नवी दिल्ली - मुंबई - अयोध्येत येत्या सोमवारी (ता. २२) होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग सुरू असताना सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सुरूवातीला बहुतांश विरोधी नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली होती पण आता अनेकांनी या प्राणप्रतिष्ठेनंतर आम्ही अयोध्येला जाऊ, असे म्हटले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ‘यूपी’चे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी प्राणप्रतिष्ठेनंतर आम्ही अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी येऊ, असे म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते पण याबद्दल त्यांनी मंदिर ट्रस्टचे आभार मानताना सोहळ्यास उपस्थित राहायला नकार दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राममंदिर ट्रस्टने आधीच बहुतांश विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रणे दिली आहेत. यापैकी बहुतांश नेत्यांनी अयोध्येला त्या दिवशी न जाता नंतर सोयीने जाऊ, असे स्पष्ट केले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी प्रथमच आपण या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले होते.
काँग्रेसनेही हा कार्यक्रम भाजप व रा. स्व. संघाचा असल्याची टीका करीत निमंत्रण नाकारले होते. ‘तृणमूल’च्या नेत्या व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या सोहळ्याला जाण्यास नकार दिला होता. आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही २२ जानेवारीला अयोध्येला जाणार नसल्याचे स्पष्ट करत आपण नंतर रामाचे दर्शन घेऊ असे म्हटले आहे.
लालूंची सोहळ्याकडे पाठ
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी मात्र आपण अयोध्येला जाणार नसल्याचे म्हटले आहे. लालूंच्या विधानावर भाजपने टीका केली असून त्यांना निमंत्रण कोणी दिले आहे? असा सवाल खोचक सवाल करण्यात आला. सध्या इलेक्शन मोडमध्ये असलेल्या लालूंनी इंडियातील जागावाटपासाठी पुढाकार घेतला असून या प्रक्रियेला विलंब होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच अयोध्येला जाण्याची काही आवश्यकता नाही. तसेही या सोहळ्यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव केवळ एकाच व्यक्तीला परवानगी देण्यात आली आहे. मला आधी सांगण्यात आले की एक टीम तुम्हाला या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी येईल पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही.
- अरविंद केजरीवाल, दिल्लीचे मुख्यमंत्री
पवारांनी निमंत्रण स्वीकारले पण...
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारल्याचे सांगत २२ जानेवारी नंतर रामलल्लाचे दर्शन घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसे पत्रही त्यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांना पाठविले आहे. या निमंत्रणाबद्दल पवार यांनी राय यांना धन्यवाद दिले आहेत.
पत्रात पवार यांनी म्हटले आहे, ‘मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे भारताचेच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी भाविक व श्रद्धाळूंच्या आस्थेचे प्रतीक आहेत. अयोध्येत होणाऱ्या या सोहळ्याबाबत राम भक्तांमध्ये मोठी उत्सुकता आहे. हा सोहळा २२ जानेवारी रोजी झाल्यानंतर अयोध्येस येऊन रामलल्लाचे दर्शन घेईन. तोपर्यंत अयोध्येतील राम मंदिराचे काम ही पूर्ण झाले असेल.’
२२ तारखेला कोण? कोठे?
ममता कालीघाट मंदिरात
राहुल आसाममध्ये मंदिरात जाण्याची शक्यता
उद्धव ठाकरे नाशिकमध्ये महाआरती करणार
नवीन पटनाईक पुरीच्या जगन्नाथ मंदिरात जाणार
नितीशकुमारांच्या उपस्थितीबाबत अनिश्चितता
निमंत्रण मिळाल्यास नक्की जाऊ - फारुख अब्दुल्ला
मायावतींची शक्यता कमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.