बहराईच (उत्तर प्रदेश), ता. १४ (पीटीआय): दुर्गा मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत एका युवकाचा गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री मन्सूर गावातील महाराजगंज येथे घडली. या घटनेची माहिती कळताच शहरात आणि परिसरात हिंसाचार भडकला. आजही सकाळी जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे तणाव असून याप्रकरणी आतापर्यंत ३० जणांना ताब्यात घेतले. यादरम्यान, दगडफेक आणि गोळीबारात बाराहून जखमी झाले.
काल रात्री दूर्गा मूर्ती मिरवणुकीतील डिजेवरून वाद पेटला. रेहुआ मन्सूर गावचे रहिवासी रामगोपाल मिश्रा (वय २२) हे देखील मिरवणुकीत सामील झाले. डिजेच्या आवाजावरून वादावादी सुरू असतानाच त्याचवेळी त्यांना गोळी लागली. त्यांना दवाखान्यात नेले असता उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेनंतर दंगल उसळली. वाढता तणाव पाहता फखरपूर भाग आणि अन्य ठिकाणच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी तातडीने कार्यवाही करत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी प्रशासनाला धार्मिक संघटनांशी संवाद साधणे आणि वेळेवर मूर्ती विसर्जन करण्याचे निर्देश दिले. तसेच विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्याचेही आदेश दिले. याप्रकरणातील आरोपी सलमान याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याच्या घरातून गोळी झाडली गेल्याचे पोलिसांनी सांगितले. या घरातच त्याचे दुकानही आहे.
कालच्या घटनेचे पडसाद आज सकाळी उमटले. प्रशासन आणि पोलिसांचा निषेध करत ठिकठिकाणाहून मोर्चे निघाले. पोलिसांनी ध्वजसंचलन करूनही नागरिकांनी रस्त्यावर उतरत प्रशासनाचा निषेध केला. अनेक ठिकाणी दुकानांची, वाहनांची, घराची जाळपोळ झाल्याने धुराचे लोट दिसत होते. गृहसचिव संजीव गुप्ता आणि अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) अमिताभ यादव यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस अधिक्षक वृंदा शुक्ला म्हणाल्या, कर्तव्यात हयगय केल्याप्रकरणी एसएचओ आणि महसी पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यास निलंबित केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी कारवाई करूनही जनतेत तीव्र नाराजी आहे.
पोलिसांबरोबरच सर्कल ऑफिसर रुपेंद्र गौड यांनी देखील बेजबाबदारपणा दाखविला असून त्यांनी लाठीमाराचे आदेश दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आज सकाळी बहराईच येथे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना पांगविण्यासाठी लाठीमार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मृत रामगोपाल मिश्रा याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नातेवाइकांनी नकार दिला. तसेच मृतदेह घेऊन ते तहसील कार्यालयाकडे गेले. यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.हिंसाचारग्रस्त भागात आता तणावपूर्ण शांतता असून खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेटसेवा बंद करण्यात आली आहे.
या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारने तातडीने कारवाई करत तीस समाजकंटकांना ताब्यात घेतले. वरिष्ठ अधिकारी बहराईचमध्ये दाखल झाले. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राखीव दलाच्या सहा तुकड्या दाखल झाल्या असून तेथे पोलिस अधीक्षक दर्जाचे चार अधिकारी, दोन अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सहा सर्कल ऑफीसर, एक आरएएफची तुकडी तैनात केली आहे. महाराजगंज येथे जाळपोळीचे प्रकार घडले. तणाव असल्याने महारागंज आणि महसी भागातील शाळांना सुटी देण्यात आली. कालच्या दगडफेकीत सुधाकर तिवारी, सत्यवान, अखिलेश वाजपेयी, विनोद मिश्रा, लाल विश्वकर्मा यांच्यासह बारा जण जखमी झाले आहेत. बहुतांश जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बहराईच गोळीबारातील मुख्य आरोपी सलमान याच्यासह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि कारवाई करत वीस ते पंचवीस जणांना ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पूजा समितीकडून रात्री उशिरापर्यंत आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत रात्री उशिरापर्यंत रस्ते बंद केले होते.
उत्तर प्रदेशातील बहराईच येथील हिंसाचार आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा दु:खद आणि क्लेषदायक आहे. मुख्यमंत्री आणि राज्याच्या प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. जनतेला विश्वासात घेऊन हिंसाचार थांबवावा. दोषींवर कडक कारवाई करावी. जनतेने कायदा हातात घेऊ नये.
प्रियांका गांधी-वड्रा, कॉंग्रेस नेत्या.
-------
बहराईच येथील महसील तहसीलच्या महाराजगंज येथे काल दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक महाराजगंज येथून जात असताना घाटापासून तीन किलेामीटर अलीकडे एका समुदायाने धार्मिक ठिकाणांसमोर मोठ्या आवाजात डीजे लावण्यास आक्षेप घेतला. त्यावर वाद पेटला. यावेळी इमारतीवरचा एक झेंडा काढण्याचा प्रयत्न होत असताना तणाव वाढला. त्याचवेळी एका घरातून गोळीबार झाला आणि दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत मूर्तीची विटंबना झाली. त्यामुळे आणखीच तणाव वाढला. यादरम्यान गोळी लागल्याने रामगोपाल मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला.यानंतर जमाव भडकला आणि तोडफोड झाली. अनेक गाड्या तोडण्यात आल्या. संपूर्ण भागातील मूर्ती विसर्जन थांबविण्यात आले. जमावाने कारवाई होत नाही तोपर्यंत विसर्जन न करण्याची धमकी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.