Ayodhya Ram Mandir esakal
संस्कृती

Ayodhya Ram Mandir : लोकसहभाग आणि नियोजनबद्ध प्रयत्नांतून मंदिर! स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची मुलाखत

श्रीराम मंदिरासाठीच्या लढ्यात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले स्वामी गोविंददेव गिरी महाराज आता श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष आहेत. मंदिरासाठीच्या विविध टप्यांवर देशाच्या कानाकोप-यातून मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला. त्यासाठी न्यासाने नियोजन करीत प्रयत्न केले.

सकाळ वृत्तसेवा

।। जय श्रीराम ।।

श्रीराम मंदिरासाठीच्या लढ्यात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले स्वामी गोविंददेव गिरी महाराज आता श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोशाध्यक्ष आहेत. मंदिरासाठीच्या विविध टप्यांवर देशाच्या कानाकोप-यातून मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळाला.

त्यासाठी न्यासाने नियोजन करीत प्रयत्न केले. त्यातूनच आता श्रीराम मंदिर साकारले आहे. त्याबाबत स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्याशी 'सकाळ'चे प्रतिनिधी मंगेश कोळपकर यांनी साधलेला संवाद.

प्रश्न : श्रीराम मंदिरासाठीच्या एका संघर्षाची यशस्वी सांगता झाली आहे, असे म्हणता येईल का ?

उत्तर ः भारतीय समाजजीवनात भगवान श्रीराम यांना जीवनाचा आदर्श म्हणून ओळखले जाते. त्यांच्या मंदिरासाठीच्या उभारणीसाठी एवढा प्रदीर्घ संघर्ष करावा लागला, याचेच मुळात वाईट वाटते. परंतु, चिकाटीने प्रयत्न केल्यामुळे आणि मुख्यतः सत्यासाठी दिलेला लढा असल्यामुळे तो यशस्वी झाला.

आता राम मंदिर साकारत आहे, त्याचे समाधान आहे आणि संघर्षाचा शेवट गोड झाला. देशाचा इतिहास एका वेगळ्या वळणावर आला आहे. हे मंदिर म्हणजे कोणत्या एका धर्मावर विजय, अशी आमची भूमिका अथवा समजूत नाही.

वेगवेगळ्या प्रांतांना, धर्मांना, समुदायांना जोडणारे भगवान श्रीराम आहेत. त्यामुळे ते श्रीराम हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत. देशाची ती राष्ट्रीय अस्मिता आहे. अशा या भगवंताचे मंदिर निर्माण झाले आहे, ही आपणा सर्वांसाठीच मोठी बाब आहे.

प्रश्न : श्रीराम मंदिरामुळे जगापुढे कोणता संदेश गेला आहे ?

उत्तर : आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली. अनेक मंदिरे जमीनदोस्त झाली, तेव्हा भारतीय समाजाची जगात हेटाळणी झाली. त्यातून आपल्या समाजाच्या मानसिकतेवर परिणाम झाला.

मंदिर निर्माणातून आता पराभूत मानसिकता दूर झाली आहे. त्यातून देशाबद्दलची राष्ट्रीय अस्मिता मंदिराच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. मंदिरासाठी न्यायालयीन निकालाची सुनावणी पारदर्शक होती. जगाने ती बघितली.

त्यामुळे परिस्थिती तावून सुलाखून निघाली आणि त्यातून श्रीराम मंदिर साकारले आहे. अजूनही काही लोक श्रीराम ही काल्पनिक कथा असल्याचे म्हणतात, मात्र श्रीरामाच्या पाऊलखुणा देशभर आहेत. श्रीराम मंदिरामुळे आता रामकथा काल्पनिक नव्हे, तर वास्तव असल्याचे अधोरेखित झाले आहे.

श्रीराम मंदिरासाठी भारतीय समाजाने प्रदीर्घ काळ लढा दिला आणि आता श्रीरामाची वाजतगाजत प्रतिष्ठापना होत आहे. याचाच अर्थ आपला देश बलशाली झाला आहे. न्याय्य मार्गाने सत्य आता जगापुढे आले आहे. भारतीय समाज हार मानणारा नाही, तर लढणारा आहे, सत्याची कास धरून पुढे जाणारा आहे, ही बाब आता जगापुढे आली आहे.

