नवी दिल्ली : दिवाळीच्या काळात दिल्लीत वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘आप’ सरकारने ‘मिल कर चले, प्रदूषण से लडे’ मोहीम राबविण्याची घोषणा केली आहे. यात १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दिल्लीत कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी दिल्ली सरकारने चालविली आहे. यासोबतच फटाके विक्रीवर बंदी घालण्यात येणार असून गरजेनुसार सम-विषम योजना लागू केली जाणार आहे.
पंजाबमध्ये काडीकचरा (पिकांचे अवशेष) जाळण्यामुळे प्रदूषण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या उपद्रवावर मात करण्यासाठीच्या संभाव्य उपाययोजनांची माहिती ‘आप’ सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी दिली. ते म्हणाले, की यंदा १ ते १५ नोव्हेंबरच्या काळात प्रदूषण वाढण्याची शक्यता पाहता कृत्रिम पावसासाठी प्रयत्न सुरू असून यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे.
प्रदूषण नियंत्रणासाठी २१ कलमी हिवाळी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारतर्फे होणाऱ्या उपाययोजनांबद्दल ते म्हणाले, की दिल्लीत हॉट स्पॉट्सवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येईल. याखेरीज सहा सदस्यीय एसटीएफची स्थापना करण्यात आली आहे. ५०० मीटर पेक्षा अधिक क्षेत्रातील सर्व बांधकामांची नोंदणी सरकारी पोर्टलवर करणे बंधनकारक असेल. प्रदूषण नियंत्रणांचे निकष पूर्ण न करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
यासोबतच प्रदूषण नियंत्रणासाठी काम करणाऱ्या संस्था, बांधकाम संस्था, कंपनी, सरकारी कर्मचारी यांना 'हरितरत्न पुरस्कार' देऊन गौरविण्यात येईल. रस्ते झाडण्यासाठी ८५ स्वयंचलित यंत्रे (स्विपिंग मशिन्स) बसविण्यात येत आहेत. तसेच धुळीचा आणि धुरक्याचा त्रास रोखण्यासाठी रस्त्यांवर पाणी शिंपडणारी ५०० यंत्रे त्याचप्रमाणे २०० मोबाईल अँटी स्मॉग गन यासारख्या यंत्रांचा वापर करण्यात येईल.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता खालावली आणि गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ४५० पेक्षा जास्त झाल्यास दिल्लीत सम-विषम योजना लागू केली जाऊ शकते, असेही गोपाल राय यांनी स्पष्ट केले. यामध्ये वाहनाच्या क्रमांकाचा शेवटचा आकडा सम अथवा विषम असेल त्यानुसार संबंधित वाहन सम-विषम योजनेच्या अंमलबजावणीच्या कालावधीत रस्त्यावर आणण्याची परवानगी मिळेल. याआधी डिसेंबर २०१५ तसेच जानेवारी २०१६ मध्ये आणि त्यानंतर २०१९ मध्ये देखील सम-विषम योजना लागू करण्यात आली होती. याव्यतिरिक्त या वर्षीही दिल्लीत फटाक्यांवर बंदी कायम राहील. सध्या फटाक्यांवर बंदी नाही. अधिसूचना जारी केल्याच्या दिवसापासून बंदी लागू होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.