नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रदूषित हवेची गुणवत्ता आज सकाळी किंचित सुधारली. त्यानंतर दिल्ली सरकारने प्रदूषणामुळे घातलेले निर्बंध आजपासून मागे घेतले. त्यानुसार दिल्लीतील प्राथमिक शाळा बुधवारपासून सुरू करण्याचा आदेश देण्यात आला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचा ५० टक्के ‘वर्क फ्रॉम-होम’चा आदेशही रद्द केला आहे.
आज सकाळी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३५२ होता व हे प्रमाणही ''अत्यंत खराब'' श्रेणीत मोडते. आज सकाळी नोएडामधील एक्यूआय ३३१ तर गुरुग्राम (हरियाना) मध्ये तो ३०९ इतका नोंदवला गेला. कालच्या दिवसभरात दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत काही प्रमाणात सुधारणा झाली असून वाऱ्याचा वेगही वाढला आहे. दुसरीकडे पंजाब व शेजारच्या राज्यांत उघड्यावर तण म्हणजेच पराली जाळण्याच्या घटनांमध्येही लक्षणीय घट झाल्याचे सांगण्यात आले. दिल्लीचा एक्यूआय ४०० ते ५०० वरून आज सकाळी ९ वाजता केलेल्या मापनानुसार ३५० च्या घरात आला. हा एक्यूआय देखील श्वास घेण्यासाठी घातक मानला जातो. मात्र हवेची गुणवत्ता सतत सुधारत चालल्याने दिल्ली सरकारने विविध प्रतिबंध हटविण्याचा घेतला.
दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की, ‘सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घरून काम करण्याचा आदेश रद्द करण्यात आला असून बी.एस ६ प्रमाणित नसलेल्या डिझेल वाहनांवर बंदीही उठवण्यात आली आहे. शहरातील हवेचा दर्जा सुधारल्याने महामार्ग, रस्ते, उड्डाणपूल आदी बांधकामांवरील निर्बंध अंशतः उठवण्याची घोषणाही पर्यावरण मंत्र्यांनी केली. दिल्लीत आजपासून ट्रक्सच्या प्रवेशालाही परवानगी देण्यात आली आहे. प्राथमिक शाळाही पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
दिल्लीत कचरा जाळण्याचे प्रमाण घसरले
दिल्लीतील एक्यूआय मागील गुरुवारी ‘गंभीर’ श्रेणीमध्ये म्हणजे ४५० च्या पुढे पोचला. हवेतील धुरक्याच्या दाट थरामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ होणे यासारखे विकार उद्भवले. या प्रदूषणाची सर्वत्र चर्चा सुरू होताच राज्य प्रशासनाने प्राथमिक शाळा बंद ठेवणे, डिझेल वाहनांवर बंदी घालण्यासह विविध खबरदारीचे उपाय जाहीर केले. मात्र काल रात्रीपासून दिल्लीतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ लागले. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या ‘सफर’ या हवामान अंदाज वर्तविणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील २.५ पीएम प्रदूषकांमध्ये पराली जाळण्याचे प्रमाण शनिवारी २१ टक्के होते. ते रविवारी १८ टक्क्यांवर आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.