नवी दिल्ली- यावर्षी जून महिन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसेचा कट चीननेच रचला होता, असा खळबळजनक खुलासा अमेरिकन संसदेतील काँग्रेसच्या एका समितीने सादर केलेल्या अहवालात झाला आहे. आपल्या शेजारी देशाला धमकावण्याचा चीनचा या हल्ल्यामागे हेतू होता. गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांनी रात्री अंधारात भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला केला होता. यामध्ये 20 भारतीय जवानांना वीरमरण आले होते.
काही पुरावे हे सांगतात की, चीन सरकारने या हल्ल्याचा कट रचला होता. यामध्ये सैनिकांच्या हत्येचीही शक्यता होती, असे या अमेरिकेतील चीन आर्थिक आणि सुरक्षा समीक्षा आयोगाने (यूएससीसी) आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे. यूएससीसीची स्थापना 2000 मध्ये झाली होती, जी अमेरिका आणि चीनदरम्यानच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि व्यापाराच्या मुद्द्याचा अभ्यास करते. हा आयोग अमेरिकन काँग्रेसला चीनविरोधात विधायक आणि प्रशासकीय कारवाई करण्याची शिफारसही करु शकते.
या अहवालात म्हटले आहे की, चिनी सरकारने नियंत्रण रेषेवर चिथावणी देणारे पाऊल का उचलले यामागचे योग्य कारण समजू शकलेले नाही. परंतु, भारताच्या सीमेजवळील भागात रस्ता तयार करण्यासाठी चीनने हे पाऊल उचलले असण्याची शक्यता आहे. गलवान हिंसाचार होण्याच्या काही दिवस आधी चीनचे संरक्षण मंत्री वेई यांनी सीमेवर आपल्या सैनिकांना चिथावणी दिली होती.
इतकेच नव्हे तर चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र 'ग्लोबल टाइम्स'नेही भारताला इशारा दिला होता. यामध्ये चिनी वृत्तपत्राने म्हटले की, भारत अमेरिका आणि चीनच्या स्पर्धेत सामील झाला तर व्यापार आणि आर्थिक क्षेत्रात चोख उत्तर दिले जाईल. त्याचबरोबर गलवान हिंसाचाराच्या काही आठवडे आधी काढलेल्या सॅटेलाइट फोटोत चीनने त्या ठिकाणी एक हजार सैनिक तैनात केल्याचे समोर आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.