प्रश्न : श्रीराम मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर ते लोकांपर्यंत कसे पोहचणार, मंदिराची वैशिष्ट्ये काय?

उत्तर : अयोध्येत साकारत असलेले श्रीराम मंदिर हे केवळ पूजापाठ होणारे मंदिर नाही, तर विश्‍वमांगल्याचा ठेवा असणारे राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र आहे. या मंदिराच्या माध्यमातून जगापुढे भारतीय संस्कृतीचे दर्शन होईल.

थायलंडपासून पाकिस्तानपर्यंतचे युवक येथे येतील, येथील संस्कृती, विचार समजून घेतील. त्यातून सांस्कृतिक देवाणघेवाण होईल. परस्परांचे विचार समजून घेऊन सहकार्याने ते नांदतील आणि वैश्‍विक शांतता प्रस्थापित होईल, अशी आमची इच्छा आहे.

गावागावांतून आलेल्या शिलांच्या आधारे हे मंदिर निर्माण झाले आहे. त्यासाठी प्रत्येक भारतीयाचा हातभार लागलेला आहे. त्यामुळे श्रीरामाची प्रतिष्ठापना झाल्यावर देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रीरामप्रेमी नागरिक आपल्या भगवंताचे दर्शन घेण्यासाठी येथे येतील.

मंदिरासाठी ७० एकर जागा असली, तरी त्यात ३० टक्के जागेतच बांधकाम होईल. आता तळमजला आणि पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. तळमजल्यावर भगवान श्रीराम असतील तर, पहिल्या मजल्यावर श्रीराम परिवार असेल.

दुसऱ्या मजल्यावर रामायणातील प्राचीन व दुर्मीळ ग्रंथ असतील. मुख्य मंदिराच्या आवारात ‘पंचायतन’ संकल्पनेनुसार पाच मंदिरे होतील. येथे होणाऱ्या ‘सीता रसोई’तून रोज श्रीरामाला नैवेद्य दाखविण्यात येईल आणि त्याचा आस्वाद भाविकही घेऊ शकतील.

या ७० एकर जागेत महर्षी वाल्मीकी, महर्षी वशिष्ठ, अगस्ती ऋषी, विश्‍वामित्र, भिल्लांचा राजा निषदराज, शबरी, जटायू यांचीही मंदिरे असतील. पुष्करणी, अनुष्ठान मंडप यांचाही त्यात समावेश आहे.

येत्या दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने ही बांधकामे पूर्ण होतील. राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांतून दगड आला आहे. त्यावर हाताने कोरीव काम होत आहे. परिक्रमेचा मार्गही प्रशस्त असेल. मंदिराबरोबरच उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येचे चित्र पालटत आहेत. त्यामुळे जगभरातील भाविकांना आकर्षित करणारी अयोध्यानगरी आता साकारत आहे.

प्रश्न : श्रीराम मंदिरासाठी लोकसहभाग कसा लाभला?

उत्तर ः श्रीराम मंदिरासाठीचा लोकसहभाग उत्स्फूर्त होता. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना झाली. मंदिरासाठी निधी संकलनाला प्रारंभ झाला. मंदिरासाठी १ हजार १०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

मात्र, भगवान श्रीरामाच्या प्रेमापोटी अवघ्या ४० दिवसांत तिप्पट रक्कम जमा झाली. यात परदेशातील एक रुपयाच्याही निधीचा समावेश नाही. ट्रस्ट स्थापन झाल्यावर तीन वर्षे परदेशातील निधी स्वीकारता येत नाही.

त्यामुळे देशातून अगदी २ रुपयांपासून श्रीरामाच्या मंदिरासाठी निधी मिळाला. देशातील दोन मोठ्या उद्योग समूहांनी संपूर्ण मंदिर उभारणी करून देण्याची तयारी दर्शविली. परंतु, आम्ही प्रेमाने त्यांची विनंती नाकारली.

त्यांनी अगदी ५०० कोटी रुपये निधी देण्याची तयारी दर्शविली. मात्र, श्रीराम मंदिर सर्वसामान्यांच्या सहभागातून निर्माण व्हावे, अशी आमची भूमिका आहे. त्यासाठी आम्ही १०० कोटींपेक्षा जास्त कोणाचाही निधी घेणार नाही, असे ठरविले. निधी संकलनाला प्रारंभ केल्यावर सर्वप्रथम देशाचे तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ५ लाख रुपयांचा धनादेश दिला.

