National Flag Day : भारताचा राष्ट्रध्वज अर्थपुर्ण असावा असा कटाक्ष पाळत आजवर त्याचे अनेक प्रकार झाले आहेत. सध्याच्या झेंड्यात असणारे तीन रंग म्हणजे शौर्य, त्याग, शांती, सत्य व देशाच्या सुजलाम-सुफलाम ऐश्वर्याचे प्रतिक आहे. तर मधील धम्मचक्र हे गतीचे द्योतक आहे. हे आपण शाळेत असताना शिकलो आहोत.
पण तुम्हाला माहिती आहे का की, आज दिसणारा तिरंगी ध्वज येण्यापूर्वी भारताने ५ ध्वज पाहिले आहेत. पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत भारताचे झेंडे कसे बदलत गेले याचा प्रवास आपण पाहुया
१) १९०६ कलकत्ता
भारताचा पहीला झेंडा हा १९०६ मध्ये स्वीकारलेला तिरंगी ध्वज मानला जातो. तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअरमध्ये ७ ऑगस्ट १९०६ ला हा झेंडा फडकवला गेला. लाल, पिवळा आणि हिरवा असे तीन रंगांचे तीन पट्टे, मध्यभागी वंदे मातरम हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र-सुर्य तर हिरव्या पट्ट्यावर ८ कमळ असा हा झेंडा होता.
२) १९०७ जर्मनी
भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामांनी जर्मनीच्या स्टुटगार्टमध्ये १९०७ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटीश राजवटीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. १९३६ मध्ये त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात परत आणला. झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा तर खालचा पट्टा केशरी होता.
केशरी पट्ट्यावर चंद्र आणि सुर्य होते, तर हिरव्या पट्ट्यावर ८ तारे होते जे भारताच्या तेव्हाच्या आठ प्रांतांच प्रतीक मानले जात. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावरही वंदे मातरं ही अक्षरं होती.
३) १९१७, होमरूल चळवळीनंतरचा झेंडा
लोकमान्य टिळक आणि डॉ. ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली होमरूल चळवळ १९१७ मध्ये वेग घेत होती. याच चळवळीदरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहिसे बदलले होते. पाच लाल आणि चार हिरवे पट्टे एका आड एक या पध्दतीने होते.
यापुर्वीच्या झेंड्यांप्रमाणे यावर कमळं नव्हती. उलट यावर ७ तारे आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षींच्या आकृतीप्रमाणेच झेंड्यावरही काढले होते. १९१८ मध्ये लोकमान्य टिळकांनी होमरूलच्या काही स्वयंसेवकांसोबत हा झेंडा हाती घातलेला फोटोत पहायला मिळतो.
४) १९२१, आंध्रप्रदेश
भारतीय काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये झाली होती. १९२० पर्यंत आधी टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती.
आंध्र प्रदेशातील बेझवाडा म्हणजे सध्याच्या विजयवाडामध्ये १९२१ मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालं. पिंगली व्यंकय्या या काँग्रेस कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या हे आफ्रिकेत ब्रिटीश लष्करात होते तेव्हा त्यांची आणि गांधींची भेट झाली होती.
पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगांचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचे ते प्रतीक होतं. गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्यात घेतलं गेलं.
नागपूरमध्ये १९२३ मध्ये मे महिन्यात ब्रिटीश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले. यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते. यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती.
५) १९३१ तिरंगी झेंडा आणि चरखा
एव्हाना भारताच्या स्वातंत्र्यतढ्याचं नेतृत्व पूर्णपणे काँग्रेसकडे होतं. १९३१ मध्ये आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेल्या झेंड्यात असलेली रंगांची रचना अस्तित्वात आली.
काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचा झेंडा होता.
६) १९४७, आजचा तिरंगा
घटना समिती १९४७ मध्ये स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार कपत होती. स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेला आला होता. १९३१ मध्ये स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोकस्तंभावर असलेलं धम्मचक्र आलं.
परदेशांत भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना, भारतात ब्रिटीशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्षात १५ ऑगस्ट १९४७ ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी झेंडा अभिमानाने फडकवला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.