गुंटूर - आंध्र प्रदेशमध्ये भाजपचे बळ मिळालेल्या एन. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने दणदणीत ‘कमबॅक’ केले आहे. सत्ताधाऱ्यांना पार धुळीला मिळविण्याचा शिरस्ता येथील जनतेने कायम ठेवत ‘टीडीपी’, भाजप आणि अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेना पक्ष यांच्या आघाडीला भरभरून यश दिले आहे.
राज्यातील १७५ जागांपैकी एकट्या ‘टीडीपी’ने १३२ जागा जिंकल्या असून चंद्राबाबू हे पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
लोकसभेबरोबरच आंध्रमध्ये विधानसभेसाठीही निवडणूक झाली होती. २०१४ मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगण राज्य वेगळे झाले होते. विभाजनानंतर राज्यात चंद्राबाबूंचेच सरकार सत्तेत आले होते, तर वायएसआर जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआर काँग्रेस हा पक्ष प्रमुख विरोधी होता.
२०१९ च्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने १५१ जागांसह प्रचंड बहुमत मिळवत चंद्राबाबूंना पूर्णपणे नामोहरम केले होते. चंद्राबाबूंनी त्यावेळी ‘एनडीए’चीही साथ सोडली होती. यंदा मात्र त्यांनी भाजपची साथ घेतली आणि त्याचा त्यांना फायदा झाला. बहुमतासाठी ८८ जागांची आवश्यकता असताना एकट्या ‘टीडीपी’ला १३० हून अधिक जागा मिळाल्या आहेत.
शिवाय, येथील लोकप्रिय अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचीही त्यांना साथ मिळाली. जागावाटपात ‘टीडीपी’ने १४४, जनसेना पक्षाने २१, तर भाजपने १० जागांवर निवडणूक लढविली होती. या तिन्ही पक्षांना दणदणीत यश मिळाले आहे. ओडिशात यश मिळवून भाजप सत्तेत येणार आहे, तसेच आंध्रमध्येही भाजपला सत्तेत वाटा मिळणार आहे.
नऊ जूनला शपथविधी
स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांचा नऊ जूनला मुख्यमंत्रिपदासाठी शपथविधी होण्याची शक्यता आहे. हे पद स्वीकारण्याची त्यांची ही चौथी वेळ असेल. आंध्रचे २०१४ मध्ये विभाजन झाल्यानंतर करारानुसार दहा वर्षांसाठी हैदराबाद ही तेलंगण आणि आंध्र प्रदेशची संयुक्त राजधानी होती. दोन दिवसांपूर्वीच हा करार संपला आहे. त्यामुळे तूर्त तरी हैदराबाद येथे शपथविधी होण्याची शक्यता कमी आहे.
नाराजी भोवली
वायएसआर काँग्रेसच्या सरकारविरोधात जनतेते नाराजीची लाट होती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेक विकासकामे ठप्प असणे, वैयक्तिक लाभांच्या योजनांनाच पसंती देत रस्ते बांधणी, रोजगारनिर्मिती अशा कामांकडे दुर्लक्ष यामुळे जनतेने त्यांना नाकारले. जगनमोहन रेड्डी यांनी सूडाचे राजकारण केल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चंद्राबाबू यांनाही तुरुंगात जावे लागले होते. हे जनतेला पसंत पडले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.