Chandrayaan-3 mission significance isro research india k sivan  sakal
देश

Chandrayaan-3 : मोहीम जगाच्या कल्याणासाठी

‘चांद्रयान-३’ मोहीम केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.

सकाळ वृत्तसेवा

चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबाबत आजही आपण अनभिज्ञ आहे. परग्रहावरील भविष्यकालीन मानवी मोहिमांचा राजमार्ग येथून जाईल, असे म्हटले जाते. त्यामुळे ‘चांद्रयान-३’ मोहीम केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. याच निमित्ताने भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख डॉ. के. सिवन यांच्याशी साधलेला संवाद...

— सम्राट कदम

चंद्रावर पहिले पाऊल

२० जुलै १९६९ रोजी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. अमेरिकेच्या अपोलो-११ यानाने साहसी मोहीम पूर्ण केली होती. अमेरिकेचे नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन या दोन अंतराळवीरांनी चंद्रावर पाय ठेवला तेव्हा अंतराळ संशोधनाच्या ऐतिहासिक पर्वाला सुरवात झाली. युरी गागरीन हे १२ एप्रिल १९६१ रोजी पहिले अंतराळवीर ठरले होते. त्यानंतर सुमारे आठ वर्षांनंतर दोन अंतराळवीर चंद्रावर उतरले.

भारताचे पहिले अंतराळवीर

३ एप्रिल १९८४ रोजी भारत आणि रशियाच्या संयुक्त अंतराळ मोहिमेनुसार भारतीय हवाई दलाचे वैमानिक राकेश शर्मा, रशियाचे कर्नल युरी मलेशेव, कप्तान गेनेडी ट्राकालोव्ह यांना घेऊन सोयूझ टी-११ अवकाशात झेपावले. अवकाश मोहिमेदरम्यान अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संवाद साधला होता.

भारताचा अवकाश संशोधन इतिहास

५ ऑगस्ट १९६९ भारतीय अवकाश संशोधन संघटनेची (इस्रो) स्थापना

१९ एप्रिल १९७५ पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’चे रशियाच्या प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण

१८ जुलै १९८० ‘एसएलव्ही-३’ची चाचणी यशस्वी. त्याच्या माध्यमातून ‘इस्रो’ने रोहिणी उपग्रह (आरएस-१) पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केला

३० ऑगस्ट १९८३ दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामानाच्या अंदाजासाठी इन्सॅट-१ बी’चे प्रक्षेपण

२० सप्टेंबर १९९३ पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकल (पीएलएलव्ही)चे यशस्वी चाचणी. या प्रक्षेपणाच्या मदतीने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त यशस्वी उड्डाणे झाली आहेत

२२ ऑक्टोबर २००८ अवकाश क्षेत्रात ‘इस्रो’ने एक पाऊल पुढे टाकले. ऐतिहासिक चंद्रमोहिमेला प्रारंभ करीत एक हजार ३८० किलो वजनाचे ‘चांद्रयान-१’ अवकाशात सोडण्यात आले

२४ सप्टेंबर २०१४ ‘इस्रो’चे मंगलयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापन. ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) म्हणजेच मंगलयानाचे प्रक्षेपण. भारताची पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी. असे करणारा भारत जगातील चौथा देश ठरला

२२ जुलै २०१९ दुसरी चांद्रयान मोहिमेतील ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण. यात यान चंद्रावर उतरविण्यास अपयश

१४ जुलै २०२३ ‘चांद्रयान-२’चा पुढील टप्पा ‘चांद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण

२३ ऑगस्ट २०२३ ‘चांद्रयान-३’ बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पणे उतरले.

भारताच्या दृष्टीने चांद्रयान-३ च्या लॅंडींगचे महत्त्व काय?

डॉ. के. सिवन : पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर असलेल्या चंद्रावर एखादी वस्तू सुखरूप उतरविण्याची आपली ही पहिलीच वेळ आहे. खरेतर, परग्रहावर भारताचे अस्तित्व सिद्ध करण्याची ही रंगीत तालीमच आहे.

चांद्रयान अलगद उतरविण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करणे आणि त्याचे निर्दोषत्व सिद्ध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. चांद्रयानाचा विक्रम लॅंडर चंद्रावर सुखरूप उतरल्यामुळे आपली वैज्ञानिक आणि तांत्रिक क्षमता जगासमोर सिद्ध झाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे,

आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलो आहोत, जिथे आजपर्यंत कोणीच पोहचले नव्हते. जैव-भौगोलिकदृष्ट्या चंद्राच्या दक्षिण भागाचे आपले एक विशेष महत्त्व आहे. प्रज्ञान बग्गी आणि विक्रम लॅंडरमुळे चंद्राविषयीची नवी माहिती आणि विज्ञान जगासमोर येईल. त्यामुळेच, चांद्रयान-३ चे लँडिग केवळ भारतासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण आहे.

‘चांद्रयान-२’ मोहिमेतून आपण काय शिकलो?

- चांद्रयान-२ ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाली नाही. मात्र, चंद्राभोवती फिरणारा ऑर्बायटर आजही कार्यरत असून, चांद्रयान-३ साठीही तो उपयोगी ठरत आहे. त्यावेळी विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्यात अगदी शेवटच्या क्षणांत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

त्याचा बोध घेऊन आपण प्रज्वलन तंत्रज्ञान, नियंत्रण प्रणाली आणि लॅंडिंग सिस्टीममधील चुका दुरूस्त केल्या असून, चांद्रयान-३ परिपूर्ण सज्ज केला आहे. ‘इस्रो’ नेहमीच प्रयोगांतून आणि अपयशांतून शिकत आली आहे.

