वायनाड : २९ आणि ३० जुलैच्या रात्री प्रचंड पाऊस पडल्याने झालेल्या भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आज ३४१ वर पोचली आहे. सलग पाचव्या दिवशी शोधकार्य सुरू असून आतापर्यंत २०६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. काही भागात मृतदेह छिन्नविच्छिन स्थितीत आढळून येत आहेत.
भूस्खलनामुळे मुंडक्कई आणि चूरलमला येथील निवासी भागात मोठमोठे दगड आणि लाकडे पडली असून सखल भागात पाणी शिरल्याने आणि दलदलीमुळे बचाव कार्याला वेळ लागत आहे. या गावांतील ढिगाऱ्याखाली अडकलेल्या, बेपत्ता नागरिकांना शोधण्यासाठी सखोल भागाचा वेध घेणारे रडार यंत्रणा (डीप सर्च) आणण्यात येणार आहेत. दरम्यान, भूस्खलनपीडितग्रस्त लोकांसाठी मेप्पादीजवळील सुरक्षित ठिकाणी वेलारमला येथे नवे शहर वसविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पत्रकारांना सांगितले.
लष्कराने एक ऑगस्ट रोजी मुंडक्कई, चूरलमला, अट्टामला आणि नूलपुझ्झा गावातील बचाव कार्य संपल्याची माहिती दिली होती. आता केवळ ढिगाऱ्याखाली असलेल्या लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. अनेक ठिकाणी वीस ते तीस फुटांपर्यंत मृतदेह दबलेले असावेत, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केरळ सरकारने एक झेवर रडार आणि फोर रेको रडारसह उच्च प्रतीच्या रडारची उपकरणे देण्याची मागणी केली आहे. हे रडार भारतीय हवाई दलाच्या विमानातून दिल्लीहून आणले जाणार आहे.
या रडारचा वापर बर्फाळ प्रदेशात विशेषत: सियाचिन, लडाख येथे हिमस्खलनानंतरच्या तपासादरम्यान केला जातो. मुख्यमंत्री पिनराई विजयन म्हणाले, शोध आणि बचाव कार्य शेवटच्या टप्प्यांत असून अजूनही २०६ नागरिक बेपत्ता आहेत. चालियार नदीतून सापडणाऱ्या मृतदेहांची आणि त्यांच्या अवयवयांची ओळख पटविणे कठीण जात असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, आतापर्यंत २१५ मृतदेह हाती लागले असून त्यात ८७ महिला, ९८ पुरुष, ३० मुलांचा समावेश आहे. १४८ मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आले आहेत. २०६ जण बेपत्ता असून ८१ जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भूस्खलनपीडित नागरिकांच्या पुनर्वसनासंदभात बोलताना विजयन म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सुरक्षित जागेचा शोध घेतला जात होता. प्रामुख्याने वेलारमला येथे नवे शहर तयार होईल, अशी माहिती त्यांनी दिली. तेथे पीडितांसाठी घरे बांधली जातील आणि पूर्णपणे पुनर्वसन होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. शिवाय शिक्षण मंत्री भूस्खलनग्रस्त भागाचा दौरा करणार असून ते नष्ट झालेल्या शाळांची माहिती घेतील. शिक्षणात खंड पडणार नाही, यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे विजयन म्हणाले.
सहायता निधीवरून काँग्रेसमध्ये बेबनाव
मुख्यमंत्री सहायता निधी (सीएमडीआरएफ) मध्ये योगदान देण्यावरून कॉंग्रेस नेत्यांत ताणाताणी झाली आहे. ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी आमदार म्हणून मिळणारे एक महिन्याचे वेतन या निधीत जमा केले जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर केपीसीसीचे प्रमुख के. सुधाकरन यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, माकपप्रणीत डाव्या पक्षाच्या सरकारच्या निधीत पैसे देण्याची काही गरज नाही. सरकारच्या निधीत योगदान देण्यासाठी केरळ प्रदेश काँग्रेस समितीकडून कोणतेही निर्देश नव्हते. काँग्रेसकडून मदतीसाठी पैसे गोळा केले जात आहेत आणि चेन्निथला यांनी त्यात योगदान द्यायला हवे. मात्र सध्या ‘सीएमडीआरएफ’मध्ये योगदान देण्यापासून राज्यातील लोकांना परावृत्त करण्यासाठी ऑनलाइन मोहीम सुरू असताना सुधाकरन यांचे मत लोकांत संभ्रम निर्माण करणारे आहे.
बदनामी केल्याने गुन्हे दाखल
वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनपीडित लोकांच्या मदतीसाठी आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टच्या विरोधात मोहीम राबविली जात असताना त्याविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारपर्यंत ३९ गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियाच्या २७९ खात्यांवरून ‘सीएमडीआरएफ’विरोधात मोहीम सुरू राबविली जात होती. या खात्यांना ब्लॉक करण्यासाठी नोटीस जारी केली आहे. या खात्यावरून बदनामी केली जात असली तरी मदतीचा ओघ सुरूच आहे. सर्व क्षेत्रातील नागरिक मग ज्येष्ठ असो किंवा चहा टपरी चालविणारी महिला असो, मुले असो ते आपापल्या परीने उत्पन्न किंवा पॉकेटमनी निधीत जमा करत आहेत.
अभिनेता मोहनलाल वायनाडमध्ये
मल्याळम चित्रपटातील सुपरस्टार मोहनलाल सध्या बचाव आणि शोध मोहिमेची पाहणी करण्यासाठी मानद लेप्टनंट कर्नलच्या रुपाने मुंडक्कई आणि चूरलमला येथे तळ ठोकून आहे. लष्करी गणवेशात असलेले मोहनलाल यांनी चूरलमला, मुंडक्कई, पुंचिरिमट्टमसह अन्य ठिकाणी जाण्यापूर्वी मेप्पादी येथील लष्कराच्या शिबिरात अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच घटनेचे बचावकार्याची माहिती घेतली. मोहनलाल यांना २००९ मध्ये मानद लेप्टनंट कर्नलपदी नेमले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटांपैकी वायनाडच्या संकटाचा उल्लेख करता येईल. त्यांच्या ‘विश्वशांती फाउंडेशन’च्या वतीने भूस्खलनपीडित लोकांच्या पुनर्वसनासाठी तीन कोटी रुपये देण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. मोहनलाल यांच्यासमवेत असणारे सेवानिवृत्त लष्करी अधिकारी मेजर रवी म्हणाले, फाउंडेशनचे संचालक म्हणून मुंडक्कई येथील एलपी शाळेची पुनर्बांधणी करणार आहोत. या शाळेची भूस्खलनात मोठी पडझड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.