नवी दिल्ली : भारतातील 'गोंधळलेल्या' सरकारने कोरोनाला अटकाव घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी केलेल्या कृतींचे श्रेय घेण्यातच धन्यता मानली आहे. ज्यामुळे प्रचंड मोठं संकट उभं राहिलं आहे, असं मत नोबेल विजेते प्रख्यात अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी माडलं आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्र आणि तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या 'फ्रायडे फ्लेम' या व्हर्च्यूअल उपक्रमामध्ये काल शुक्रवारी ते बोलत होते. ते म्हणाले की, फार्मा उत्पादनाच्या क्षमतेमुळे आणि रोग प्रतिकारशक्तीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारताला पुरेसं यश मिळालं. (Amartya Sen says India government focused on taking credit for its actions rather than working to restrict corona)
कोरोनाच्या महासाथीमुळे दिवसाला चार लाख रुग्ण आणि साडेचार हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू होणाऱ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमर्त्य सेन यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे. अनेक नामवंत जाणकारांनी म्हटलंय की, कोरोनाच्या लढाईत वेळेआधीच साजरा केलेला विजयोत्सव या महासंकटाला कारणीभूत ठरला आहे. सेन यांनी म्हटलंय की, सरकारच्या गोंधळेलल्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या संकटाशी दोन हात करण्यात कमी पडल्याने भारताला आपल्या सामर्थ्यानुसार कामगिरी करता आली नाही.
हे कोरोना संकट अधिक गंभीर बनू नये यासाठीच्या प्रयत्नांवर अधिक भर देण्याऐवजी करत असलेल्या कामांचंच कशाप्रकारे श्रेय घेता येईल, यातच सरकार अधिक गुंतलेले दिसून आलं आहे. त्यामुळेच याचा परिणाम गंभीर झाला असून बोलण्यात आणि कृतीत ताळतंत्र उरलं नसल्याची स्क्रिझोफ्रेनियाची परिस्थिती उद्भवली असल्याचं त्यांनी म्हटलंय. अमर्त्य सेन यांनी ऍडम स्मिथ यांच्याद्वारे 1769 मध्ये लिहलेल्या एका लेखाचा हवाला देत म्हटलं की, जर एखादी चांगली कामगिरी केली तर त्याचे श्रेय त्याला मिळते आणि श्रेय हे कधीकधी एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कामाचे दर्शक असू शकते. पण चांगले काम करण्याऐवजी फक्त श्रेय मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हे बौद्धिक भोंगळपणाचे लक्षण आहे, जे टाळलं गेलं पाहिजे. मात्र, भारतातील सरकारने तसंच करण्याचा प्रयत्न केला, असं सेन यांनी म्हटलंय.
कदाचित भारतच जगाला वाचवेल अशी पत जगभरात निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत होते. दुसऱ्या बाजूला, कोरोनाची ही समस्या अधिकच बिकट होत होती, ज्याने देशभरातील भारतीयांच्या आयुष्याला वेठीस धरलंय. सेन म्हणाले की, भारत आधीच सामाजिक विषमतेने ग्रस्त आहे. देशातील विकासाची घट आणि बेरोजगारीची नोंद उच्च पातळीवर आहे. अशा पार्श्वभूमीवर हे कोरोनाचं संकट अधिक गंभीर बनलं आहे. अर्थव्यवस्थेतील अपयश आणि सामाजिक सामंजस्याचे अयशस्वी होणे हा देखील साथीच्या आजाराच्या अपयशाचा आधार होता. सेन यांनी आरोग्यसेवा आणि शिक्षण या सर्वांमध्ये "मोठा विधायक बदल" व्हावा असं मत मांडलंय. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे आर्थिक आणि सामाजिक धोरणांमध्ये देखील बदल झाला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.