय देऊन पुन्हा तिचे आदिम स्वरूप आणि हिरण्यगर्भाशी मांडलेले साधर्म्य स्पष्ट होऊन जाते. यावरून आपल्याला तत्कालीन समाजमासात महालक्ष्मीविषयीची अवधारणा समजते. आता हीच अवधारणा प्राधानिक रहस्यामध्ये प्रतिबिंबित झाली की प्राधानिक रहस्यामध्ये मांडलेली प्रतिमा समाजमानसात रूजली. हा पुढील सखोल संशोधनाचा विषय ठरतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.