Ayodhya Ram Mandir sakal
देश

Ayodhya Ram Mandir : श्रीरामाचा जयघोष, शंखध्वनी, ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका अन बंदोबस्तही

एकीकडे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे अयोध्येतील चौका-चौकात आणि गल्ल्यांमध्ये राम नामाचा एकच गजर सुरु होता.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

अयोध्या - एकीकडे राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम सुरू असताना दुसरीकडे अयोध्येतील चौका-चौकात आणि गल्ल्यांमध्ये राम नामाचा एकच गजर सुरु होता. गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका आहे. मात्र भाविकांचा अयोध्येकडे येण्याचा ओघ सुरूच आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळपासून भाविकांसाठी मंदिराचा प्रवेश खुला करण्यात येणार आहे.

प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अयोध्येला सुरक्षेचा वेढा टाकण्यात आला होता. मुख्य राम पथावर भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सर्वत्र रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर घरे, इमारती आणि मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. कडेकोट बंदोबस्त असूनही भाविक राम मंदिर, शरयू घाट, रामघाट, राम गढी आणि हनुमान गढीकडे जाण्यासाठी आतूर झाले होते.

मुख्य कार्यक्रम पार पडल्यानंतर व्हीआयपी रवाना झाले. त्यानंतर सायंकाळी काही रस्ते मोकळे करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी किमान आपण अयोध्येत असावे, या हेतूने देशाच्या काना-कोपऱ्यातून भाविक अयोध्येत आले होते. यात महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान या राज्यातील भाविकांची संख्या लक्षणीय होती. कडक सुरक्षा व्यवस्थेत २० पेक्षा जास्त मिरवणुका काढण्यात आल्या.

दरम्यान मंगळवार सायंकाळपासून भाविकांना राम मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी देशभरातून आलेल्या साधू-संतांची राहण्याची सोय तीर्थराजपुरम येथे तर कार्यकर्त्यांची सोय कारसेवकपुरम येथे करण्यात आली होती.

पहाटे सहा वाजल्यापासून साधू-संतांना राम मंदिर स्थळी नेण्यासाठी सरकारने बस सोय केली होती. दोनशेवर इलेक्ट्रिकल बस तैनात करण्यात आल्या होत्या. साधू-संत मंदिरस्थळी जात असताना जय श्रीराम आणि जय सियारामचा जयघोष सुरु होता.

निमंत्रितांना भेटवस्तू

सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या मान्यवरांना श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीकडून भेटवस्तू देण्यात आल्या. यात अयोध्येची माहिती सांगणारे पुस्तक, तांब्याचा दिवा, तुळशीची माळ आणि रामाचे नाव असलेले वस्त्र देण्यात आले आहे. ‘अयोध्या धाम- प्रभू रामाचे निवासस्थान’ असे या पुस्तकाचे नाव आहे. निमंत्रितांना एका बॉक्समध्ये चार लाडू, रेवडी, काजू आणि मनुके प्रसाद म्हणून देण्यात आले आहेत. या सर्व वस्तू एका सुंदर पिशवीमध्ये घालून देण्यात आल्या.

मथुरेत जल्लोष

मथुरा - रामलल्लाच्या स्वागतासाठी कृष्णजन्मभूमीही सजली होती. मथुरेत ठिकठिकाणी सुंदरकांडाचे पठण केले जात होते. एके ठिकाणी रामाचे वाळूशिल्प तयार करण्यात आले होते. या शहरातील जवळपास ७०० मंदिरांना सजावट करण्यात आली आहे. मथुरेत अनेक ठिकाणी अन्नदान सुरू होते. येथील राधा-कृष्ण मंदिरातील मूर्तींना राम-सीतेचे रूप देण्यात आले होते. बांकेबिहारी मंदिरात श्रीकृष्णाच्या हातात बासरीबरोबरच धनुष्यबाणही देण्यात आला होता.

नाव ठेवले ‘रामरहिम’

फिरोजाबाद - अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा सुरू असतानाच फिरोजाबाद येथे एका मुस्लिम महिलेने मुलाला जन्म दिला. हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण घालून देत या महिलेच्या आईने त्यांच्या नातवाचे नाव ‘राम-रहिम’ असे ठेवले आहे.

त्रिनिदाद-टोबॅगो येथेही जल्लोष

पोर्ट ऑफ स्पेन - प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबाबत जगभरात उत्साह पाहावयास मिळाला. त्रिनिदाद ॲड टोबॅको येथे राम जन्मभूमी स्थापना समितीने ओव्हरसिज फ्रेंड ऑफ राम मंदिरासमवेत आनंद साजरा केला. अमेरिकेतील न्यूजर्सी येथे भारतीयांनी श्री सिद्धीविनायक मंदिरात पूजा केली. दुसरीकडे मेक्सिको येथेही राम मंदिर स्थापन झालेले आहे. मेक्सिकोतील कीरेतारे शहरात नवीन मंदिर उभारण्यात आले आहे. कॅरेबियन देश त्रिनिदाद ॲड टोबॅको येथे रविवारीच्या धार्मिक कार्यक्रमांत पाच हजार जण सहभागी झाले.

प्रमुख उपस्थिती

  • माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, प्रतिभा पाटील, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, माजी अध्यक्ष मीरा कुमार, सुमित्रा कुमार.

  • उद्योगपती मुकेश अंबानी, नीता अंबानी, लक्ष्मीनिवास मित्तल, नुसली वाडिया, गौतम अदानी, अजय पिरामल, अनिल अग्रवाल, रेखा झुनझुनवाला, आदि गोदरेज, ‘एल अँड टी’चे अध्यक्ष एएम.नाईक, सुधा मूर्ती, सुनील मित्तल.

  • क्रीडा विश्‍वातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रवींद्र जडेजा, पी.टी. उषा, सुनील गावस्कर, साईना नेहवाल, शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन, के. सिवन, मेट्रोमॅन ई. श्रीधरन, शिक्षणतज्ज्ञ टी.व्ही. मोहनदास.

  • कला क्षेत्रातील अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, हेमामालिनी, आशा भोसले, उषा मंगेशकर, अरुण गोविल, कंगना रानावत, प्रसून जोशी, शंकर महादेवन, सुभाष घई, अनुराधा पौडवाल, मनोज जोशी.

  • निवृत्त लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे,राम मंदिराचे वास्तूकार चंद्रकांतभाई सोमपुरा, एस. पद्मनाभन, सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, माजी सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे, उदय लळित, महेश जेठमलानी, तुषार मेहता, अरुप पुरी, रामलल्लाचे वकिल रविशंकर प्रसाद.

  • श्री श्री रविशंकर, रामदेवबाबा, स्वामी रामभद्राचार्य यांच्यासह देशातील दीडशेपेक्षा अधिक विविध संप्रदायांचे प्रमुख संत आणि महंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT