Atal Tunnel: राजधानी दिल्लीत यंदा उन्हाळ्याचा कहर झाला. तापमान 50 अंश सेल्शियसपर्यंत गेले. काही ठिकाणी ते 55 अंश सेल्सियसपर्यंत वाढले. सारा उत्तर भारत धगधगून निघत असता, दिल्लीकरच नव्हे, तर देशातील अनेक शहरातील तापमानवाढीमुळे लाहीलाही झालेल्यांनी श्रीनगर, मसूरी, सिमला, मनाली, नैनिताल आदी उत्तर भारतातील `क्वीन्स ऑफ हिल्स’ ना भेटी देण्याचा सपाटा लावलाय.
ज्यांना जमले नाही, ते महाबळेश्वर, माथेरान, पाचगणी, तर काही पर्यटकांनी दक्षिणेतील उटी, मुन्नार, वायनाड, कोडईकनाल, इडुक्की, सावनदुर्ग, कुन्नूर, कुद्रेमुख कडे धाव घेतली. गेल्या आठवड्यात आम्ही कुल्लू, मनालीला भेट दिली. यापूर्वी या भागात मी तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी गेलो असेन. त्या वेळचा कुल्लू, मनाली व आजची ही हिल स्टेशन्स यात जमीन अस्मानचा फरक आहे.
त्यावेळी डोंगर दऱ्यातून प्रवास करताना बस अथवा गाडीची चाकं रस्त्यांच्या क़डेला लागली, की खालच्या दऱ्यांकडे पाहून अऩेकांच्या अंगावर शहारे उभे राहात. खोल निमुळत्या दरीत धावणारी व्यास नदी मंडीपासून ते थेट मनालीपर्यंत साथ देते. रस्ते अत्यंत निमुळते होते. अपघातांची अधिक शक्यता होती. परंतु, आता दिल्लीपासून ते थेट चंदिगढ ते कुल्लू मनालीपर्यंत दुतर्फा ये जा करणाऱ्या महामार्गांचे जाळे पसरल्यामुळे व दुर्गम डोंगरातून पोखरलेल्या अत्याधुनिक बोगद्यांमुळे प्रवास केवळ आल्हादयक झालेला नाही, तर सभोवतालच्या हिरव्यागार डोंगरांनी तो सुसह्य व अधिक आकर्षक केला आहे.
पण, जसजसे आपण चंदिगढ, झिरकपूर, रूपनगर, पंचकुला, मंडी, पांडो, कुल्लू व अखेर मनालीच्या नजिक जातो, तसे वाहने व माणसांची एकच गर्दी लागते. वाहनांचा वेग मंदवतो व मनालीपासून दहा पंधरा कि.मी. असताना किमान दोन तास गोगलगाईच्या गतीने पुढे सरकणाऱ्या वाहतुकीकडे पाहात शांतपणे बसून राहण्याची तयारी ठेवावी लागते. दिल्ली ते मनालीपर्यंत तब्बल 14 बोगद्यांतून तुम्ही प्रवास करता.
तसेच, या मार्गावर कमी जास्त लांबीचे 37 पूल आहेत. कीरतपूर ते मनाली पर्यंत 10 बोगदे असून, काही ठिकाणी ते एकेरी तर काही ठिकाणी दुहेरी प्रवासासाठी सज्ज केले आहेत. त्यातून जाताना प्रगत देशातील बोगद्यांची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
त्यातील लख्ख प्रकाश, जागोजागी छताला लागलेले प्रचंड पंखे, थोड्याथोड्या अंतरावर दूरध्वनींची असलेली सोय व अपघात झाल्यास वाहतूक पुनश्च सुरळीत करता येईल, अशी रचना प्रत्येक पर्यटकाला आकर्षून घेते. दुतर्फा बोगदे खणण्याचे काम अजूनही चालू आहे. बोगदे बांधणे हे काम अतिशय कठीण आहे, याचे कारण हे शिवालीक पर्वतराजीतील डोंगर कच्चे असून, त्यांना `स्ट्रॅटीफाईड मौंटन्स’ असे म्हणतात.
बोगदे बांधताना त्यातील बराचसा भाग खाली कोसळण्याची शक्यता असते. त्या परिस्थितीत भारतीय तंत्रज्ञांनी किमया केली, ती म्हणजे पंजाबमधील भाक्रानांगल हे धरण बारमाही भरलेले राहावे, यासाठी हिमायलायातून वाहणाऱ्या ब्यास व सतलज या दोन नद्यांना सुमारे 24 कि.मी. लांबीच्या दोन बोगद्यातून पांडो येथे एकत्र आणण्यात आले.
