व्यवसायात चढ-उतार येतात, आपण निष्ठेने आणि उत्तम गुणवत्ता द्यायची, यश मिळते.
Navratri Festival Navdurga : ‘संसाररथाची दोन चाकं... दोन्ही एका लयीत, वेगानं धावली तर विकास साधता येतो,’ या विचारातून आता महिलांच्या करिअरकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाऊ लागले आहे. त्यातून तिनं उद्योग-व्यवसायात पाय रोवले, स्वावलंबी झाली अन् कुटुंबाला पुढे नेऊ लावली. शहर काय अन् गावखेड्यात काय; महिलांनी (Women) उद्योग-व्यवसायात (Industry Business) स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
प्रतिमहिना १४०० रुपयांची नोकरी ते जैविक खत उत्पादन कंपनीची मालकीण असा यशस्वी प्रवास करत सौ. आशा कृष्णा पाटील यांनी उद्योजक बनू पाहणाऱ्या महिलांपुढे आदर्श निर्माण केला आहे. सुरुल (ता. वाळवा) हे त्यांचे गाव. माहेर कापूसखेड. सामान्य परिस्थिती. १९९९ ला विवाह झाला. बी. एस्सी.ची पदवी हाती होती. कृषी पदवीधर संघात १४०० रुपये पगाराची नोकरी सुरू केली. पुढे, राजारामबापू कारखान्यात नोकरी केली. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची जिद्द होती. जैविक खतनिर्मितीत पाऊल टाकायचे ठरवले. चाळीस लाखांचे कर्ज घेऊन इस्लामपूरच्या एमआयडीसीत २०१०-११ ला समर्थ ॲग्रोटेक कंपनी सुरू केली. अल्पावधीत प्रगती साधली. उद्योगविस्तार झाला. हाय डेन्सिटी खत प्रकल्प सुरू केला. शिराळा येथे प्रोजल ठिबक सिंचन कंपनी स्थापली. प्रकाश काजू प्रक्रिया उद्योग उभारला.
सारं काही व्यवस्थित सुरू असताना पतीच्या निधनानं आभाळ कोसळलं. त्यातून सावरत त्यांनी उद्योगाची सूत्रे हाती घेतली. शेतीत लक्ष घातलं. त्या बी.ए., बी.एड. झालेल्या आहेत. माहेर इस्लामपूर. विविध संकटांवर मात करत कठीण परिस्थितीत कुटुंब सावरलं आणि उद्योगाला स्थिरता दिली. सावंतपूर (ता. पलूस) येथील अश्विनी राडे यांची ही यशोगाथा लढाऊ स्त्रीचे प्रतीक आहे. पलूस औद्योगिक वसाहतीतील मशीन शॉप अश्विनी यांनी उत्तम चालवला. त्यात प्रगती केली. अनेकांना रोजगार दिला. मशीन शॉपसह भविष्यात आणखी उद्योग वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुलींचा सांभाळ, शिक्षण अशी जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली आहे. द्राक्षशेती उत्तम राखली आहे. भविष्यात महिलांना उद्योग-व्यवसायात अधिक संधी देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यासाठी काही प्रकल्पांवर त्या कामही करत आहेत.
अंबिका मेडिको हे नाव कवठेमहांकाळमध्ये सुपरिचित आहे. नीलिमा शशिकांत गुरव यांची ही फर्म आहे. त्या शहरातील पहिल्या महिला फार्मासिस्ट आहेत. २००१ ला त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि २००२ पासून व्यवसाय सुरू केला. गेली २१ वर्षे त्या निष्ठेने सेवा करत आहेत. त्या मूळ विट्याच्या. घरात वैद्यकीय परंपरा. भाऊ, बहीण डॉक्टर. त्यामुळे त्याही वैद्यकीय क्षेत्राकडे वळल्या. ‘हा व्यवसाय आहेच, मात्र त्यातून रुग्णसेवेचे समाधान मिळते, रुग्णांची गरज व परिस्थिती पाहून त्यांना सर्वोत्तम पर्याय देतो,’ असे त्या सांगतात. लग्नानंतर त्यांनी उद्योगात पाऊल ठेवले आणि यश मिळवले. ‘उद्योग-व्यवसायात महिलांनी आले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांनी चार लोकांना रोजगारही दिला आहे.
