नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना सीबीआयने नोटीस पाठवली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने आपल्या नोटीसमध्ये सत्यपाल मलिक यांना भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे.
सीबीआय या महिन्याच्या 27 आणि 28 एप्रिल रोजी सत्यपाल मलिक यांची चौकशी करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर रोडवरील गेस्ट हाऊसमध्ये सत्यपाल मलिक यांची चौकशी होऊ शकते. मात्र, या नोटीस आणि सत्यपाल मलिक यांच्या चौकशीच्या वृत्ताबाबत सीबीआयने अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमध्ये कथित अनियमिततेच्या मुद्दावर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
ऑक्टोबर 2021 मध्ये सत्यपाल मलिक यांनी दावा केला होता की, RSS नेत्याशी संबंधित फाइल क्लिअर करण्यासाठी त्यांना कथितपणे 300 कोटी रुपयांची लाचेची ऑफर देण्यात आली होती. त्यानंतर एजन्सीने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सत्यपाल मलिक यांचीही चौकशी करण्यात आली होती.
विशेष म्हणजे, सत्यपाल मलिक हे अनेक दिवसांपासून केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. किसान विधेयकाविरोधात धरणे धरणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थही ते बोलले होते. त्यादरम्यान त्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकालाही विरोध केला होता. केंद्राचे तीन कृषी कायदे रद्द करणे हा शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय असल्याचे ते म्हणाले होते. शिवाय नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी पुलवामा हल्ल्यासाठी सरकारच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींना काहीच माहित नसतं, असंही मलिक यांनी नमूद केलं. त्यांनाच आता नोटीस आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.