नवी दिल्ली - आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी प्रथमच थेट भाष्य केले आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन निवाडा होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेचेही दोन पैलू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मालिवाल यांनी केजरीवालांचे स्वीय साहाय्यक विभवकुमार यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपानंतर विभवकुमार यांना अटक होऊन त्यांची रवानगी ही पोलिस कोठडीमध्ये करण्यात आली होती. आज वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये केजरीवाल यांनी हा विषय न्यायालयाच्या विचाराधीन असून त्यावर आताच भाष्य केल्यास सुनावणीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली.
या घटनेची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे असून योग्य निवाडा व्हायला व्हावा. या घटनेचे देखील दोन पैलू आहेत असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही पैलूंची चौकशी करून निवाडा करायला हवा, असे त्यांनी नमूद केले. मारहाण प्रकरणी ‘आप’च्या नेत्या आणि मंत्री आतिशी यांनी स्वाती मालिवाल यांच्यावरच टीका केली होती. मालिवाल या खोट्या बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजपने त्यांना त्यांच्या कारस्थानाचा भाग बनविल्याचा दावाही त्यांनी केला होता.
पत्नी सुनीताने साथ दिली
पत्नी सुनीता यांना राजकारणामध्ये रस नसल्याने त्या विधानसभेची निवडणूक लढणार नाहीत असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. ‘‘जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सुनीताने मला पाठिंबा दिला असून तिच्यासारखी पत्नी मला लाभली हे मी स्वतःचे भाग्य समजतो,’ असे ते म्हणाले. राजकीय वाटचालीबाबत भाष्य करताना केजरीवाल यांनी, झोपडपट्टीमध्ये काम करण्यासाठी प्राप्तिकर विभागातील आयुक्तपदाची नोकरी सोडली होती, असे सांगितले.
पंतप्रधानपदाची इच्छा नाहीः केजरीवाल
‘यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला घवघवीत यश मिळाले तरीसुद्धा मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही. आम आदमी पक्ष हा एक लहान पक्ष असून तो केवळ २२ जागा लढत आहे,’ असे प्रतिपादन अरविंद केजरीवाल यांनी केले. पत्नी सुनीता या राजकारणामध्ये सक्रिय झाल्या असल्या तरीसुद्धा त्यांचा भविष्यात निवडणूक लढविण्याचा कोणताही इरादा नसल्याचे त्यांनी सांगितले.
मी अटकेमध्ये असताना माझ्या पत्नीनेच दिल्लीतील जनतेशी संवाद साधण्याचे काम केले. अनेक भागांमध्ये तिने रोड शो केला तसेच जाहीर सभाही घेतल्या. राजकारणापासून मात्र ती दूर राहील. आताही तुरुंगातून मला काम करणे शक्य व्हावे, म्हणून सर्व सुविधा मिळाव्यात म्हणून आग्रह धरणार आहे.
- अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.