आषाढ अमावास्येनंतर यंदा तब्बल ५९ दिवसांचा कालावधी
‘श्रावणमासि हर्ष मानसी...’ असे म्हटले जाते. या महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ अमावास्येनंतर यंदा तब्बल ५९ दिवसांचा श्रावण मास असणार आहे. यंदा श्रावणमासात तब्बल आठ सोमवार आले आहेत. अधिक मासामुळे यंदा कालावधीदेखील वाढला आहे. अधिक मासामुळे यावेळी श्रावण महिन्याची सुरुवात १८ जुलैला होणार असून १४ सप्टेंबरला शेवट होणार आहे, असे पुरोहित गणेश जोशी यांनी सांगितले.
श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, असे म्हटले जाते. भगवान शंकराला श्रावण अतिशय प्रिय आहे. यंदा अधिक मास असल्याने दोन महिने श्रावण महिना चालणार आहे.
खास महत्त्व
देवशयनी एकादशीला भगवान विष्णूंसह सर्व देव निद्रायोगात गेल्यामुळे सृष्टीचे पालनकर्ता म्हणून शिवशंकरांकडे जबाबदारी आल्याची आख्यायिका आहे. या महिन्यात शिवाची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी वेगवेगळी व्रतवैकल्ये करतात. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगवेगळे आहे. यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावण सोमवार.
या काळात विशेषत: सोमवारी केलेली पूजा फलदायी मानली जाते. तसेच भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते, आर्थिक समस्या दूर होतात, अशी मान्यता आहे. याच महिन्यात माता पार्वतीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते.
श्रावण सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व आहे. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले आहे. तसेच या दिवसांत शिव प्रतिकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे अत्यंत लाभदायी मानले जाते.
पूजेसोबतच दानाचेही महत्त्व
श्रावण महिन्यात दानाला महत्त्व आहे. भगवान शंकरही तुम्ही केलेल्या दानधर्मामुळे प्रसन्न होतात असे पुराणात सांगितले आहे. काळे तीळ भगवान शंकर आणि शनी महाराज या दोघांनाही प्रिय आहेत. काळ्या तिळाचा वापर श्रावणात शिवाच्या जलाभिषेकासाठी केला जातो.
ज्या लोकांना ग्रहांशी संबंधित दोष आहे, ते श्रावण सोमवारी किंवा शनिवारी काळ्या तिळाचे दान करतात. तसेच शिवपुराणात सांगितले आहे की, जी व्यक्ती श्रावणात मिठाचे दान करते त्याची सर्व संकटे दूर होतात. मिठाच्या दानाने घरात सुख-समृद्धी वाढते. वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय केल्याने घरात पसरलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते, असे म्हटले आहे.
श्रावणात गरजू, गरिबांना तांदूळ दान केल्याने मानसिक शांती लाभते. भगवान शंकराच्या अश्रूतून रुद्राक्षाची निर्मिती झाल्याचे पुराणात म्हटले आहे. त्यामुळे रुद्राक्ष हा भगवान शिवाचा आवडता दागिना आहे.
श्रावण महिन्यात जो भक्त रुद्राक्ष दान करतो, त्याचे आयुष्य वाढून अकाली मृत्यूची भीती दूर होते. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्प दोष आहे, त्यांनी श्रावणात चांदीपासून बनवलेल्या दागिन्यांचे दान करणे शुभ मानले आहे.
महिलांसाठी शिवलिंग पूजनाचे व्रत
ग्रंथांमध्ये श्रावणात शिवलिंग पूजा करण्याचे खूप महत्त्व सांगितले आहे. हे व्रत पाळणाऱ्या महिलांना वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. पार्वतीने स्वतः शिवलिंग पूजनाचे आणि श्रावण सोमवार व्रताचे महत्त्व सांगताना अखंड सौभाग्य प्राप्तीचा मार्ग असल्याचे सांगितले आहे. माता पार्वतीने श्रावण सोमवार व्रताचे वर्णन मृत्यू, रोग-शोक, विघ्न, अडथळा, नकारात्मकता, कौटुंबिक कलह, अपयश इत्यादींचा नाश करणारे म्हणून केले आहे.
असा आहे महामृत्युंजय मंत्र
ओम त्र्यंबकम यजमाहे सुगंधी पुष्टीवर्धनम्।
उर्वरुकमिव बंधनं मृत्युोर्मक्ष्य ममृतत् ॥
अर्थ - या शक्तिशाली मंत्राचा अर्थ असा आहे की, आपण सर्वजण या विश्वाचे तीन डोळे असलेले भगवान भोलेनाथ यांची पूजा करतो. या जगात सुगंध पसरवणारे भगवान शिव आम्हांला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा, जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल.
श्रावण मासातील सणांचे वेळापत्रक
२० ऑगस्ट- श्रावण विनायक चतुर्थी
२१ ऑगस्ट- श्रावणी सोमवार व नागपंचमी
२७ ऑगस्ट- पुत्रदा एकादशी
३० ऑगस्ट- नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन
३ सप्टेंबर- संकष्टी चतुर्थी
६ सप्टेंबर- श्रीकृष्ण जयंती (कृष्णजन्म उपवास)
७ सप्टेंबर- दहीहंडी
१० सप्टेंबर- अजा एकादशी
१४ सप्टेंबर- पोळा (श्रावण अमावस्या) (lord Shiv)
आठ श्रावणी सोमवार
२४ जुलै ः पहिला श्रावणी सोमवार
३१ जुलै ः दुसरा सोमवार
७ ऑगस्ट ः तिसरा सोमवार
१४ ऑगस्ट ः चौथा सोमवार
२१ ऑगस्ट ः पाचवा सोमवार (शिवमूठ- तांदूळ)
२८ ऑगस्ट ः सहावा सोमवार (शिवमूठ- तीळ)
४ सप्टेंबर ः सातवा सोमवार (शिवमूठ- मूग)
११ सप्टेंबर ः आठवा सोमवार (शिवमूठ- जव) (Shravan Mass)
मंत्रजापाचा होतो फायदा
शिवपुराणानुसार जी व्यक्ती महामृत्युंजय मंत्राचा जप करते, तिला मानसिक शांती लाभते. महामृत्युंजय मंत्राचा जप करताना मंत्रांच्या उच्चारात कोणतीही चूक होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. रुद्राक्षाच्या जपमाळाने जप करावा. जप करताना भगवान शंकराची मूर्ती, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र जवळ ठेवावे. शक्यतो आसनावर बसून मंत्रांचा जप करावा. मंत्र जपताना तोंड पूर्वेकडे असावे, असे पुराणात म्हटले आहे.
- संदीप लांडगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.