कोल्हापूर येथील शाही दसरा सोहळ्याला यंदा शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे.
सातारा : प्रथेप्रमाणे यंदाही साताऱ्यातील जलमंदिर येथे शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे (Satara Royal Dasara Ceremony) आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी भवानी तलवारीचे पूजन झाल्यानंतर पोलिस दलाच्या वतीने येथे मानवंदना देण्यात येणार आहे. यानंतर हत्ती, उंट, घोडेस्वार आणि पारंपरिक वेशातील मावळ्यांच्या सहभागात भवानी तलवारीची मिरवणूक पोवई नाका येथे येणार आहे.
कोल्हापुरातही (Kolhapur Royal Dasara Ceremony आज शाही दसरा सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, सातारा येथील शाही सीमोल्लंघन सोहळा यंदाही प्रथेप्रमाणे) साजरा होणार असून, त्यासाठीची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे. यंदाही मिरवणूक भव्यदिव्य व्हावी, यासाठी त्यात प्रशासनानेही आपला सहभाग नोंदवला असून, जलमंदिर येथे दुपारी चारनंतर विविध कार्यक्रम होणार आहेत.
सायंकाळी पाचनंतर येथे मर्दानी खेळांचे सादरीकरण आणि पोवाडा गायन होणार आहे. यानंतर परंपरेनुसार जलमंदिर येथे भवानी तलवारीचे पूजन होणार आहे. या वेळी तलवारीस पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. यानंतर भवानी तलवारीसह सीमोल्लंघनासाठी शाही मिरवणूक मार्गस्थ होणार आहे. या मिरवणुकीच्या अग्रभागी हत्ती, उंट, घोडे राहणार असून, त्यांच्यापाठोपाठ ढोलताशा पथक राहणार आहे.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मिरवणूक आल्यानंतर येथे तलवारीचे पूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. येथील कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा जलमंदिराकडे मार्गस्थ होणार आहे. येथे सायंकाळी साडेसातनंतर राजमाता कल्पनाराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले व राजघराण्यातील इतर सदस्य नागरिकांसमवेत सोने लुटणार आहेत. आयोजित शाही मिरवणुकीत सातारकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
शाही सीमोल्लंघन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येत असून, त्यासाठी मिरवणूक मार्गासह पोवई नाका परिसर सुशोभित करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात विशेष कार्यक्रम होणार असून, त्याचा आढावा आज खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला. या वेळी पोलिस, महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोल्हापूर : येथील शाही दसरा सोहळ्याला यंदा शासनाकडून राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे हा सोहळा आज (मंगळवारी) पारंपरिकतेचा बाज कायम ठेवत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. परंपरेप्रमाणे सूर्यास्तावेळी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांनी दसरा चौकात सोहळा होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज केले आहे.
परंपरेप्रमाणे साडेपाचच्या सुमारास श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई देवीबरोबरच गुरुमहाराज वाड्यातील पालख्यांचे दसरा चौकाकडे प्रस्थान होईल. पालख्या येताच नवीन राजवाड्यावरून मेबॅक गाडी आणि लवाजम्यासह छत्रपती परिवाराचे आगमन होईल. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. त्यानंतर श्री अंबाबाईची पालखी सिध्दार्थनगर मार्गे पुन्हा मंदिरात जाईल. परिसरात करमणुकीची साधने आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलनी हजेरी लावली असून येथे जत्राच भरणार आहे.
पालखीसोबत पारंपरिक लवाजम्यासह ध्वजवाहक घोडा, दहा घोड्यांचे पथक, दोन हत्ती, एक बग्गी (अब्दागिरी), त्यानंतर ३० मावळ्यांचे पथक, ६० खेळाडूंचे पथक, २०० पैलवान, चार उंट असाही लवाजमा असणार आहे. ढोलपथक, लेझीम व धनगरी ढोल पथकांचाही सहभाग असेल. नवीन राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या अडीच हजार विद्यार्थ्यांचे पथक स्वागताला उभे राहणार आहे. शाही मिरवणुकीच्या दोन्ही मार्गांवर फुलांचा सडा, रांगोळ्या सजणार असून भवानी मंडप ते दसरा चौक मार्गावर पारंपरिक पद्धतीने बारा स्वागत कमानी उभारल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.