तेथे बांधलेल्या धऱणातून वीज निर्मिती होते. सुंदरनगर येथे प्रचंड जलाशय बांधण्यात आले. भाक्रानांगलचा गोविंदसागर या मानवनिर्मित जलाशयात सोडून त्यातील पाणी भाक्रानांगल धरणाला पुरविण्यात आले. त्यामुळे पंजाबमध्ये शिरताच खळखऴणाऱ्या कालव्यांचे जाळे, त्यातील पाणीपुरवठ्यामुळे दिसणारी हिरवीगार शेते व आलेली समृद्धी यांचे दर्शन होते.
मनालीच्या पर्वतराजीत उंच टेकड्या व पर्वतराजींच्या शिखरावरून खाली येणाऱ्या बर्फाच्छादित हिमनद्या, सभोवतालचे सूचिपर्णी वृक्षांचे दाट जंगल यांचे मनोरम दर्शन होते. पण, मनाली शहरात वाहतुकीची व माणसांची इतकी गर्दी आहे, की भेटीचा मजा किरकिरा होतो. कुल्लू ते मनाली या मार्गावर बलूनिंग, रॅफ्टिंग, हॅंग ग्लायडिंग, हायकिंग अशा अनेक खेळांची शेकडो केंद्रे आहेत.
त्यांनी प्रत्येक तरूणांला आकर्षित केले नाही, तरच नवल. ते मनाली या मार्गावर पोटपूजा करण्यासाठी व गरम गरम परोठे खिलविणारे असंख्य ढाबे व मोठमोठी हॉटेल्स आहेत. सारांश, प्रवास करताना कंटाळा येत नाही.
मनालीला राहण्याएवजी पर्यटकाने कुल्लू जवळील कैस व्हिला येथील सुमारे पंधरा कि.मी. अंतरावरील एअर बिएनबी च्या घरात राहिल्यास रम्य परिसराचा आनंद घेता येतो. नजिकच्या नागर येथे प्रसिद्द रशियन चित्रकार निकोलस रोएरिच याच्या वॉटरकलरच्या पेंटींग्जची गॅलरी पाहाण्याचा आगळा वेगळा आनंद घेता येतो.
मनालीचे खरे आकर्षण आहे, ते तब्बल दहा हजार फूट उंचीवर बांधलेला साडे नऊ कि.मी लांबीचा अत्याधुनिक बोगदा. त्यातून प्रवास करणे, हा एक कधीही विस्मृतीत न जाणारा अनुभव आहे. त्याबाबत विकिपिडियावर असलेल्या माहितीनुसार, मोराव्हियातून आलेल्या एका पथकाने लाहुल स्पिती ला पोहोचण्यासाठी रोहतांग पास ( खिंड) खोदून बोगदा बांधण्याची कल्पना मांडली होती.
1942 मध्ये जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे उच्चाधिकारी डॉ जॉन बिकनेल ऑडेन यांनी चंद्रा नदीला वळविण्यासाठी प्रथम रोहतांग पास ला भेट दिली होती. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांचे बालमित्र अर्जुन गोपाल यांनी त्यांना रोहतांग पास ला भेट देण्याची विनंती केली.
2000 मध्ये वाजपेयी लाहुल ला भेट दिली व रोहतांग बोगदा बांधण्याबाबत घोषणा केली. तथापि, प्रत्यक्षात बोगदा बांधण्याचे काम बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनने (बीआरओ) मे 2010 मध्ये सुरू केले. कोनशीला समारंभ 28 जून 2010 रोजी राष्ट्रीय सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हस्ते झाला व नंतर तब्बल दहा वर्षांनी 4 ऑक्टोबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले.
9.2 कि.मी चा या बोगद्याचा आकार हॉर्स शू (नाल) सारखा असून, तो समुद्रसपाटीपासून 10,170 फूट उंचीवर आहे. त्याचे `वर्ल्ड्स लाँगेस्ट हायवे टनेल (महामार्गावर बांधलेला जगातील सर्वात लांबीचा बोगदा)’ असे वर्णन केले जाते. त्यावर 3 हजार 300 कोटी रू. खर्च आला. मनालीहून 46 कि.मी. अंतरावरील लाहुल स्पितीला जाण्यास आधी चार ते पाच तास लागत.
त्याला आता केवळ पंधरा मिनिटे लागतात. मनाली ते लेह हे अंतर 11 तासात पार करता येते. तथापि, त्यासाठी बर्फाच्छादित डोंगर, हिमनद्या ओलांडाव्या लागतात. प्राणवायूची कमतरता असल्याने प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.