Yogi Adityanath sakal
देश

Yogi Adityanath : मुख्यमंत्री योगीविरोधक गट भाजपमध्ये सक्रिय;‘यूपी’च्या सर्वोच्चपदावरून हटविण्याच्या हालचाली सुरू

शरत प्रधान

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये (यूपी) लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. तेव्हापासून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात पक्षात कुजबूज सुरू झाली होती. पण आता उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी योगींविरोधात सूर आळवण्यास सुरुवात केल्याने पक्षात सर्व काही अलबेल नसल्याचे आता दिसू लागले आहे. ‘यूपी’चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात पक्षांतर्गत आवाजाला धार येऊ लागली आहे.

योगींना दिल्लीत पाठविण्याची चर्चा सुरू असली तरी त्यातून त्यांची पदावनती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या आठवड्यात राज्यातील भाजपच्या विशेष कार्यकारिणीची बैठक लखनौत झाली. त्यातील चर्चेत योगी आदित्यनाथांबद्दल भाजपमध्ये फूट पडल्याचे प्रकर्षाने दिसले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या घटकांवर विचारमंथन होणे अपेक्षित होते. मात्र चर्चेअंती ‘योगीसमर्थक’ आणि ‘योगीविरोधक’ अशी फूट पक्षात पडल्याचे चित्र होते. दिल्लीत बसलेल्या पक्षातील काही बड्या नेत्यांचा आशीर्वाद असल्याने ‘योगीविरोधी’ गट अधिक मजबूत असल्याचे दिसले. निवडणुकीतील पराभवाला योगींना जबाबदार असल्याचे जे चित्र उभारले आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात आवाज उठवणे या गटाला सोयीचे ठरले आहे.

लोकसभेसाठी भाजपचे व्यूहरचनाकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होते, हे सर्वश्रुत असले तरी पक्षातील योगीविरोधी गट सारे खापर योगींवर फोडण्याचा प्रयत्न करीत आहे. दिल्लीतील बड्या नेत्यांनी निवडलेल्या अनेक उमेदवारांबाबत मुख्यमंत्र्यांनी नोंदविलेले मत दुर्लक्षित करण्यात आले तसेच केंद्रीय प्रचार समितीच्या प्रसिद्धी साहित्य आणि फलकांवरील छायाचित्रांमध्ये योगी गायब होते. संपूर्ण निवडणूक मोदी आणि ‘मोदी की गॅरंटी’ या नावाने लढवली गेली. पण नंतर अमित शहा यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेल्या पत्रकाराने एका हिंदी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखाचा आधार घेत भाजपच्या खराब कामगिरीला योगी आदित्यनाथ यांना जबाबदार धरण्याची मोहीम नियोजनबद्धपणे सुरू करण्यात आली.

पक्षाच्या दोन आमदारांनी यासंदर्भात केलेल्या विधानांतून योगीविरोधी मोहिमेला दुजोरा मिळतो. बादलपूर मतदारसंघातील भाजपचे आमदार रमेशचंद्र मिश्रा यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. भाजपला २०२७ ची निवडणूक जिंकणे कसे अशक्य आहे, हे त्यात सांगितले आहे. त्यावेळी मोठा पराभव टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन मिश्रा यांनी पक्षनेतृत्वाला केले आहे. भाजपचे दुसरे आमदार आणि माजी मंत्री मोतीसिंह यांनी राज्य सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत योगींच्या कार्यशैलीवर जोरदार आक्षेप घेतला आहे. विशेष म्हणजे राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या एक दिवस आधीच या दोन्ही आमदारांनी योगींविरोधी मतप्रदर्शन केले. ही बैठक भाजपचे वरिष्ठ नेते व राष्ट्रीय सरचिटणीस बी.एल.संतोष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. संतोष यांची पाळेमुळे ‘आरएसएस’शी जोडलेली असून मोदी-शहांचे ते निकटवर्तीय समजले जातात. संतोष यांच्या ‘बंद दारा’आड झालेल्या बैठकीत भाजपचे योगीविरोधी नेतेही सहभागी झाले होते.

राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची आणखी एक संधी भाजप नेतृत्व योगींना देणार असल्याचेही बोलले जात आहे आणि राज्यात होणाऱ्या दहा विधानसभा मतदारसंघांतील आगामी पोटनिवडणुकीत योगींची कामगिरी कशी असेल, यावर बरेच काही अवलंबून आहे. दहापैकी नऊ मतदारसंघातील आमदार लोकसभेत निवडून गेल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. समाजवादी पक्षाचे (सप) मदार इरफान सोलंकी यांना फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्याने ते अपात्र ठरले आहेत. त्यामुळे त्यांची जागा रिक्त झाली आहे.

पोटनिवडणूक हे तकलादू कारण

निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर केल्या नसल्या तरी या जागांवरच योगी आदित्यनाथांचे भवितव्य अवलंबून आहे, असे मानले जात आहे. या पोटनिवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असून निकालानंतर त्यांच्याबद्दल निर्णय होईल, असे भाजपमधील सूत्रांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात राज्यातील ४०३ विधानसभा मतदारसंघांपैकी २७३ जागा सत्ताधारी भाजपकडे असताना केवळ दहा जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांमुळे राज्यातील राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता अजिबात नाही. पण योगींविरोधात कारस्थान सुरू झाल्याने या पोटनिवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा आधार ‘यूपी’च्या या मुख्यमंत्र्यांचे भवितव्य ठरवण्यासाठी घेतला जाऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT