अयोध्या - वेळ .. दुपारी १२ वाजून २९ मिनिटे अन् आठ सेकंद.. नक्षत्र मृगशीर्ष.. अभिजित मुहूर्तावर रामलल्लाची पावले मंदिरी उमटली अन् अवघा देश कृतकृत्य झाला. तब्बल साडेपाचशे वर्षांचा प्रभू श्रीरामांचा वनवास आज अखेर संपला. पुरोहितांच्या वेदघोषात अन् मंगलध्वनीच्या निनादात रामलल्ला मंदिरात विराजमान झाले. ‘गल्ली ते दिल्ली’ अन् ‘दिल्ली ते टाइम्स स्क्वेअर’ कणाकणांत आणि प्रत्येक क्षणांत राम व्यापला.
या ऐतिहासिक सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात देवापासून देशापर्यंत अन् रामापासून राष्ट्रापर्यंतच्या वाटचालीची उद्घोषणा करताना भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प बोलून दाखविला. सायंकाळी अयोध्येसह देशभरात फटाके फोडून दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी रामाची माफी मागताना पंतप्रधानांनी आमचा पुरुषार्थ, त्याग, तपश्चर्येत काहीतरी कमतरता राहिली असावी म्हणून इतक्या शतकांपासून आम्ही हे कार्य करू शकलो नाही, अशी खंत बोलून दाखविली. ‘येणारा काळ हा यशाचा अन् सिद्धीचा आहे. हे राम मंदिर भारताचा उत्कर्ष अन् उदयाचे साक्षीदार बनेल. हेतू शुद्ध असेल तर कार्यात यश मिळते हेच या मंदिरातून दिसून येते. अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर आम्ही येथे पोचलो असून आता आम्ही थांबणार नाही,’ असे मोदी यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मागील अकरा दिवसांपासून मी विविध व्रते आणि अनुष्ठान करत होतो. ज्या स्थळांना प्रभू श्रीरामचंद्रांचे पाय लागले त्यांना भेट देण्याचा मी प्रयत्न केला. या काळात मला सागरापासून शरयूपर्यंतचा प्रवास करण्याची संधी मिळाली. रामप्रभू हे भारताच्या आत्म्याच्या कणाकणाशी जोडल्या गेले आहेत. देशवासीयांच्या अंतर्मनामध्ये राम विराजमान आहेत. भारतामध्ये आम्ही कोणाच्याही अंतरात्म्याला स्पर्श केला तरी आम्हाला एकत्वाची अनुभूती येईल. हा भाव सगळीकडे दिसतो.’
तरुणांना संदेश
पंतप्रधानांनी तरुण पिढीला मजबूत वारशाचा आधार घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाण्यास सांगितले. ‘परंपरेची शुद्धता आणि आधुनिकतेची अनंतता या दोन्ही मार्गांचा अवलंब करून भारत समृद्धीच्या ध्येयापर्यंत पोहोचेल,’ अशी खात्री पंतप्रधानांनी दिली. पंतप्रधान म्हणाले ‘भविष्य हे यश आणि कर्तृत्वासाठी समर्पित आहे आणि हे भव्य राम मंदिर भारताच्या प्रगती आणि उदयाचे साक्षीदार असेल. हे भव्य राम मंदिर विकसित भारताच्या उदयाचे साक्षीदार ठरेल.
आताचा काळ हा भारताचा आहे आणि भारत प्रगती साधत पुढे जाणार आहे. शतकानुशतके वाट पाहिल्यानंतर आपण इथे पोहोचलो आहोत. आपण सर्वांनी या युगाची, या कालावधीची वाट पाहिली आहे. आता आपण थांबणार नाही. आपण अशीच विकासाची नवनवीन शिखरे गाठत राहू.’
ऊर्जेची निर्मिती
विरोधी पक्षांचा नामोल्लेख न करताच मोदी म्हणाले, ‘एक काळ असाही होता जेव्हा राम मंदिर तयार झाले तर देशात आग भडकेल असे काही लोक म्हणत होते. ही मंडळी भारताच्या सामाजिक भावनेचे पावित्र्य समजू शकली नाहीत. रामलल्लाच्या मंदिराची उभारणी ही भारतीय समाजातील शांती, धैर्य, सद्भाव आणि समन्वयाचे प्रतीक आहे. ही निर्मिती कोणतीही आग नाही तर ऊर्जेला जन्म देताना दिसून येते.’ यावेळी मोदींनी भारतीय न्यायपालिकेचे देखील आभार मानले.
