नवी दिल्ली - भारतात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असताना देशातील 70 जिल्ह्यांमध्ये 150 टक्क्यांहून जास्त कोरोना प्रादुर्भाव होत आहे. सर्वात गंभीर अशी परिस्थिती देशात महाराष्ट्रात आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. देशात दिवसभरात जितके रुग्ण सापडत आहेत त्यात महाराष्ट्राच्या रुग्णांचे प्रमाण हे 60 ते 70 टक्क्यांपर्यंत आहे. गुरुवारी देशात 39 हजार 726 नवीन कोरोना रुग्ण सापडले असून यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 1 कोटी 15 लाख 14 हजार 331 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासात 20 हजार 654 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशात 1 कोटी 10 लाख 83 हजार 679 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. गुरुवारी दिवसभरात भारतात 154 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून यामुळे एकूण मृतांची संख्या 1 लाख 59 हजार 370 इतकी झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात फेब्रुवारीपर्यंत 20 हजारांपेक्षा कमी रुग्ण आढळत होते. मात्र मार्च महिन्यात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचं चित्र दिसत आहे.
राज्यात दिवसभरात 25 हजार 833 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 24 हजार 896 रुग्ण एका दिवसात आढळले होते. राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या 23 लाख 96 हजार 340 झाली आहे. दिवसभरात 12 हजार 175 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर राज्यात आजपर्यंत एकूण 21 लाख 75 हजार 565 कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 90.79 टक्क्यांवर पोहोचलं असून सध्या 1 लाख 66 हजार 353 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांचा उच्चांक
महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले असून यातही रुग्ण संख्येनं आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गुरुवारी दिवसभरात मुंबईत 2 हजार 877 कोरोना रुग्ण सापडले. तर 1 हजार 193 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 3 लाख 52 हजार 835 रुग्ण सापडले आहेत. सध्या मुंबईत 18 हजार 424 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुण्यात कोरोनाचा कहर
पुणे शहर कोरोनाचा हॉटस्पॉट असून मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक रुग्ण पुण्यात सापडत आहेत. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 752 रुग्ण सापडले असून 885 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रीय रुग्णांपैकी 400 हून अधिक रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. गेल्या 24 तासात 22 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत शहरात 5 हजार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दिवसभरात 11 हजार 835 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
नागपूरमध्ये रुग्णसंख्या वाढली
गुरूवारी दिवसभरात 3 हजार 796 कोरोनाबाधितांची नोंद झाली. मागील १२ महिन्यातील सर्वाधिक उच्चांकी आकडा आहे. त्यातच मागील तीन महिन्यातील मृत्यूंचा उच्चांकी आकडा नोंदवला आहे. गुरुवारी दिवसभरात २४ तासांत कोरोनाने २३ बळी घेतले.
महाराष्ट्रात 85 टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत
राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत माहिती देताना दोन दिवसांपूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं की, कोरोनाबाधित रुग्णांपैकी 85 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. यामुळे अशा रुग्णांना घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच कोरोना रुग्ण वाढत असले तरी मृत्यू दर खूपच कमी आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरून जाऊ नये. मात्र गर्दी टाळली पाहिजे आणि काळजी घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.