हैदराबाद- हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. भाजपचे दिग्गज नेते प्रचारासाठी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते प्रचारात उतरले आहेत. यावरुन भाजप या निवडणुकीला किती महत्त्व देत आहे, हे स्पष्ट होते. हैदराबादचे खासदार तथा एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. ही महापालिकेची निवडणूक नाही तर पंतप्रधानपदाची निवडणूक वाटत आहे. प्रचारासाठी आता केवळ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हैदराबादमध्ये यायचे शिल्लक आहेत, असा टोला त्यांनी लगावला आहे.
ओवेसी हे हैदराबाद येथील लंगर हाऊस येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, भाजपने ज्या नेत्यांना प्रचारासाठी उतरवले आहे, ते पाहता ही हैदराबाद महापालिकेची निवडणूक वाटत नाही. असं वाटत आहे की, आम्ही नरेंद्र मोदी यांच्याऐवजी दुसरा पंतप्रधान निवडत आहोत.
मी एक रॅली करत होतो. तेव्हा मी म्हटलं की, त्यांनी (भाजप) सर्वांना येथे बोलावले आहे. यावर एका मुलाने म्हटले की, त्यांनी आता ट्रम्प यांना बोलावले पाहिजे, तो मुलगा योग्य होता. आता फक्त ट्रम्प हेच यायचे राहिले आहेत.
हैदराबाद महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही आले होते. गृहमंत्री अमित शहा हेही रविवारी हैदराबादमध्ये दाखल झाले. त्यांनी भाग्यलक्ष्मी देवीच दर्शन घेऊन रॅली काढली. येत्या 1 डिसेंबरला हैदराबाद पालिकेसाठी निवडणूक होणार आहे.
दरम्यान, गत गुरुवारी ओवेसींनी पंतप्रधान मोदी यांना प्रचारासाठी हैदराबादमध्ये येण्याचे आव्हान दिले होते. पंतप्रधान मोदी आल्यानंतर भाजप किती जागा जिंकेल हे पाहायचे आहे, असे त्यांनी म्हटले होते.
तत्पूर्वी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करु असे आश्वासन दिले होते. त्यांच्या या वक्तव्याचा ओवेसींनी समाचार घेतला होता. तुमचं नाव बदलेल पण हैदराबादच नाव बदलणार नाही, अशा शब्दांत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर पलटवार केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.