राम हाच भारताचा आधार
‘आमचे रामलल्ला हे आता तंबूमध्ये राहणार नाहीत. त्यांचा दिव्य मंदिरामध्ये निवास असेल. रामाच्या आगमनाची अनुभूती देशातील आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी रामभक्त घेत आहेत. सगळा देश दिवाळी साजरी करतो आहे. हे केवळ देव मंदिर नाही तर भारत दर्शन मंदिर आहे. हे राष्ट्रचेतनेचे मंदिर असून राम भारतासाठी आस्थेचा विषय आहे. राम भारताचा आधार, राम भारताचा विचार आहे. राम हाच भारताचे विधान असून तीच राष्ट्र चेतना देखील आहे,’ असे मोदी म्हणाले.
त्यांचे आम्ही ऋणी
‘राम हे सर्वांचेच देव आहेत. राम म्हणजेच ऊर्जा आहे. राम विवाद नाही तर समाधान आहे. राम केवळ आमचेच नाही तर ते सर्वांचे आहेत. ज्यांच्यामुळे हा क्षण आज आपल्याला पाहायला मिळाला त्यांचे देखील सर्व देश स्मरण करतो आहे. ते अगणित कारसेवक, रामभक्त आणि संत महात्म्यांचा हा देश ऋणी आहे,’ असेही मोदींनी सांगितले.
प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा
‘आज देशात निराशेला थारा नाही,’ याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. खारीच्या कथेवर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, ‘स्वतःला लहान आणि सामान्य समजणाऱ्यांनी खारीचा वाटा लक्षात ठेवावा आणि नकारात्मक मानसिकतेतून मुक्त व्हावे. लहान असो वा मोठा प्रत्येक प्रयत्नाची ताकद आणि योगदान असते.’ ‘सबका प्रयासची भावना मजबूत, सक्षम, भव्य आणि दिव्य भारताचा पाया बनेल. हा देवापासून देशाच्या चेतनेचा आणि रामापासून राष्ट्राच्या चेतनेचा विस्तार आहे,’ असे पंतप्रधानांनी नमूद केले.
ज्या ऐतिहासिक क्षणाची आपण पाचशे वर्षांपासून वाट पाहात होतो, तो साकार झाला आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच ‘रामराज्या’ची उद्घोषणा झाली आहे. त्यामुळे यापुढे अयोध्येत गोळीबाराचे आवाज ऐकून येणार नाही की संचारबंदीही लागू होणार नाही. रस्तोरस्ती आता राम संकीर्तन चालेल.
- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तरप्रदेश
मी मोदींना खूप वर्षांपासून ओळखतो, ते तपस्वी आहेत. परंतु केवळ मोदी यांनी एकट्यानेच तप का करावे? देशात रामराज्य आणण्यासाठी सगळ्यांनीच देशसेवेचे तप करावे. आपापसांतील मतभेद दूर करणे आवश्यक आहे.
- मोहन भागवत, सरसंघचालक
मोदी म्हणाले
अनेक शतकांचा संयम, बलिदान, त्याग आणि तपश्चर्येनंतर राम आले
२२ जानेवारी ही तारीख नाही तर ती नव्या ‘कालचक्र’चा उगम
न्यायाची प्रतिष्ठा जपल्याबद्दल न्यायव्यवस्थेचे आभार
श्रीरामांची पावले जिथे पडली त्या ठिकाणी मी नतमस्तक झालो
समुद्रापासून ते शरयू नदीपर्यंत सर्वत्र चैतन्यदायी भावना
रामकथा असीम आहे आणि रामायणही अनंत आहे.
हे श्रीरामाच्या रूपात राष्ट्रीय चेतनेचे मंदिर, प्रभू श्रीराम हा भारताचा विश्वास
भारताचा पुढील एक हजार वर्षांसाठी पाया रचायचा आहे
देव ते देश, राम ते राष्ट्रापर्यंत आपली जाणीव वाढवावी
हे भव्य मंदिर विशाल भारताच्या उदयाचे साक्षीदार बनेल
दिवसभरात
प्राणप्रतिष्ठेसाठी चांदीचे छत्र घेऊन मोदी मंदिरात
अभिजित मुहूर्त अन् मृगशीर्ष नक्षत्रावर प्राणप्रतिष्ठा
मंगलवाद्यांच्या ध्वनीने मंदिर परिसर निनादला
गणेश्वरशास्त्री द्रविड, लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली प्राणप्रतिष्ठा विधी
पंतप्रधान मोदींनी अकरा दिवसांचा उपवास सोडला
मंदिर उभारणाऱ्या कारागिरांवर मोदींकडून पुष्पवृष्टी
भाषणाची वैशिष्ट्ये
३५ मिनिटे - भाषण कालावधी
११४ वेळा - रामाचा उल्लेख
राम-रामपासून आरंभ - जय सियारामवर शेवट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.