कोलकाता- भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पश्चिम बंगालच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर होते. हा दौरा प्रचंड गाजला. तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) काही दिग्गज नेत्यांनी मंत्रिपद आणि आमदारकीचा राजीनामा देत अमित शहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. माध्यमांतही अमित शहा यांच्या रॅलीला मिळालेला प्रचंड प्रतिसाद दाखवण्यात आला. परंतु, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मात्र भाजपला आगामी निवडणुकीत दुहेरी आकडाही गाठता येणार नसल्याचे भाकित केले आहे. दुहेरी आकडा गाठण्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे, माझं टि्वट सेव्ह करुन ठेवा, असेही त्यांनी आवर्जून सांगितलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचे सहयोगी असलेले प्रशांत यांनी टि्वटमध्ये म्हटले की, माध्यमांनी भाजपचा गरजेपेक्षा जास्तच प्रचार आणि प्रसार केला आहे. परंतु, वास्तविकता ही आहे की, पश्चिम बंगालमध्ये भाजपला दुहेरी आकडा गाठण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
यावरच न थांबता प्रशांत किशोर यांनी आपले टि्वट सेव्ह करा असे आवाहनही केले आहे. त्याचबरोबर भाजपने यापेक्षा चांगली कामगिरी केली तर मी टि्वटर सोडेन असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, दिग्गज नेत्यांनी पक्षाचा त्याग केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार ममता बॅनर्जी या प्रशांत किशोर यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते.
हेही वाचा- नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा ! बँकेला 8000 कोटींचा गंडा घालणाऱ्या माजी खासदाराविरोधात गुन्हा
दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्यावर भाजपनेही पलटवार केला आहे. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी टि्वट करत म्हटले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपची जी सुनामी सुरु आहे, ती पाहता सरकार बनल्यानंतर या देशाला एक निवडणूक रणनीतीकार गमवावा लागेल. ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्याशी करार केला आहे. प्रशांत किशोर हे ममता बॅनर्जींचे भाचे आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याबरोबर सक्रिय आहेत. परंतु, टीएमसीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर यांची कार्यशैली पसंत पडलेली दिसत नाही. काही बंडखोर नेत्यांनी तर प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या हस्तक्षेपामुळे पक्ष सोडल्याचे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.