नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवनात मंगळवारी झालेल्या शानदार सोहळ्यात तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी माध्यम क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा पुरस्कार केंद्रीय जलशक्ती सचिव विनी महाजन यांच्या हस्ते स्वीकारताना ‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण. शेजारी उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर टुडू, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत.
जलसमृद्धीसाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद : राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण, ‘सकाळ ॲग्रोवन'चाही गौरव
नवी दिल्ली : ‘‘कोरोना लसीकरणाचे आव्हान आपण उत्तमपणे पेलले. त्याचप्रमाणे आता संभाव्य जलसंकट टाळण्यासाठी जलशक्ती अभियान यशस्वी केले पाहिजे. देशभरातील सरपंच आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा,’’ असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी येथे केले.तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. कोविंद बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने राजधानीतील विज्ञान भवनात आयोजित केलेल्या या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते जलक्षेत्रात उत्कृष्ट काम करणारी राज्ये, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यक्तींना ११ श्रेणींमध्ये ५७ राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. माध्यम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘सकाळ ॲग्रोवन’ ला द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘सकाळ-ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत गटात सोलापूर जिल्ह्यातील सुरडी ग्रामपंचायतीला तिसरा, सर्वोत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था गटात दापोली नगरपंचायतीला दुसरा, तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवी संस्था ग्रामविकास संस्था (औरंगाबाद) यांना विभागून तिसरा क्रमांक मिळाला. महाराष्ट्रातील या संस्थांच्या प्रतिनिधींना पुरस्कार स्वीकारले. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशला प्रथम, राजस्थानला द्वितीय आणि तामिळनाडूला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
श्री. कोविंद म्हणाले, ‘‘भारतीय संस्कृतीत नद्यांना खूप महत्व आहे. नदीला आपण माता मानतो. उद्योगप्रधान अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर मात्र निसर्गावर अन्याय सुरू झाला. जलसाठ्यांवर ताण आला. हवामान बदलाने कमालीचे तीव्र बदल आपल्याला सहन करावे लागत आहेत. कोठे अवर्षण तर कोठे महापूर असे चित्र तयार झाले आहे. शेतकऱ्यांसह सर्वच घटक त्यामुळे अडचणीत आले आहेत. यावर मात करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजनांबरोबरच जलशक्ती अभियान गेली तीन वर्षे राबवीत आहे. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. जलसमृध्द भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे.’’
यावेळी जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, ‘‘सन २०५० पर्यंत जलसंकट गडद होणार आहे. जलसंधारण करून पाणी अडवणे, त्याचा योग्य वापर करणे, त्याचा पुनर्वापर करणे अशी त्रिसूत्री घेवून काम करावे लागेल. केंद्र सरकार त्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहे. पडणारा पाऊस अडवण्यासाठी जलशक्ती अभियान राबवले जात आहे. यंदा त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे.’’
'ॲग्रोवन'ची ‘जल’जागृती
गेल्या १६ वर्षांच्या वाटचालीत ‘ॲग्रोवन'च्या माध्यमातून जलसंधारण, जल व्यवस्थापन, कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन, जलसाक्षरता यासह पाणी वापर संस्थांची आदर्श कार्यपध्द्ती, पाणी विषयक शासनाच्या विविध योजना, धोरणे यांना प्रसिद्धी देण्यासह हजारो यशकथा प्रकाशित केल्या आहेत. सकाळ माध्यम समूहाच्यावतीने ‘ॲग्रोवन'च्या वर्धापनदिनानिमित्त २० एप्रिल २०१३ रोजी मुंबई येथे पाणी परिषद घेऊन 'दुष्काळ मुक्त महाराष्ट्र' या संकल्पनेवर काम सुरू केले गेले. तसेच २०१९ साली 'जल व्यवस्थापन वर्ष' साजरे करून पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासह पाणी बचतीचा राज्यभरात जागर करण्यात आला. शिवाय सरपंच महापरिषदा, विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून पाणी बचत आणि व्यवस्थापनाचा मंत्र शेकडो गावच्या पुढाऱ्यांना, शेतकऱ्यांना देण्यात आला. या कामाची दखल जल पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.