राज्यातील सरकार स्थिर असून ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पाचही हमी योजना यशस्वी करेल.
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकार (Congress Government) लवकरच कोसळेल, अशी भविष्यवाणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, त्यात तथ्य नाही. काँग्रेस सरकार स्थिर असून कार्यकाळ पूर्ण करेल, अशी माहिती गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर (G Parameshwar) यांनी दिली.
भाजपमधील काही आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांचे शुक्रवारी हुबळी येथे जाण्यासाठी सांबरा विमानतळावर (Sambara Airport) आगमन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
भाजपातील विविध नेत्यांकडून सातत्याने काँग्रेस सरकार ५ वर्षे टिकणार नाही, असे भाकीत करण्यात येत आहे. मात्र, राज्यातील सरकार स्थिर असून ५ वर्षे कार्यकाळ पूर्ण करेल. तसेच पाचही हमी योजना यशस्वी करेल, असा विश्वासही डॉ. परमेश्वर यांनी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाचे सिध्दांत व नेत्यांना मानणाऱ्यांचे पक्षात स्वागत असेल. भाजपमधील काही आमदारांनी तशी तयारी दाखविली असून त्या सर्वांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही डॉ. परमेश्वर म्हणाले.
राज्यातील सर्व जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालय आणि पोलिस आयुक्तालयांना भेट देण्यात येत आहे. या माध्यमातून गुन्हे व त्यांचे स्वरुप यांची माहिती घेतली जात आहे. गुन्हे तपासाचा आढावाही घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून पहिल्यांदा हुबळी येथील जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालय आणि नंतर हुबळी-धारवाड येथील पोलिस आयुक्तालय कार्यालयाला भेट देणार असल्याचे गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी सांगितले.
हिंडलगा कारागृहाबाबत तक्रारी आहेत. तसेच तेथून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला फोन करून धमकी देण्यात आली आहे. याबाबतची माहिती घेण्यात येईल. पुढील दौऱ्यात कारागृहाला भेट देण्यात येईल. हिरेकोडी येथील जैनमुनी हत्येचा तपास सीबीआयकडे सोपविला आहे. तपास योग्य दिशेने चालू असून तपासाअंती सत्य बाहेर येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
उद्यमबाग पोलिसांनी दिव्यांग तरुणावर लाठीहल्ला केल्याचे प्रकरण अलीकडे घडले आहे. यासंदर्भात गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी संबंधित पोलिसांची बदली केली आहे. मात्र, या प्रकरणाची अधिक माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील, अशी माहिती दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.