आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे देशाचे रक्षणकार्य, अभियंता, डॉक्टर, शिक्षण यात महिला जिगर दाखवत सहभाग नोंदवत असताना एक नवीन व उत्साही वकील म्हणूनही कर्तव्य पार पाडत आहेत.
Navratri Festival Nav Durga : सर्वच क्षेत्रांत कर्तृत्वास सिद्ध नवदुर्गा कायदेपंडितही आहेत. ‘आम्ही कुठेही कमी नाही,’ असे सांगत काळा कोट घालून कायद्यावर बोट ठेवत आहेत. या माध्यमातून महिलांवर (Women) अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा ठोठावत त्यांच्या संरक्षणाचा ध्यासच या नवदुर्गांनी घेतला. त्या कर्तृत्ववान महिलांविषयी...
चिखली (ता. शिराळा) येथील शेतकरी कुटुंबातील मनीषा पाटील यांनी दिवाणी न्यायाधीश म्हणून वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण चिखली येथे झाले. बी. एस. एल., एलएल. बी. भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज (कोल्हापूर) येथून पूर्ण केले. सन २०१३ पासून कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली सुरू केली. बार असोसिएशनच्या (Bar Association) महिला प्रतिनिधी म्हणूनही काम केले.
वकिली करतानाच स्पर्धा परीक्षा दिली. पहिल्या प्रयत्नात सन २०१९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी म्हणून निवड झाली. सध्या रत्नागिरी जिल्ह्यात खेड येथे कार्यरत आहेत. त्यांच्या यशात अशिक्षित आईच पहिल्या गुरू आणि वडिलांची खंबीर साथ मिळाली. मुलीच्या शिक्षणाला नातेवाइकांच्यातून नकारात्मकता असताना आई-वडिलांच्या सकारात्मकतेमुळे मनीषा यशस्वी झाल्या.
कोर्ट-कचेरीत आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोफत कायद्याचे मार्गदर्शन करून पणजोबा क्रांतिसिंह नाना पाटील व हणमंतवडियेची आजी क्रांतिवीरांगना हौसाताई यांचा वारसा पुढे नेण्याचे काम अॅड. क्रांती पाटील करीत आहेत. दिवाणी, बँकिंग, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणातील गरिबांना त्या मोफत कायदेविषयक सल्ला देतात. शासनाची विधी शिबिरे, शाळा-महाविद्यालयात व्याख्याने या माध्यमातून प्रबोधन करीत आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. सध्या त्या लोकन्यायालयाच्या पॅनेलवर काम करीत आहेत. इस्लामपूर वकील संघटनेच्या सहसचिव म्हणूनही कार्यरत आहेत. समाजसेवेचे बाळकडू रक्तातच असल्याने त्यांनी पणजोबा क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतिवीरांगना हौसाताई यांचा वारसा पुढे चालवला आहे.
घरची स्थिती बेताची. कुटुंबात खर्चाला पाच तोंडं. कर्ता पुरुष एकटा. कारखान्यात कामाला. तुटपुंजा पगार व पिकेल त्या शेतीवर घरचा भार होता. लहानपणापासून वेदश्रीला शिक्षणाची आवड. अभ्यासात हुशार. कायद्याचं शिक्षण घेतलं तर आपली मान ताठ राहील, पैसा घरात येईल, या उद्देशानं आईने पुढाकार घेतला. वेदश्रीने आईचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. सांगलीत राहून शिक्षण घेणे, खानावळीत दर आठवड्याला सुटी, अपुऱ्या पैशांअभावी तो दिवस पार पाडणे, त्या वेळी मैत्रिणींनी सहकार्य करून निभावून नेणं, यांसह अन्य अडचणी असताना घेतला वसा सोडायचा नाही, हे पक्क ध्यानात घेत वेदश्रीने प्रथम श्रेणीत कायद्याची पदवी मिळवली.
देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील वेदश्रीने कष्टाने यश मिळवत परिवाराचे नाव उज्ज्वल केले. बी. एस. एल., एलएल.बी. पूर्ण करत तिने प्रॅक्टिस केली. गावच्या लोकांचं चांगलं व्हावं, यासाठी वेळोवेळी कायदा साक्षरता अभियान राबविण्यात पुढाकार घेतला. लग्न वकील घराण्यातच झाले. विधिज्ञच असलेल्या पती सुजित पुरोहितांकडून प्रोत्साहन व ज्येष्ठ विधिज्ञ सासरे अजित पुरोहित यांच्याकडून ती व्यवसायातील बारकावे जाणून घेत आहे.
ॲड. अनघा जयंत कुलकर्णी. आटपाडी वकील संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष. १९ वर्षे त्या वकील म्हणून सक्रिय आहेत. समाजाच्या प्रत्येक गोष्टीशी बांधिलकी ठेवून राहणारं असं त्यांचं व्यक्तिमत्त्व. मांगलेच्या कन्यारत्न व माडगुळेच्या स्नुषा. कष्ट, जिद्द, जिज्ञासेच्या जोरावर त्यांनी यश मिळवलं. एम. ए. (इंग्लिश) असून एलएल. बी. पूर्ण केले आहे. पती आटपाडी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. मुलगी कोल्हापूर येथे वकील आहे. मुलगा अभियांत्रिकीमध्ये शिकत आहे. १९ वर्षे दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारची कामे पाहतात. जायंट्स ग्रुप अध्यक्ष, पोलिसमित्र, महिला संरक्षण समिती अध्यक्ष अशी पदे भूषवली आहेत. विविध बँकांच्या पॅनेलवर आहेत. महिलांना न्याय मिळवून देताना पुरुषांवर अन्याय होणार नाही, याची खरबरदारी त्या घेतात.
खुपिरे-शिंदेवाडी (जि. कोल्हापूर) येथील ॲड. वर्षा सचिन शेवडे. सन २०१३ पासून मांगलेच्या स्नुषा आहेत. आई-वडील शेतकरी कुटुंबातील. गावातील पहिल्या वकील आहेत. मुले वेगवेगळ्या क्षेत्रात असावीत, अशी आई वडिलांची इच्छा. एक भाऊ डॉक्टर, एक खासगी कंपनीत, बहीण वैद्यकीय क्षेत्रात आहे. सन २००९ मध्ये कोल्हापूर येथील लॉ कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेतले. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दिवाणी, कौटुंबिक खटले चालवले. सहकार न्यायालयातही काम केले. सन २०१३ मध्ये मांगलेच्या ॲड. सचिन शेवडे यांच्याशी लग्न झाले. शिराळा-इस्लामपूर येथील न्यायालयात काम करताना त्यांनी महिलांच्या कौटुंबिक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेकांचे संसार मोडण्यापासून वाचवले. विशेषतः महिलांच्या अडचणी दूर करून कायदेशीर साक्षर व सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला.
पलूस येथील ॲड. राजेश्री गोंदिल सन २००६ पासून वकिली करतात. सामाजिक बांधिलकी म्हणून व्यवसायात असल्याचे नेहमी सांगतात. ग्रामीण भागात शिक्षण झाले. घरी समाजकारण व राजकारणाचा वारसा होता. त्यातूनच समाजासाठी काहीतरी कार्य करण्याचे ठरवले. महिलांवर अन्याय-अत्याचार दिवसेंदिवस वाढत आहे. अशा महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. गोंदिल प्रयत्नशील असतात. अनेक सामान्य महिला व नागरिकांना त्यांनी न्याय मिळवून दिला. महिला वकील म्हणून काही अडचणी येतात. त्यावर मात करून ग्रामीण भागातूनही एक महिला उत्तम प्रकारे वकिली करू शकते. महिलांना आधार व न्याय मिळवून देऊ शकते, याचे आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सध्या त्या पलूस व सांगली न्यायालय कार्यक्षेत्रात वकिली करतात.
