Ayodhya Ram Mandir Darshan New Timing : अयोध्येतील श्रीराम मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. 22 जानेवारीला ऐतिहासिक सोहळ्यात या मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. यानंतर आजपासून या मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलण्यात आली आहे. आजपासून सकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं असणार आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर जेव्हा मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं, तेव्हा सकाळी 7 ते 11.30 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येत होतं. त्यानंतर सायंकाळी काही वेळच हे मंदिर भाविकांना पुन्हा खुलं करण्यात येत होतं. मात्र, रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी पाहता आता दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी श्री राम जन्मभूमी ट्रस्टचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. रामलल्लाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांची उत्तम सोय करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसंच, विविध जिल्ह्यांमधून येणाऱ्या भाविकांना परत जाता यावं यासाठी बसेसचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
संपूर्ण देशभरातून श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविक अयोध्येत येत आहेत. त्यांना सुरक्षा आणि सोयी-सुविधा पुरवणे हे सरकारचं कर्तव्य आहे, असं योगी यावेळी म्हणाले. तसंच, रामलल्लाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी एका रांगेत उभं राहून दर्शन घ्यावं, जेणेकरून गर्दी किंवा चेंगराचेंगरी होणार नाही. वयोवृद्ध व्यक्ती, लहान मुलं आणि महिलांची विशेष खबरदारी घेण्यात यावी. रस्त्यावर कमी आवाजात राम भजन वाजवावं; असं आवाहन देखील आदित्यनाथ यांनी केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.