अयोध्या : सर्व देशवासीयांचे लक्ष लागलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चार दिवस उरले आहेत. श्रीरामाच्या जन्मस्थानी त्याचे मंदिर उभारण्याचे रामभक्तांचे स्वप्न प्रत्यक्षात आले असल्याने अयोध्यानगरीत आनंदी वातावरण आहे. मुख्य सोहळ्यापूर्वी विविध विधींना सुरुवात झाली असून हजारो भाविकांची पावले अयोध्येकडे वळली आहेत.
चार दशकांपासून पाहिलेले मंदिर उभारणीची स्वप्नपूर्ती झाली असून रामलल्लाची प्राणप्रतिष्ठाही होणार असल्याने या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी येथे रामभक्तांची मांदियाळी आहे. मंदिरांची रेलचेल असलेल्या अयोध्या नगरीचे रूपांतर आधुनिक शहरात होत आहे. आर्थिक उलाढालीसह अनेक लहान-मोठ्या व्यवसायांनी येथे बस्तान ठोकले आहे. यामुळे अयोध्येत पूर्वी कधी नव्हती एवढी गजबलेली आहे.
प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांचे आगमन अयोध्यानगरीत होत आहे. अयोध्येत चार-ते पाच अंश सेल्सिअस तापमान असूनही स्नानासाठी शरयू नदीच्या किनारी भाविकांची गर्दी होत आहे. पश्चिम बंगाल किंवा बिहारसारख्या उत्तरेतील राज्यांतील दुर्गम भागातून काही लोक सायकलवर अयोध्येत पोहचले आहे.
मुख्य समारंभ सोमवारी (ता.२२) होणार असून त्यानंतर गुरुवारपासून (ता.२७) भाविकांना दर्शन खुले होणार आहे. त्यासाठी प्रतीक्षा करीत भाविकांनी तंबूत मुक्काम ठोकला आहे. सध्या नवीन मंदिराजवळील तात्पुरत्या स्वरूपातील बांधकामापर्यंतच प्रवेश देण्यात येत असला तरी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून लांबच लांब रांगा दिसतात.
सोलापूरमधील दुकानदार सुरेश कर्वे (वय ५७) हे त्यांच्या दोन मित्रांबरोबर अयोध्येत आले असून २२ तारखेपर्यंत त्यांचा मुक्काम आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची निमंत्रण पत्रिका मिळाली आहे का?, असे विचारल्यावर ते म्हणाले, की निमंत्रण केवळ अति महत्त्वाच्या व्यक्ती आणि सेलिब्रिटींसाठी असल्याने मला मिळालेले नाही. पण निमंत्रणापेक्षा राम मंदिराचे उद्घाटन होत असताना मी या भूमीवर असल्याचे समाधान मला आहे. या ऐतिहासिक दिवशी अयोध्येत होतो, हे मी घरी परतल्यावर अभिमानाने सगळ्यांना सांगू शकेन.
मी कोलकत्याहून सायकल चालवीत १३ दिवसांनंतर अयोध्येत पोहोचलो आहे. येथील एका धर्मशाळेत राहत आहे. माझ्या देवाचे त्याच्या नवीन घरात विधिवत दर्शन घेण्याची संधी मिळेपर्यंत मी वाट पाहणार आहे.
- सौरभ मंडल, भाविक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.