कडेगाव येथील सारिका माळी यांचा आरोग्यदायी दाणेदार गुळाचा व्यवसाय आहे. त्यांची सारिका फूड्स कंपनी असून प्रशस्त दालनात व्यवसाय सुरू आहे. सारिका यांचे माहेर बोईसर (मुंबई) आहे. वडिलांनी त्यांना स्वावलंबी व स्वाभिमानी बनण्याची शिकवण दिली. ‘कमवा व शिका’ योजनेंतर्गत त्यांनी बी. कॉम. केले. २००४ ला कडेगाव येथील उद्योजक दत्तात्रय माळी यांच्याशी विवाह झाला. ते मुंबईलाच स्थायिक होते. मुंबईत आरोग्यदायी, रसायनमुक्त गुळाला मागणी होती. ती लक्षात घेऊन सारिका यांनी आरोग्यदायी, दाणेदार गुळाचा व्यवसाय कडेगावात करायचे ठरवले. कडेगावमध्ये सारिका ॲग्रो फूड्स कंपनी स्थापन केली. त्यांनी महिलांच्या हाताला काम दिले. येथे तयार होणारा गूळ मुंबईत विकला जातो. त्याला खूप चांगली मागणी आहे. प्रशस्त दालनात त्यांचा व्यवसाय सुरू आहे.
ॲड. शाहीन विपुल तारळेकर... आधी वकिलीचं शिक्षण घेतलं, मग एम.बी.ए. केलं. आंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी केली. हे सगळं खानापूरसारख्या खेड्यातून राहून केलं. लग्नानंतर विट्यात आल्या. वकिली की उद्योग? यातील त्यांनी उद्योग निवडला. समवेतच करिअर करून पाहणाऱ्या महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. पती विपुल यांच्या यंत्रमाग व्यवसायात हातभार लावला. स्वतःचा प्लेसमेंट आणि करिअर मार्गदर्शन व्यवसाय सुरू केला. महिला व्यावसायिकांना दिशा देण्याचे काम सुरू केले. विटा लेडीज बिझनेस असोसिएशनची स्थापना केली. महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यात पुढाकार घेतला. व्यवसाय करणाऱ्या महिलांचे हक्काचे व्यासपीठ बनले. व्यवसाय प्रदर्शन, व्यावसायिक बैठका, वितरण, विपणन कार्यशाळा सुरू केल्या. आता तीन हजार महिला एकत्र आहेत. ग्रामीण महिलांना आंतरराष्ट्रीय बाजार मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.
अनिता गुलाबराव पाटील... माहेरी शेतीचा गंध नव्हता, मात्र नवे शिकावे, पुढे जावे, या उद्देशाने त्यांनी ‘माणदेश नर्सरी’ उभारली. व्यवस्थापन उत्तम केले. आता त्या यशस्वी रोपवाटिका चालक आहेत. माहेर शेटफळे, तर सासर आटपाडीतील गवरचिंच मळा. त्या बी. कॉम.पर्यंत शिकल्या आहेत. पती गुलाबराव पाटील नोकरी करायचे. शेतीची आवड असल्याने त्यांनी सेवानिवृत्ती घेत गवरचिंच मळा हे गाव गाठले. दहा गुंठ्यांत पॉलिहाऊस उभारून फळ, फुले आणि भाजीपाला नर्सरी सुरू केली. व्यवस्थापन आणि नियोजनाची जबाबदारी अनिता यांच्यावर सोपवली. डाळिंब, ड्रॅगन फ्रूट, द्राक्ष आणि आंब्याची लागवड केली. पंधरा कामगारांना रोजगार दिला. रोपांचे संगोपन, फवारणी आणि विक्री या सर्वांची जबाबदारी अनिता सांभाळतात. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर गेल्या सात वर्षांपासून त्यांचा हा उद्योग सुरू आहे. सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
