Delhi Coaching Center Case sakal
देश

Delhi Coaching Center Case : रेवडी संस्कृतीमुळे कर संकलन ठप्प ; दिल्ली हायकोर्टाचे स्थानिक यंत्रणेवर ताशेरे

येथे कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान स्थानिक यंत्रणेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

दिल्ली कोचिंग सेंटर प्रकरण

नवी दिल्ली : येथे कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीदरम्यान स्थानिक यंत्रणेवर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‘रेवडी संस्कृतीमुळे तुम्हाला कर संकलन करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटना घडत असतात,’ असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. या दुर्घटनेची केंद्रीय तपास संस्थेने चौकशी करावी तसेच येत्या शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीला दिल्ली महापालिकेचे आयुक्त, पोलिस उपायुक्त आणि चौकशी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे निर्देश यावेळी कोर्टाकडून देण्यात आले.

मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्या. तुषार राव गेदेला यांच्या पीठासमोर ही सुनावणी पार पडली. ‘दिल्ली पोलिसांच्या कारवाईचे देखील आम्हाला आश्चर्य वाटते. राजेंद्रनगरमध्ये संबंधित कोचिंग सेंटरच्याबाहेर पाण्यातून गाडी चालविणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला जातो पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरोधात मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही,’ अशी खंत न्यायालयाने व्यक्त केली.

‘‘ दिल्ली पोलिस आणि त्यांचे अधिकारी काय काम करत आहेत? नेमके काय झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे? जी दुर्घटना घडली त्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात आले आहे? याबाबतीत तुम्ही एका अधिकाऱ्याकडे जबाबदारी सोपवा आणि त्यालाच अशाप्रकारच्या दुर्घटनांसाठी जबाबदार धरले जावे त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत,’’ अशी टिपणी न्यायालयाने यावेळी केली. राजेंद्रनगर भागामध्ये नाल्यावर झालेले अतिक्रमण शुक्रवारपर्यंत काढून टाका असेही न्यायालयाने ताज्या निर्देशांत म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणामध्ये दिल्ली पोलिसांना देखील प्रतिवादी करताना आता या प्रकरणाची सुनावणी २ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. दरम्यान स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने आज महापालिकेचे आयुक्त अश्वनी कुमार यांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

रेवडी संस्कृतीची चटक

‘ही घटना गंभीर आहे. शहरातील पायाभूत सेवा कोलमडून पडू लागल्या आहेत. प्रत्यक्ष जमिनीवर फार भीषण परिस्थिती पाहायला मिळते. योग्य सांडपाणी व्यवस्था न करताच बहुमजली इमारतींच्या उभारणीला परवानगी दिली जात आहे. तुमच्याकडे कर्मचाऱ्यांचे वेतन द्यायलाच पैसे नसतील तर पायाभूत सुविधा कशा काय सुधारणार आहात? तुम्हाला रेवडी संस्कृतीची चटक लागली असून कर गोळा करणेही तुम्हाला नकोसे झाले आहे. पैसेच गोळा करता येत नसल्याने तुम्हाला ते खर्च देखील करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या दुर्घटना घडत असतात,’ असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

बाहेरच्या विद्यार्थ्यांना हटविले

राजेंद्रनगर भागामध्ये आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना आज दिल्ली पोलिसांनी आंदोलनस्थळावरून हटविले. गेल्या काही दिवसांपासून हे विद्यार्थी येथे आंदोलन करत होते. या आंदोलनात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी हे बाहेरून आलेले असल्याने त्यांना हटविण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला. दरम्यान, दिल्लीतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर इंदूर येथे शहराच्या मध्यवर्ती भागांत बेकायदा पद्धतीने तळघरात चालविण्यात येणारे कोचिंग सेंटर आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT