धक्काबुक्की, आईबहिणीवरून शिवीगाळ, मारामारी, तुंबळ ढकलाढकली... हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणचे दृश्य नाही तर ते आहे देशाच्या राजधानी दिल्लीतील.
नवी दिल्ली - धक्काबुक्की, आईबहिणीवरून शिवीगाळ, मारामारी, तुंबळ ढकलाढकली... हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणचे दृश्य नाही तर अख्ख्या देशाच्या राजधानीतल्या लोकांनी, दिल्लीकरांनी महापालिकेत (एमसीडी) २०२३ मध्ये निवडून दिलेल्या‘ सन्माननीय' नगरसेवकांचे त्यांच्या कारकिर्दीतील हे पहिले ‘कर्तृत्व' ठरले आहे.... दिल्लीच्या महापौरपदासाठी नागरी केंद्रात आज बोलावण्यात आलेल्या दिल्ली मनपाच्या बैठकीत सत्तारूढ आम आदमी पक्ष व भाजपच्या नगरसेवकांमध्ये अभूतपूर्व राडा झाला. यामुळे दिल्लीच्या महापौरपदाची निवडणूक आज होऊ शकली नाही, आता पुढच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
एमसीडीच्या २५० प्रभागांमध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने १३४ प्रभाग जिंकून बहुमत मिळविले होते. भाजपला १०४ जागा मिळाल्या. त्या वेळी भाजपने महापौरपदाच्या निवडणुकीत ‘आपण महापौरपद निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले होते. पण भाजप नेतृत्वाची अंतस्थ इच्छा दिल्ली भाजपला तसे करू देणार नाही हे स्पष्ट होते. ‘भाजप महापौरपदासाठी सारा जोर लावणार' असे भाकीत सकाळ ने निकालांच्याच दिवशी वर्तविले होते. ते आजच्या गोंधळाने प्रत्यक्षात उतरले. दिल्लीचे महापौरपद हिसकावून घेण्यासाठी भाजप सारे मार्ग वापरणार हेही उघड झाले आहे.
भाजपने महापौरपदासाठी आपला उमेदवार रंगणात उतरविला आहे. शिवाय उपराज्यपालांनी त्यांच्या कोट्यातील १० नगरसेवकांची (यल्डरमन) कालच विद्युतवेगाने नियुक्ती केल्यावर भाजपचे मनसुबे उघड झाले. मनपा निवडणुकीत अत्यंत खराब कामहगिरी करणाऱया कॉंग्रेसने या निवडणुकीत भागच घेतलेला नाही. त्यांचे जेमतेम ९ नगरसेवक तटस्थ राहतील असे जाहीर झाले आहे.
दिल्ली महापौरपदासाठी २७४ जणांना मतदान करता येते. एकूण चौदा नामनिर्देशित नगरसेवक आणि मतदानाचा हक्क असलेले दिल्लीतील ७ भाजप खासदार धरले तर भाजपचे मनपातील संख्याबळ होते १२१. आपचे ३ खासदारही निवडणुकीत भाग घेतील. तरीही दोन्ही पक्षांतील बहुमताचा फरक उरतो किमान १३ चा. भाजप नेतृत्वाने ‘त्या‘ आघाडीवर कधीच्याच हालचाली सुरू केल्याचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी निकालानंतर लगेचच सांगितले होते.
भाजपला महापौरपदासाठी जर काही डावपेच करायचे असते तर ते कधीच केले असते. पण आप ने आज गुंडगिरी सुरू केली आहे असा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. खासदार प्रवेश वर्मा, मीनाक्षी लेखी, मनोज तिवारी आदींनी आपवर उलटे आरोप केले आहेत.
आजच्या निवडणुकीसाठी नागरी केंद्राच्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात मनपा अधिकारी, नगरसेवक, खासदार आणि आमदारांसह ३०० लोकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. होती.
गोंधळ कसा झाला -
- भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांनी पीठासीन अधिकारी म्हणून शपथ घेतली. त्याला आपने जोरदार विरोध केला.
- पीठासीन अधिकाऱ्यांच्या पहिल्याच निर्णयावरून सभागृहात गदारोळ झाला.
- शर्मा यांनी १० नामनिर्देशित नगरसेवकांना शपथविधीसाठी बोलावताच भाजप आणि आप नगरसेवकांमध्ये भांडण सुरू झाले व पहाता पहाता त्याचे स्वरूप, मारामारीपर्यंत येऊन ठेपले.
- हे १० यल्डरमन भाजप कार्यकर्ते आहेत असे म्हणून आप नगरसेवकांनी त्यांना शपथविधीसाठी जाण्यापासून रोखले.
- त्यानंतर भाजप नगरसेवक ‘सरसावून' पुढे आले.
- सर्वप्रथम निवडून आलेल्यांनी शपथ घेतली पाहिजे, नामनिर्देशित लोकांनी नाही, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने नगरसेवक मुकेश गोयल यांनी केली. त्यांना भाजप नगरसेवकांनी महाप्रचंड गदारोळ केला.
- बंदोबस्ताला असलेल्या पलिसांनाही धक्काबुक्की करत दोन्ही बाजूचे नगरसेवक हाणामारीवर उतरले.
- अनेक नगरसेवक व नगरसेविका धक्काबुक्कीत खाली पडले.
'भाजपवाल्यांनो, महापालिकेतीस मधील स्वतःची गैरकृत्ये लपवण्यासाठी तुम्ही आणखी किती खाली घसराल ? पुढे ढकलल्या गेलेल्या निवडणुका, पीठासीन अधिकाऱ्याची बेकायदेशीर नियुक्ती, नामनिर्देशित नगरसेवकांची बेकायदेशीर नियुक्ती आणि आता आलेले नगरसेवक जनतेतून निवडून आलेले नाहीत… जर जनतेचा निर्णयाचा तुम्ही आदर करू शकत नसाल तर निवडणूक तरी कशाला घेतली?'
- मनीष सिसोदिया (उपमुख्यमंत्री, दिल्ली)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.