शिराळा येथे तीस वर्षांपूर्वी सासूने लावलेल्या रोपट्याचे स्मिता अतुल पारेख यांनी वटवृक्षात रूपांतर केले आहे. कापड व्यवसायात पारेख कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्मिता यांचे प्राथमिक शिक्षण एकसंबा येथे झाले. पदवी चिकोडीत घेतली. शिराळा येथील गुरुवार पेठेत त्यांचे दुकान सुलभा भाभींचे दीपक साडी सेंटर म्हणून नावारुपास आले आहे. तीस वर्षांपासून कापड विक्री व्यवसाय सुरू आहे. ग्राहकांशी असणारे आपुलकीचे नाते व खात्रीशीर कापड दर्जा यामुळे येथे ग्राहक आपलं दुकान म्हणून येतात. त्यांनी व्यवसायाची प्रेरणा सासू सुलभा यांच्याकडून घेतली. स्मिता यांच्या लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या खांद्यावर दुकानाची जबाबदारी आली. त्यांनी गेली ३० वर्षे प्रभावाने ग्राहकांशी विश्वासाचे नाते जपले आहे. ‘व्यवसायात चढ-उतार येतात, आपण निष्ठेने आणि उत्तम गुणवत्ता द्यायची, यश मिळते,’ असे त्या सांगतात.
जत बाजारपेठेची आवश्यकता काय? ताजा भाजीपाला... खटाव (ता. मिरज) येथून जतला भाजीपाला न्यायचा, किरकोळ विकायचा... पुढे, गरज लक्षात आली. घाऊक भाजीपाला व्यापार सुरू झाला. अमृतवाडी (ता. जत) येथील माहेरवाशीण सावित्रा तम्मा मिरजे यांनी पतीच्या साथीनं हा व्यवसाय सुरू केला. आज त्याचं जत मार्केट यार्डमध्ये अडत व्यापारी दुकान आहे. तेथे आता घाऊक भाजीपाला व्यापार सुरू केला आहे. समवेतच विजापूर रस्त्यावर बेकरी, स्नॅक सेंटर, रसवंतिगृह सुरू केले आहे. छोट्या व्यवसायातून उत्पन्नाचे विविध पर्याय त्यांनी निर्माण केले आहेत. त्या जोरावर मुलांचे उच्च शिक्षण सुरू आहे. सावित्री यांचे शिक्षण फार झालेले नाही, मात्र हिशेबात त्यांचा हातखंडा आहे. एक रुपयाचा देखील फरक पडत नाही. जतसारख्या ठिकाणी प्रचंड आव्हाने आहेत, तितक्याच संधीही आहे. ती संधी साधत मिरजे कुटुंबाने निष्ठेने चांगला व्यवसाय उभारला आहे.
मौजे डिग्रजचे प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील पाटील. व्यवसाय अडचणीत आला आणि त्यांनी खाद्य पदार्थ निर्मितीत प्रवेश केला. पत्नी सुनीता यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. भडंग, मका चिवडा, आंबील आणि मठ्ठा... चार पदार्थ, मात्र चव अशी की लोक शोधत यायचे. दुर्दैवाने, सुनील यांचे आकस्मिक निधन झाले. कुटुंब उघड्यावर पडले. सुनीता यांनी पदर खोचला आणि व्यवसायाची पूर्ण सूत्रे हाती घेतली. मक्याचा चिवडा, नाचणी आंबील, मठ्ठा, आंबील त्याच बनवायच्या, विक्रीलाही त्याच बाहेर पडल्या. भडंग निर्मितीसाठी यंत्रे खरेदी केली. दिवाळीसाठी चकली, लाडू बनवतात; उन्हाळ्यात मठ्ठा, आंबीलला प्रचंड मागणी असते. वर्षभर भडंग, मका चिवडा खपतो. ‘पाटील भडंग’ आता ब्रँड झाला आहे. मुलगी अभियंता आहे. ती आता अमेरिकेत असते. महिला सक्षम असेल तर संकटात कुटुंब खचू देत नाही, याचे संगीताताई उत्तम उदाहरण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.