अवकाशातील मोहिमांचा, विशेषतः ‘चांद्रयान ३’चा भविष्यात काय फायदा होईल?

- अवकाश मोहिमांबरोबरच विज्ञान आणि तंत्रज्ञानही विकसित होत असते. ‘चांद्रयान -३’मुळे परग्रहावर उतरण्याचे आपले तंत्रज्ञान सिद्ध होईल. त्यामुळे भविष्यातील अवकाश मोहिमांसाठी त्याचा नक्कीच फायदा होईल. केवळ अवकाश मोहिमा नाही,

तर विज्ञानातील अनेक प्रयोगांसाठी आणि मानवजातीसाठी याचा उपयोग करता येईल. ‘इस्रो’च्या भविष्यातील मोहिमा आपल्यासमोर आहेतच. ‘चांद्रयान -३’मुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विज्ञान आणि भविष्यातील संधीही सामोरे येतील. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.

भविष्यातील मोहिमांसाठी आपल्याला कोणत्या क्षमता वाढवाव्या लागतील?

- अवकाश मोहिमांतील आपली क्षमता आणि वेगळेपण आपण सिद्ध केले आहे. आता गरज आहे ती आर्थिक गुंतवणूक वाढविण्याची. सरकारनेही त्या दृष्टीने पाऊले उचलली असून, खासगी भागीदारीही वाढत आहे.

पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचे उत्पादन आणि क्षमता विकासासाठी खासगी क्षेत्राला अवकाश संशोधनात प्रवेश मिळाला आहे. त्याचा निश्चितच फायदा येत्या काळात होईल. तसेच, चांद्रयान-३ मोहिमेसाठी आपल्याला एखाद्या बिगबजेट चित्रपटापेक्षाही कमी खर्च आला असला तरी भविष्यात आपल्याला काटकसरीच्या या उपायांवर अवलंबून राहता येणार नाही.

आपल्याला अधिक निधी, मोठ्या क्षमतेची रॉकेट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांची आवश्‍यकता आहे. सध्याच्या सरकारने याबाबत एक गोष्ट चांगली केली आहे, ती म्हणजे अवकाश क्षेत्र खासगी उद्योगांना खुले केले आहे.

अवकाश क्षेत्रात भारताची भागीदारी कशी वाढेल?

- सरकारी पातळीवर त्यादृष्टीने आवश्यक पाऊले उचलली जात आहे. म्हणूनच खासगी उद्योगांसाठी हे क्षेत्र खुले झाले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन भारतीय उद्योगजगत घेत असून, नवनवे स्टार्टअप्सही आपल्याला यात पाहायला मिळत आहे. यशस्वी होणाऱ्या ‘इस्रो’च्या मोहिमांमुळे निश्चितच अवकाश क्षेत्रात आपली भागीदारी मोठ्या प्रमाणावर वाढेल.

संशोधन क्षेत्रातील सहभागासाठी युवकांना तुम्ही काय सांगाल?

- निश्चितच ! युवकांनी संशोधन आणि विकास क्षेत्रात यायला हवे. जनमानसातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्याबरोबरच मानवाच्या कल्याणासाठी संशोधनाची आवश्यकता आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यायला हवे. तशा संधीही आता उपलब्ध आहेत.

‘एका दिवसा’ची मोहीम

भारताची ही मोहीम चंद्रावरील अवघ्या एका दिवसाची (पृथ्वीवरील १४ दिवस) असणार आहे. परंतु इतर कोणाची मदत न घेता हा टप्पा गाठण्याची किमया भारताने केली आहे. इतर देशांना चंद्रापर्यंत यशस्वी वाटचाल करण्यापूर्वी अनेकदा अपयशाचे तोंड बघावे लागले होते. भारताने मात्र पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले. ‘चांद्रयान २’ तेथे उतरू शकले नसले तरी त्याने आपली इतर सर्व उद्दिष्ट्ये पूर्ण केली होती. ‘

चांद्रयान-३’ चे प्रक्षेपण १४ जुलै २०२३ रोजी दुपारी २.३५ वाजता श्रीहरीकोटा येथून करण्यात आले. गोफणपद्धतीचा वापर करत त्याची कक्षा हळू हळू वाढविण्यात आली. कमी इंधनात मोहीम पार पाडण्यासाठी ही पद्धत वापरण्यात आली. त्यानंतर एक ऑगस्ट रोजी ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडले, पाच ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत पोहोचले. अखेरीस ४० दिवसांच्या प्रवासानंतर ते चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले. ‘चांद्रयान ३’ मध्ये प्रोपल्शन मोड्यूलमध्ये विक्रम लँडर व प्रज्ञान बग्गी असे दोन भाग आहेत.

चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरवून भारताने अवकाश संशोधन क्षेत्रात मोठा इतिहास घडविला आहे. इस्रोतील शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे. यासाठी इस्रोच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन!

- नितीश कुमार, मुख्यमंत्री बिहार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amruta fadnavis on CM Post: महायुतीचा मोठा विजय, राजकीय चर्चेला उधाण! मुख्यमंत्री पदाबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या...

Chandgad Assembly Election 2024 Results : चंदगडला भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील ठरले जायंट किलर; मिळवला मोठ्या मताधिक्याने विजय

Devendra Fadnavis: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्रीपद कुठल्याही निकषांवर नाही!

BJP Candidate Ravisheth Patil Won Pen Assembly Election : प्रसाद भोईर यांना पराभूत करत भाजपच्या रवीशेठ पाटीलांचा दणदणीत विजय

Sneha Dubey Vasai Assembly Election 2024 Result: वसई मतदारसंघात भाजपचा झेंडा फडकला; स्नेहा दुबे यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT