सिमला : ‘‘हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंह सुक्खू यांनी आत्मपरीक्षण करावे आणि सध्याच्या स्थितीला कोण जबाबदार आहे याचा विचार करावा,’’ असे प्रतिपादन राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या नऊ आमदारांनी केले आहे
नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी काँग्रेसच्या सहा आणि तीन अपक्ष आमदारांनी भाजपला मत दिले होते. पक्षादेश न पाळल्याबद्दल काँग्रेसने आपल्या सहा आमदारांवर कारवाई करत, त्यांना अपात्र केले आहे. या सर्वांनी आज एक संयुक्त निवेदन जारी केले असून, त्यात सुक्खू यांच्यावर टीका केली आहे. ‘‘आम्ही आत्मसन्मानाची लढाई लढत आहोत. मुख्यमंत्री सुक्खू एकीकडे समझोत्यासाठी हात पुढे करत आहेत, तर दुसरीकडे काळे साप अशा शब्दांत आमची संभावना करत आहेत,’’ असे या आमदारांनी निवेदनात म्हटले आहे.
काँग्रेसचे बंडखोर आमदार सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजिंदर राणा, इंदर दत्त लखनपाल, चैतन्य शर्मा आणि देविंदरकुमार भुट्टो तसेच अपक्ष आमदार आशिष शर्मा, होशियार सिंह आणि के. एल. ठाकूर या सर्वांनी मिळून निवेदन जारी केले आहे. जाहीर सभेमध्ये बोलताना सुक्खू यांनी म्हटले होते की, काँग्रेसमध्ये असलेल्या सहा काळ्या सापांनी आत्मसन्मान विकला आहे आणि राज्य सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहेत.
‘‘चंडीगडला आल्यानंतर सुक्खू हे हिमाचल भवनातील खोलीत न राहता पंचतारांकीत हॉटेलात राहतात. पंचतारांकित हॉटेलामधून आपल्या सुरक्षा रक्षकांना परत पाठवून देतात. या सगळ्यामागे त्यांचा काय छुपा हेतू आहे, हे त्यांनी सर्वांना सांगावे. आपल्या कृतीचे स्पष्टीकरण द्यावे,’’ असेही या आमदारांनी निवेदनात म्हटले आहे.
घुसमट होतेय
‘‘मुख्यमंत्री आपल्या मित्रांना प्राधान्य देत असल्याने आमदारांची घुसमट होत आहे आणि सरकारमध्ये अपमानास्पद वाटत आहे. मुख्यमंत्री सुक्खू यांच्या मित्रमंडळींचा कंपू आमदारांवर वर्चस्व गाजवत आहे,’’ असा आरोपही या नऊ आमदारांनी निवेदनात केला आहे.