विटा शहरातील आदर्शदायी महिला व्यक्तिमत्त्व म्हणून ॲड. शौर्या सुरेश पवार परिचित आहेत. बालपणीच विविध जबाबदाऱ्या पार पाडत प्रतिकूलतेत शिक्षण घेतले. पहिली गुरू शिक्षिका असलेल्या आईकडून चांगली शिकवण मिळाली. कुटुंबाचा भार स्वतःवर घेत बहिणींना शिकवून स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. महिला पिग्मी एजंट ते पतसंस्था अध्यक्ष असा प्रवास केला. गरीब, महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी वकिलीचे शिक्षण घेतले. विटा न्यायालयात धडाडीच्या दिवाणी व फौजदारी वकील म्हणून त्यांनी ठसा उमटवला.
शाळा, कॉलेज, गणेशोत्सव अशा विविध कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन व व्याख्यानाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करतात. कला, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. शैक्षणिक, राजकीय, सहकार, सामाजिक अशा संस्थांत कार्यरत राहून गरिबांना सहकार्य केले. पती ॲड. सुरेश पवार यांची साथ मिळाली. मुलगा डॉ. गौरव वैद्यकीय क्षेत्रात उत्तम काम करत आहे. मेहनत, जिद्द, कामावर निष्ठा व मदत करण्याची वृत्ती या जोरावर समृद्ध जीवन जगत आहेत. समस्यांना सामोरे जात संघर्ष करून, सदैव कार्यरत राहून यश मिळवता येते, असा संदेश महिलांसाठी त्या देतात.
ॲड. ऋतुजा जगन्नाथ गुरव. मूळच्या तासगाव येथील. तासगाव, पलूस, सांगली येथे वकिली करतात. पीडित सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. स्त्री म्हणून स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना सर्वच क्षेत्रात कर्तृत्वाला सिद्ध झालेली नवदुर्गा आहे. आम्ही कुठेही कमी नाही, हे अनेक महिलांनी कर्तृत्वातून दाखवून दिले. आव्हानांना सामोरे जात जिद्दीच्या बळावर पुढे जात असता या व्यवसायात स्त्री-पुरुष असा भेदभाव कमी होऊ लागला आहे. आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे देशाचे रक्षणकार्य, अभियंता, डॉक्टर, शिक्षण यात महिला जिगर दाखवत सहभाग नोंदवत असताना एक नवीन व उत्साही वकील म्हणूनही कर्तव्य पार पाडत आहेत.
‘गरिबांना कोर्ट-कचेरीच्या कामात मदत व्हावी, यासाठी व्यवसायात पदार्पण केले. नीडर व स्वावलंबनाने इथे काम करता येते,’ असे कडेगाव तालुक्यातील चिखली येथील ॲड. ऋतुजा महेश शिंदे यांनी सांगितले. वडील कडेगाव व विटा न्यायालयात नामांकित वकील. त्यांनी समाजाप्रती दिलेले योगदान व त्यांना मिळत असलेले समाधान पाहून शालेय जीवनातच वकील होण्याचे स्वप्न पाहिले. प्राथमिक शिक्षण कडेपूर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण कडेगाव येथील भारती विद्यापीठाच्या कन्या प्रशालेत. वकिलीचे शिक्षण कऱ्हाड येथे झाले. चिखली येथे ॲड. महेश शिंदे यांच्याशी विवाह झाला. दोघेही कडेगाव व विटा न्यायालयात वकिली करीत असून समाजातील सामान्य व गरीब पक्षकारांना अल्प मोबदल्यात न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहेत. नागरिकांना विविध कायद्यांविषयी माहिती व जनजागृती व्हावी, यासाठी मोफत कायदेविषयक सल्लाही देतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.