श्रीराम मंदिर उभारणी करताना बांधकाम शुल्क, विविध प्रकारचे परवाने या शुल्कांत राज्य, केंद्र सरकारने सवलत देण्याची तयारी दर्शविली. मात्र, आम्ही कोणतीही सवलत घेतली नाही. सर्वसामान्यांप्रमाणेच सर्व प्रकारचे शुल्क भरले.

तसेच, अनेक उद्योग समूहांनी मंदिरासाठी बांधकाम साहित्य, इलेक्ट्रिक वस्तू, अन्य वस्तू आणि सेवा मोफत देण्याची तयारी दर्शविली. मात्र, त्यांनाही पैसे देऊनच आम्ही वस्तू आणि सेवा घेतल्या. हे मंदिर सर्वसामान्यांनी उभारले आहे, हाच संदेश आम्हाला जगाला द्यायचा आहे. आता तीन वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे आता परदेशातूनही निधी मिळण्यास सुरुवात झाली आहे.

प्रश्न : भविष्यातील अयोध्या कशी असेल ?

उत्तर ः अयोध्येत श्रीरामाचे मंदिर साकारत आहे, ही जागतिक घटना आहे. श्रीरामाच्या मंदिराची उभारणी होत असताना, त्याला साजेशी अयोध्यानगरी असेल. विमानतळ, रेल्वे स्थानक, महामार्ग, रिंग रोड, उड्डाण पूल होत आहेत. शहराची रचना बदलत आहे.

जगभरातून येणाऱ्या गरीब-श्रीमंत पर्यटकांना येथे पुरेशा सुविधा मिळतील. त्यासाठी पार्किंग लॉट्स, निवासव्यवस्था असेल. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भाविक येथे पोहचू शकतील आणि आनंदाने श्रीराम लल्लाचे दर्शन घेऊ शकतील.

जागतिक दर्जाचे शहर, असे अयोध्येचे स्वरूप आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. तसेच, स्थानिक प्रशासनही या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यातून भव्य श्रीराम मंदिराबरोबरच आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शहरही साकारत आहे. त्यामुळे जुन्या काळातील वैभवशाली अयोध्येची अनुभूती पुन्हा येईल.

प्रश्न : मंदिरासाठीचा संघर्ष ते मंदिर उभारणी, या प्रवासाकडे आपण कसे पाहता?

उत्तर : श्रीराम मंदिरासाठी लोकचळवळीत गेल्या ५० वर्षांपासून सहभागी आहे. यांतील प्रत्येक टप्प्यात मला योगदान देता आले. कधी आंदोलने केली, तर कधी सरकार दरबारी वारंवार जावे लागले.

अनेक जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि पूर्ण केल्या. जनजागरूकता करण्यासाठी देशभर प्रवास करावा लागला. मात्र, उद्दिष्ट एकच होते, ते म्हणजे श्रीरामाचे मंदिर. यामध्ये मी काही केले, अशी माझी भूमिका कधीच नव्हती.

अवघे आयुष्य श्रीरामासाठी वेचत आहे. सेवा करण्याच्या भावनेतून जगत आलो. मंदिर निर्माणासाठी कार्यरत राहण्याची एक संधी मला मिळाली, अशीच माझी भावना आहे. मंदिर उभारणीतून राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न साकार होत आहे. सर्वसामान्यांच्या आकांक्षांची पूर्ती होत आहे, याचेच मला समाधान आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Shami नाहीच; KL Rahulला अभय

Porsche Car Accident : डॉ. तावरेसह हाळनोरविरुद्ध फौजदारी खटला चालणार; राज्य सरकारकडून मंजुरी

South West Nagpur Assembly Election : विरोधकांसाठी आमच्या ‘लाडक्या बहिणी’च पुरेशा; देवेंद्र फडणवीस यांची टीका

Imtiaz Jaleel: "ज्यानं मला पाडलं, त्याला पाडण्यासाठी मी काय करतो बघाच"; इम्तियाज जलील यांचा थेट इशारा

IND A vs AFG A : भारतीय संघाचे लोटांगण; अफगाणिस्तानने उपांत्य फेरीत वाईट पद्धतीने हरवले

SCROLL FOR NEXT