आज नामदेव महाराजांची पुण्यतिथी आहे. नामदेव महाराजांनी भारताताच्या कानाकोपऱ्यात जाऊन भागवत धर्माचा प्रचार प्रसार केला. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवींपैकी एक आहेत. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला होता. पुढे 1291 साली नामदेवांची संत ज्ञानेश्वरांसोबत भेट झाली. तेव्हा त्यांना गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे याची जाणीव झाली. कालांतराने नामदेव नागनाथ औंढा येथे गेले आणि विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेतला आणि शिष्यत्व पत्करले.
संत नामदेव महाराज अभंग
विपुल अभंग रचना नामदेवांनी मराठीत विपुल अभंगरचना केली आहे. त्यांच्या अभंगांच्या पाच छापील गाथा आज उपलब्ध आहेत. त्यांतील अभंगांची संख्या सुमारे अडीच हजार इतकी भरते. परंतु त्यांतील सर्वच अभंग मूळ नामदेवांचे आहेत असे म्हणता येत नाही. त्यांच्या अभंगांचे आत्मचरित्रपर अभंग, ज्ञानेश्वरचरित्रपर अभंग आणि पारमार्थिक आत्मनिवेदनपर अभंग असे प्रकार पडतात.
मराठीप्रमाणेच नामदेवांनी हिंदी भाषेतदेखील अभंगरचना केली आहे. त्यांची सुमारे 125 इतकी हिंद उपलब्ध आहेत. यांपैकी 61 पदे शिखांच्या ‘ग्रंथसाहिब‘ या पवित्र ग्रंथात अंतर्भूत करण्यात आली असून ती ‘नामदेवजी की मुखबानी’ या नावाने ओळखली जातात.
संत नामदेव परमार्थातील समतावादी असून त्यांचा भक्तिमार्ग जाणते व नेणते अशा सर्वांकरिता आहे. इतर साधने व्यर्थ असून उत्कट भक्ती हेच परमार्थप्राप्तीचे एकमेव साधन होय, अशी त्यांची श्रद्धा आहे. आयुष्याच्या राशीस काळाचे माप लागलेले असून हा देह क्षणाक्षणाला काळाच्या हाती जात आहे, हे ओळखून देह असतानाच हरिभक्ती करा आणि अंतीचा लाभ आधीच साधून घ्या, हे त्यांच्या पारमार्थिक शिकवणुकीचे सार आहे.
नामदेवांनी ज्ञानेश्वर, सावता माळी, चोखामेळा इत्यादी संतांसमवेत तीर्थयात्रा केली. ज्ञानदेवांनी आळंदी येथे समाधी घेतली तेव्हा नामदेव तेथे उपस्थित होते. त्यानंतर नामदेवांनी पुन्हा एकदा तीर्थयात्रेसाठी प्रस्थान केले . या वेळी त्यांनी थेट उत्तर भारतापर्यंत मजल मारली. त्या ठिकाणी भागवत धर्माचा प्रसार करण्याचे बहुमोल कार्य त्यांनी केले. त्यांच्या या कार्याचे कौतुक करताना बहिणाबाई म्हणतात,
“ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिलें देवालया।।
नामा तयाचा किंकर। तेणे केला विस्तार।।”
नामदेव महाराजांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. पंजाबात त्यांचे सुमारे वीस वर्षे वास्तव्य होते. नामदेव हे दीर्घायुष ठरले. वयाच्या 81 व्या वर्षी म्हणजे शके 1272 मध्ये म्हणजे 3 जुलै, 1350 रोजी त्यांनी पंढरपूर येथे देह ठेवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.