बंगळुरूमधून फसवणुकीचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. कॅब चालवणाऱ्या व्यक्तीने एका महिलेचा लहानपणीचा मित्र असल्याचा बनाव करत तिच्याकडून तब्बल २२ लाख रुपये उकळले. एवढंच नाही, तर तिच्याकडून सुमारे ९६० ग्रॅम सोनंही या व्यक्तीने काढून घेतलं. यानंतर महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
किरण कुमार असं या कॅब ड्रायव्हरचं नाव आहे. त्याने ज्याप्रकारे या महिलेला गंडा घातला आहे, ते पाहून पोलिसही चक्रावले आहेत. पोलिसांनी सध्या त्याच्याकडून ६० लाख रुपये किंमतीचं हे सोनं जप्त केलं असून, बाकी तपास सुरू आहे.
या महिलेने काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाईन अॅपवरुन कॅब बुक केली होती. यावेळी किरण कुमार ही कॅब चालवत होता. कॅबमध्ये बसल्यानंतर ही महिला फोनवर आपल्या मित्राशी गप्पा मारत होती. यावेळी आपल्या आयुष्यातील काही अडचणींबाबत तिने या मित्राला मदत मागितली होती. किरणने या सर्व गप्पा ऐकल्या होत्या. (Bengaluru Cab Driver Fraud)
त्यानंतर काही दिवसांनी किरणने या महिलेला फोन केला. फोनवर आपण दोघं लहानपणीचे मित्र असल्याचं त्याने म्हटलं. यानंतर महिलेची खात्री पटवण्यासाठी त्याने कॅबमध्ये ऐकलेल्या संभाषणातील माहितीचा वापर केला. शिवाय, त्या महिलेच्या अडचणीबाबत मदत करण्याची तयारीदेखील त्याने दाखवली. (Crime News)
यानंतर कित्येक महिने हे दोघे फोनवर एकमेकांच्या संपर्कात होते. गप्पांच्या ओघात अधिक माहिती मिळवून किरणने या महिलेचा विश्वास संपादन केला. या काळामध्ये त्याने आपली अडचण, गरज असल्याचं सांगून या महिलेकडून वेळोवेळी काही रक्कम घेतली.
आठ ते नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये या महिलेने किरणला सुमारे २२ लाख रुपये दिले. यानंतरही किरण आणखी पैशांची मागणी करत होता. मात्र, या महिलेने आपल्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं. त्यावर मग आरोपीने तिला एखाद्या मौल्यवान वस्तूची मागणी केली. या महिलेने मग त्याला सोनं देण्याची तयारी दर्शवली. सोनं घेण्यासाठी तिने आरोपीला भेटायला बोलावलं.
जेव्हा ही महिला सोनं देण्यासाठी किरणला भेटली. तेव्हा तिला लक्षात आलं की हा तर कॅब ड्रायव्हर आहे. यानंतर मग तिने सोनं देण्यास मनाई केली, आणि आतापर्यंत दिलेले पैसेही परत मागितले. मात्र, तिची बदनामी करण्याची धमकी देत किरण तिच्याकडील सोनं घेऊन गेला. त्यानंतर मग महिलेने पोलिसांमध्ये धाव घेतली; आणि हे प्रकरण समोर आलं.
बंगळुरूमधील इस्ट डिव्हीजनचे डीसीपी भीमाशंकर गुलेद यांनी या प्रकरणाबद्दल माहिती दिली. सोबतच, त्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी असताना फोनवर आपली खासगी माहिती शक्यतो शेअर करू नये, असं गुलेद यांनी म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.